Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

दक्षिण इटलीमध्ये एड्रियन समुद्राच्या किनारी बारलेट्टा नावाचे एक गाव होते. हे गाव तसे शांत व टुमदार. फिरायला येणाऱ्या प्रवाशांचीही तिथे गर्दी नसायची. या गावाचे एक वैशिष्टय़ होते, ते म्हणजे तेथील सान सेपोल्क्रो चर्चच्या समोरच्या चबुतऱ्यावर उभा असलेला एका तरुण यक्षाचा अजस्र पुतळा. तो युरोपमधला सर्वात मोठ्ठा पुतळा होता, असे काहीजण म्हणत. तो कुणाचा होता, तिथे तो कोणी व कसा उभा केला, हे मात्र कोणीही सांगू शकत नव्हते. एक गोष्ट मात्र पक्की होती की, बारलेट्टामधले सारेजण त्या गूढ अशा भल्या-थोरल्या मूर्तीवर अत्यंत प्रेम करायचे. त्याच्याविषयी ते अनेक सुरस कथा सांगायचे. या थोर पुतळ्याने बारलेट्टा गावाचे शत्रूसैन्यापासून कसे संरक्षण केले, त्याविषयीची ही गोष्ट.
‘बारलेट्टा’त ‘झिया कॉन्सेट्टा’ नावाची एक वृद्धा राहत होती. गावातली ती सर्वात वयोवृद्ध स्त्री. तीदेखील म्हणायची की, मी आयुष्यभर या यक्षपुतळ्याला रोज सकाळी उठल्यावर व रात्री निजण्यापूर्वी पाहत आलेय. हवा चांगली असो व खराब तो तेथे सतत उभाच आहे. बारलेट्टावासियांना या पुतळ्याचे आपल्या गावात असणे हवेहवेसे वाटायचे, इतकी या पुतळ्याची त्यांना सवय झाली होती.
सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे मठामधल्या सर्व जोगिणी व गावातली मंडळी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमायची. ती सगळीजण या यक्षपुरुषाला आपापल्या पद्धतीने अभिवादन करायची. बाजाराला माल-सामान घेऊन जाणारे स्त्री-पुरुष त्या पुतळ्याकडे बघून
 

मनोमन प्रार्थना करायचे की, आमच्या मालाला चांगला भाव मिळेल, असा आशीर्वाद आम्हाला दे.
लहान पोरंटोरं दिवसभर त्याच्या पायथ्याशी खेळायची. कबुतरं सतत त्याच्या मस्तकाभोवती घिरटय़ा घालायची. शाळकरी वयाची थोडी मोठी मुलं त्याच्या मोठमोठय़ा पावलाजवळ थांबून गप्पाटप्पा व हास्यविनोद करायची. नंतर काही वेळाने तरणीताठी पोरे त्या पुतळ्याच्या पायाशी जाणाऱ्या-येणाऱ्या तरण्या पोरींना बघत टिवल्या बावल्या करायची. रात्रीच्या वेळी प्रेमिक त्याच्या चौथऱ्यावर बसून एकमेकांशी गुजगोष्टी करायचे. मग रात्री रस्ते शांत होत. कबुतरंही त्यांचे गुटर्गु थांबवून त्याच्या अंगाखांद्यावर झोपी जायची. झिया कॉन्सेट्टा खिडकी उघडायची व पुतळ्याकडे बघून म्हणायची,
''Buona notte Colosso'' अर्थात ‘‘हे भव्य यक्षा, शुभरात्री.’’ त्या यक्षपुतळ्यालासुद्धा रात्रीची वेळ सर्वात जास्त आवडायची. तोही मनात म्हणायचा, ‘कसं छान शांत आयुष्य आहे!’
मात्र एका दुर्दैवी दिवशी त्या गावाचे शांत जगणे संपले. हजारो सैनिकांचे सैन्य एड्रियाटिक समुद्राकाठच्या सर्व गावांना उद्ध्वस्त करत इकडे येत आहे, अशी बातमी त्या दिवशी येऊन थडकली. ते सन्य सरळ ‘बारलेट्टा’कडेच कूच करत होते. गावातले लोक जीव सैरभैर झाले. सैन्य चालून आले तर त्याला तोंड देण्याची गावाची काहीच तयारी नव्हती. त्यांच्यात जनरल, कॅप्टन तर कुणी नव्हतेच, पण साधे सैनिकही कुणी नव्हते. सगळ्याच घरा-इमारतींमधून लोकांचा हलकल्लोळ माजलेला. कबुतरंही घबराट झाल्यागत पुतळ्याच्या आसपास उडू लागली. झिया कॉन्सेट्टा आता खिडकी उघडून ‘शुभरात्री’सुद्धा म्हणेना! यक्षपुतळ्याला हे सारे पाहून चैन पडेना. तो अस्वस्थ झाला. त्याला काही गोड वाटेना. दुसऱ्या दिवशीही वातावरण काही निवळेना. चर्चमध्ये देवाच्या प्रार्थनेला सगळे जमले, पण बाजारहाट करायला कोणी येईना. कोणी हसेना, पोरंटोरं चौथऱ्यावर खेळायला येईनात. प्रत्येकजण घाईगडबडीने आपली चीजवस्तू गाडय़ांवर लादून बारलेट्टा सोडून जाण्याच्या तयारीत दिसत होते. फक्त झिया कॉन्सेट्टा व तो भव्य यक्षपुतळा सोडून बाकी प्रत्येकजण.
‘‘भव्य यक्षयुवका’’, झिया त्या पुतळ्याला म्हणाली, ‘‘मी तुला कधीचा इथे उभा ठाकलेला बघतेय. बारलेट्टाचे नागरिक तुझ्यावर प्रेम करतात व तुझाही त्यांच्यावर जीव आहे, हे ठाऊक आहे मला. या आणीबाणीच्या परिस्थितीत तूच या शहराला व त्यातील नागरिकांना वाचवायला हवं. तू शत्रूला घाबरवून सोड. या चौथऱ्यावरून खाली उतरून तू काहीच का करत नाहीस?’’
झियाचे हे तळमळीचे शब्द ऐकून तो यक्ष चक्क चौथऱ्यावरून खाली उतरला! मग त्या दोघांनी मिळून एक शक्कल लढवली व नंतर तो यक्ष परत पूर्ववत आपल्या चौथऱ्यावर जाऊन निश्चल उभा ठाकला. झिया कॉन्सेट्टा म्हणाली, ‘‘बारलेट्टावासीयांनो, इकडे या, थांबा व ऐका! आपला महायक्ष आपल्याला वाचवणार आहे..’’ सगळे लोक तिथे जमले. झिया म्हणाली, ‘‘हा महायक्ष स्वत: सैन्याला तोंड देणार आहे. मात्र लोकहो, तुम्ही फक्त तीन गोष्टी करा- एक म्हणजे कुणीतरी मला मोठय़ातला मोठा कांदा आणून द्या. दुसरी गोष्ट असी करा की, सगळेजण पलंगाखाली, कपाटाआड असा कुठल्याही मिळेल त्या आडोशाला लपून राहा आणि तिसरी गोष्ट म्हणजे या यक्षावर विश्वास ठेवा व काहीही प्रश्न न विचारता शांत राहा.’’
कुणीतरी मोठ्ठा कांदा आणून दिला. झिया म्हणाली, ‘‘आता सगळे लपून बसा. झियाने कांद्याचे दोन भाग केले व ते यक्षाच्या हातात दिले व म्हणाली, ‘‘तुला मी सुयश चिंतिते!’’ तो थोर यक्ष पुन्हा एकदा चबुतऱ्यावरून खाली उतरला व गावाबाहेर वेशीच्या दिशेने सैन्याला तोंड देण्यासाठी चालू लागला. वेशीबाहेर तीनएक मैलांवर आल्यावर तो रस्त्याकडेला बसला व कांद्याचे तुकडे डोळ्याजवळ धरले. त्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेवढय़ात सैन्य टेकडीजवळ आले. त्या रडणाऱ्या महायक्षाला पाहून कॅप्टनने सैन्याला थांबण्याचा इशारा केला. कॅप्टन त्याच्याजवळ आले व म्हणाले, ‘‘मी कॅप्टन मिनकियॉन. आम्ही हे शहर काबीज करायला आलो आहोत. तू कोण, कुठला? नीट उत्तर दे.’’ महायक्ष म्हणाला, ‘‘मी या गावात राहतो. पण इथे येऊन बसलोय, कारण माझे मित्र मला खेळायला घेत नाहीत. ते म्हणतात, तू एवढासा आहेस. ते मला खुजा, दुबळा, बारक्या असे काय काय चिडवतात! आज मला त्यांनी दम भरलाय की, मी आज जर शाळेत आलो तर ते मला बदडून काढतील. ऊंऽऽ ऊंऽऽ मला लहान असण्याचा कंटाळा आलाय अगदी.’’ कसेबसे अश्रू पुसत त्याने मोठ्ठा नि:श्वास सोडला. तर काय? त्या वाऱ्याने सैनिकांच्या डोक्यावरच्या टोप्या उडाल्या. कॅप्टन, लेफ्टनंट सारे अवाक् होऊन पाहत राहिले. म्हणाले, ‘‘याला सगळे ‘लहान’ म्हणतात, मग याच्या गावातले इतर सारे किती भयंकर भव्य-अवाढव्य असतील?’’
तो यक्ष मात्र म्हणत होता, ‘‘मी त्यांना माझा सगळा पास्ता खाऊन चांगले मोठ्ठे होऊन माझ्यात किती ताकद आहे, ते एकदा दाखवूनच देईन.’’
हे ऐकून कॅप्टन लेफ्टनंटकडे आला. ते सर्वजण मागे सरले. तलवारी उंचावून कॅप्टनने ‘‘अबाऊट टर्न, क्विक मार्च’’ अशी सैनिकांना आज्ञा दिली आणि यक्षपुरुषाला बघून घाबरलेले सैन्य बारलेट्टाच्या विरुद्ध दिशेने वेगाने दूर जाऊ लागले.
इकडे महायक्षाने कांद्याचे तुकडे फेकून दिले व बारलेट्टामधील सान सेपोल्को चर्चकडे तो परतला. त्याचा हसरा प्रसन्न चेहरा पाहताच झिया म्हणाली, ‘‘सैन्याने माघार घेतली व परत फिरले. लोकहो! आता लपायची गरज नाही. बाहेर निघा. आपले गाव शत्रूच्या हल्ल्यापासून वाचले. आपल्या गावाचे आपल्या लाडक्या महायक्षाने रक्षण केले.’’
त्या रात्री गावाने आनंदोत्सव साजरा केला. रात्री उशिरा सर्व गाव शांत झोपले. कबुतरेही झोपली. चंद्र दिसू लागला नि सर्वत्र नीरव शांतता राज्य करू लागली, तेव्हा झिया कॉन्सेट्टाने तिच्या खोलीची खिडकी उघडली व महायक्षाकडे बघून गोड हसत ती म्हणाली, ``Buona notte Colosso'' (शुभ रात्री यक्षपुरुषा!)
थोडे थांबून झिया पुन्हा म्हणाली ‘‘आणि (``grazi!'') तुझे खूप खूप आभार!’’
(The mysterious Giant of Barletta या इटालियन लोककथेवरून.)
शोभा बडवे

बालमित्रांनो, मराठीत जशा तुम्हाला छान छान गोष्टी वाचता येतात, तशाच इतर भाषांमध्येही लहान मुलांसाठी म्हणून खूपच छान गोष्टी लिहिलेल्या असतात. पौराणिक, ऐतिहासिक गोष्टींपासून साहसकथा नि विज्ञानकथेपर्यंत बालसाहित्याचा आवाका दिसून येतो. हे वाचताना तुम्हांलाही हिंदी, बंगाली, तामीळ, तेलुगु, आसामी, उर्दू, ओरिसा, कन्नड, गुजराती, पंजाबी, मल्याळी भाषांमधील बालसाहित्य वाचावंसं नक्कीच वाटतंय ना? इतर भाषांमधील बालसाहित्याचं मोल लक्षात घेत साकेत प्रकाशनाने ‘श्रेष्ठ भारतीय बालकथा’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. बालशोरी रेड्डी यांनी संपादित केलेल्या ‘श्रेष्ठ बालकहानियाँ’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. काश्मिरी, राजस्थानी आणि कोकणी बालकथांव्यतिरिक्त बहुतांश सर्व भारतीय भाषांमधील बालकथांचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे.
हा ग्रंथ वाचताना तुम्ही गोष्टी तर वाचाच, पण त्याचबरोबर त्या भाषेतील बालसाहित्याचा इतिहासही जाणून घ्या. कारण या ग्रंथात बालकथांसोबत त्या भाषेतील बालसाहित्याचा एक संक्षिप्त इतिहास, बालसाहित्याचा उगम आणि विकास याची सविस्तर माहितीही देण्यात आली आहे. यामुळे त्या भाषेतील बालसाहित्याचे वैभव जाणून घेणेही शक्य झाले आहे.
मराठी भाषेप्रमाणे प्रत्येक भाषेतील बालसाहित्याची परंपरा जाणून घेताना खूप नवनवीन गोष्टी तुमच्या लक्षात येतील. यातील बहुतांश प्रत्येक भाषेत सुरुवातीला ओव्या, लोककथांमधून बालसाहित्याचा पाया रचला गेल्याचं दिसून येतं. बालसाहित्यात पौराणिक कथा आणि ऐतिहासिक कथांचा आधारही मोठय़ा प्रमाणावर घेतला गेल्याचंही यात म्हटलं गेलंय. दुसरे महायुद्ध आणि स्वातंत्रप्राप्तीनंतरच्या काळात प्रत्येक भारतीय भाषेतील बालकथांनी बाळसं धरल्याचा उल्लेखही यात करण्यात आला आहे. या काळात पौराणिक नि ऐतिहासिक साहित्यात अडकलेलं प्रत्येक भाषेतील बालसाहित्य हे अधिक समृद्ध झालं. विज्ञान, समाजजीवन यांचा संदर्भ घेत हे साहित्य मुलांच्या अधिक जवळ गेल्याचंही बालसाहित्याचा इतिहास नमूद करतो. आणखी एक गोष्ट अशी की, जवळपास प्रत्येक बालसाहित्यात बालमासिकांची, बालपत्रिकांची परंपरा असल्याचे जाणवते. जवळपास प्रत्येक बालसाहित्यात निसर्गप्रेम, माणुसकीची शिकवण यावर भर दिला गेल्याचंही जाणवतं. मधल्या काळात बालसाहित्याची नवनिर्मिती होण्याऐवजी अनुवादित साहित्यावरच अधिक भर दिला गेल्याचंही स्पष्ट होतं. ग्रंथातील प्रत्येक भाषेमधील बालसाहित्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
बंगाली बालसाहित्य- ज्येष्ठ कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या काळात समृद्ध बालसाहित्य लिहिलं गेलं. मुलांची मानसिकता लक्षात घेत टागोरांनी भरपूर काव्यलेखनही केले. ‘काबुलीवाला’पासून ‘खोका बाबुका प्रत्यावर्तन’ अशा कथाही त्यांनी लिहिल्या. त्यांच्यानंतरही बालसाहित्याची परंपरा प्रभावीपणे सुरू राहिली. सुकुमार राय यांनी मुलांसाठी उत्कृष्ट भावकविता लिहिल्या आणि हाच प्रवाह सत्यजित राय यांनी सुरू ठेवला. शंकू, फेलुदा अशा चरित्रांच्या माध्यमातून त्यांनी किशोर साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. बंगाली बालसाहित्याचं वैशिष्टय़ असं की, अनेक नामवंत बंगाली लेखकांनी बालसाहित्यात दर्जेदार लिखाण केले आणि बालसाहित्याला हातभार लावला.
आसामी बालसाहित्य- या बालसाहित्याची सुरुवात ही १५व्या शतकात झाली. देश-विदेशी लोककथांना असमिया भाषेत साधुकथा संबोधलं जातं. त्यांचा उपयोग बालसाहित्यात मोठय़ा प्रमाणावर करण्यात आला आहे.
उर्दु बालसाहित्य- दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या उर्दु बालसाहित्याची सुरुवात ही देवदूत, परी, राजा, जादूच्या गोष्टींनी झाली. अल्लाउद्दीनचा दिवा, उडनखटोला, तोता मैना, कलीला औ दमीना, हातिमताई यासारख्या अविस्मरणीय गोष्टींना जगभरात सर्वत्र मान्यता मिळाली. हजारो वर्षांपूर्वी ‘वस्लीला ओ दमना’ हे फारसी भाषेत मुलांसाठी लिहिलेले पहिले पुस्तक मानले जाते. या पुस्तकाचे जगभरातील विविध भाषांमध्ये अनुवाद झाले.
उडिया बालसाहित्य- उडिया बालसाहित्य अधिक आकाराला आलं ते स्वातंत्र्यानंतर. हे बालसाहित्य प्रयोगवादी नि वैज्ञानिक तर आहेच, पण त्याचबरोबर शैलीदारही आहे. प्राचीन, पौराणिक साहित्याला आधुनिक साज चढवण्याचा प्रयत्नही यात करण्यात आला.
कन्नड बालसाहित्य- १८४० ते १९९१ हा कन्नड बालसाहित्याचा विकासकाळ मानला जातो. यात मुलांसाठी पाच हजारहून अधिक पुस्तके लिहिली गेली. ११३० मध्ये पंचतंत्राचा केलेला कानडी अनुवाद करण्यात आला. १९व्या शतकाच्या मध्यास केलेला इसापच्या गोष्टींचा अनुवाद ही पहिली रचना मानली जाते.
गुजराती बालसाहित्य- गुजराती भाषेत १८३१मध्ये लिहिले गेलेले ‘बालमित्र’ हे पहिले लिखाण मानले जाते. १९२० ते १९४० ही दोन दशके म्हणजे गुजराथी बालकथेचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात विपुल बालकथा प्रकाशित झाल्या. पंचतंत्र, हितोपदेश, अरेबियन नाइट्स, इसापकथा, हेन्स अँडरसन यांच्या पुस्तकांचे अनुवादही मोठय़ा प्रमाणावर गुजराती भाषेत प्रकाशित झाले.
तामीळ बालसाहित्य- तामीळ बालसाहित्यात वात्सल्य आणि अद््भूत रसाला प्राधान्य होतं. तामीळ भाषेत बालगीते, चरित्रपर लिखाण, विज्ञानकथा, बालकादंबऱ्या लिहिल्या गेल्या.
तेलुगु बालसाहित्य- तेलुगु भाषेत स्वातंत्र्यपूर्व काळात लहान मुलांसाठी दोन हजार पुस्तकं प्रकाशित झाली. तेलुगु बालकथांचा विकास हा संस्कृतमधील पंचतंत्रापासून सुरू झाला. त्यानंतर सचित्र कथा, सामाजिक जीवनावर बेतलेली पुस्तके आणि अनुवादित लिखाण मोठय़ा प्रमाणावर प्रकाशित झाले.
पंजाबी बालसाहित्य- इंग्रजी अमदानीच्या काळात शाळकरी मुलांसाठी जेव्हा साहित्याची गरज भासली, तेव्हा पंजाबी भाषेत अलिफ लैला, पंचतंत्रसारख्या प्राचीन पुस्तकांचे पुर्नलेखन करण्यात आले. १९३४ साली ज्ञानी लालसिंग यांनी ‘बालक’ हे मासिक सुरु केलं. १९४२मध्ये गुरुबक्ष सिंग यांनी ‘बालसंदेश’ काढून विज्ञानकथा साध्या सोप्या भाषेत मुलांपर्यंत पोचवल्या.
मल्याळी बालसाहित्य- १९५० नंतर विविध अंगाने मल्याळी बालसाहित्याचा विकास झाला. गेल्या चार दशकांमध्ये तर बालसाहित्याकडे गंभीरतेने पाहिले जाऊ लागले आणि त्यामुळे नव्या उमेदीने बालसाहित्य लिहिले जाऊ लागले. बालसाहित्याबद्दल चर्चा सुरू झाल्या.
हिंदी बालसाहित्य- संख्येच्या दृष्टीने पाहिलं तर हिंदीत बालसाहित्य विपुल प्रमाणात लिहिलं गेलं आहे. श्रेणीनुसार लिहिलं गेलेलं साहित्यही भरपूर आहे. परंतु, हिंदूीतील नामवंत लेखकांनी या दृष्टीनं बालसाहित्याबद्दल विशेष आस्था दाखवली नाही, हेही स्पष्ट होतं.
मराठी बालसाहित्य- या ग्रंथात मराठी बालसाहित्याबद्दल टिप्पणी दिलेली नाही. या ग्रंथाच्या मराठी विभागात विनोबा भावे (उंटावरचा शहाणा), साने गुरुजी (गुराखी), ना. धों, ताम्हनकर (चिंगीचा पराक्रम), राजा मंगळवेढेकर (सुरस), शं. रा. देवळे (जुन्या गोष्टी), भा. दो. पाटील (पाखरांशी मैत्री), शंकर कऱ्हाडे (देवमाणूस), शंकर सारडा (जादूगार सरकार), महावीर जोंधळे (मुंगळ्याच्या बेटावर एक दिवस), दत्ता डांगे (तीन आंधळे एक डोळस), बाबा भांड (कपडय़ाचा जोड), अनुताई वाघ (सईची सोबत) आदी बालकथांचा समावेश करण्यात आला आहे.
सत्यजित राय, महाश्वेतादेवी, अमृता प्रीतम यांच्या बालकथांचाही यात समावेश करण्यात आला आहे. इतर भाषेतील बालसाहित्याची कवाडे मराठी बालवाचकांसाठी खुली करणारा हा ग्रंथ संग्रही ठेवण्यासारखाच आहे. मात्र या साऱ्या बालकथा एकत्रितपणे ग्रंथात समाविष्ट करण्यात आल्याने तयार झालेला जाडजूड ग्रंथ वाचताना लहानग्यांना हातात कसाबसा पेलावा लागेल. त्यापेक्षा काही भागांमध्ये तो आला असता आणि रंगीत चित्रांचा वापर करण्यात आला असता, तर तो अधिक देखणा झाला असता, हे खरे.
श्रेष्ठ भारतीय बालकथा. संपादन - बाबा भांड, साकेत प्रकाशन. मूल्य - ४०० रु., पृष्ठे - ६०६. संपर्क - साकेत प्रकाशन - ११५, महात्मा गांधीनगर, स्टेशन रोड, औरंगाबाद - ४३१२१२
सुचिता देशपांडे
suchitaadeshpande@gmail.com

जरा वेगळा विचार करता येईल ?
काही करामती मुलांना जरा वेगळा विचार करायला शिकवण्यासाठी उपयोगी पडतात. त्यांच्या मेंदूने घातलेल्या लक्ष्मणरेषा ओलांडायला याद्वारे त्यांना मदत होते, याचेच एक उदाहरण.
एका कागदावर, फळ्यावर किंवा धुळीत शेजारील आकृतीत दाखविल्याप्रमाणे नऊ िबदू काढा. प्रत्येकाला हात न उचलता चार सरळ रेषांनी सर्व बिंदू जोडायला सांगा.
तुमच्या असे लक्षात येईल की, जास्तीत जास्त लोक काल्पनिक चौकोनापलीकडे जाऊन ते िबदू जोडायचा प्रयत्न करणार नाहीत.
तुम्ही त्यांना त्यांच्या मनाने घातलेल्या मर्यादांच्या बाहेर जाऊन विचार करा, अशी क्लृप्ती सांगून पाहा. शेवटचा कोणीतरी एक जण ते कसे करायचे, ते शोधून काढेलच. त्या नऊ बिंदूंमुळे तयार होणाऱ्या चौकोनाबाहेर रेषा गेल्या, तरच हे कोडे सोडवता येईल.

काय हरवले आहे ?
वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू गोळा करा. या सर्व वस्तू एका ट्रेमध्ये अथवा मोठय़ा ताटात ठेवा. आता मित्र अथवा मैत्रिणीला डोळे बंद करायला सांगा आणि ट्रेमधल्या एकेक वस्तू काढून घ्या. आता मित्राला डोळे उघडायला सांगा आणि कोणती वस्तू गायब आहेत, ते ओळखायला सांगा.

साहित्य - जुनी परडी (वेताची), कुठलेही दोन आवडते अॅक्रिलिक रंग, ब्रश, थर्माकोलचे गोळे, गोंद, मेणबत्ती
कृती - फुलांच्या परडीतील फुले सुकल्यावर परडी फेकण्याऐवजी आपण त्याची सुंदर लॅम्पशेड बनवू शकतो. त्यासाठी सर्वात आधी या परडीच्या सर्व पिना, चमकीचे कागद, प्लास्टिक इत्यादी पूर्णपणे काढून टाका. हँडल वेगळं करा.
आता या परडीला आपल्या आपल्या आवडत्या दोन रंगांमध्ये अॅक्रिलिक शेडिंग करून घ्या.
हा रंग पूर्ण वाळल्यावर परडी उलटी करा. खालील बाजूही रंगवा.
सर्व रंग वाळल्यावर मिळत्याजुळत्या रंगाच्या थर्माकोलच्या गोळ्यांनी डिझाईन बनवून चिकटवा.
एक मेणबत्ती छोटीशी कापून घ्या. पेटवा आणि त्यावर आपली परडी उलटी ठेवा. ही लॅम्पशेड तुम्ही दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश झिरपण्यासाठीही वापरू शकता.
अर्चना जोशी
vinaarch68@gmail.com