Leading International Marathi News Daily
रविवार, ३१ मे २००९

‘ट्वेन्टी-२०’ विश्वचषकविजेते भारतीय खेळाडू आपल्या गतलौकिकाच्या रक्षणासाठी इंग्लंडमध्ये उतरत आहेत. येत्या ५ जूनपासून लंडन आणि नॉटिंगहॅममध्ये रंगणारी ही स्पर्धा भारतासाठी मोठे आव्हान असेल. वेस्ट इंडिजमधील विश्वचषकातील दारुण अपयशानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या-वहिल्या ‘ट्वेण्टी-२०’ विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
कारण भारतीय संघ नवोदित, पण तरुण आणि तडफदार अशा खेळाडूंचा होता. सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, झहीर या मान्यवरांनी आधीच माघार घेतल्याने भारतीय जनतेनेदेखील या संघाकडून फारशी अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे दडपणाविना खेळणाऱ्या तारुण्याने सळसळणाऱ्या संघाने विजेतेपदाचा चमत्कार केला होता. या वेळी मात्र भारतीय संघ अपेक्षांचे ओझे
 

घेऊन इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. महेन्द्रसिंग धोनीच्या ताज्यातवान्या नेतृत्वाचा त्या वेळी भारताला लाभ झाला होता. या वेळी धोनीचे नेतृत्व अधिक परिपक्व झालेले असेल ही जमेची बाजू. मात्र श्रीशांतसारखा उत्साहाने ओसंडून वाहणारा गोलंदाज या वेळी भारतीय संघाकडे नसेल. जोगिंदरसिंगसारखा भारतीय क्रिकेटमध्येही कुणाच्याही खिजगणतीत नसलेला गोलंदाज, जो अंतिम षटकांचा हीरो ठरला होता, तोही या वेळी नसेल. युवराजची एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याइतपत तळपलेली बॅट भारताकडे आहे, पण त्या बॅटीला आयपीएलमध्ये हवा तसा सूर गवसलेला नाही हे शल्य आहेच. सेहवाग-गंभीर ही सलामीची जोडी तर दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या यशात फलंदाजीचे कोणतेही योगदान देऊ शकली नव्हती, हे कटू सत्यदेखील आपल्याला मानावे लागेल.
भारतीय संघाची जमेची बाजू म्हणजे सुरेश रैनाची आयपीएलमधील सातत्यपूर्ण आणि आक्रमक फलंदाजी युसूफ पठाणचे मधल्या फळीतील दोन उपयुक्त झंझावाती डाव आयपीएलच्या उत्तरार्धात चमकलेला मनीष पांडे भारतीय संघात नाही. मात्र रोहित शर्माची अष्टपैलू चमक धोनीच्या महत्त्वाकांक्षेला चमक देऊ शकेल. आर. पी. सिंगची उपयुक्त स्विंग गोलंदाजी धोनीच्या आक्रमणाची धार वाढविणारी असेल. पण त्याचबरोबर झहीर खानच्या डाव्या खांद्याला झालेली दुखापत पूर्णपणे बरी झाली नाही ही गोष्ट संघाला काळजीत टाकणारी आहे. त्यापेक्षाही मोठी काळजी म्हणजे आयपीएल स्पर्धा खेळल्यानंतर आलेल्या थकव्यानंतर भारतीय संघ गतस्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करू शकेल काय?
भारतीय संघाच्या ‘ट्वेण्टी-२०’ क्रिकेटमधील गुणवत्ता आणि वर्चस्वाचा विचार करताना, विश्वचषक स्पर्धेनंतर उदयाला आलेल्या आयपीएलचाही विचार करावा लागणार आहे. क्रिकेटच्या या छोटेखानी आवृत्तीला भारतीय क्रिकेटरसिकांनी, विशेषत: तरुण पिढीने डोक्यावर घेतले. क्रिकेटचा हा चमत्कार दक्षिण आफ्रिकेत चालणार नाही, असा आयोजकांसह सर्वाचा अंदाज चुकला.
दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट हंगाम १७ एप्रिलनंतर संपतो. तेथे नंतर हिवाळ्याची चाहूल लागते. मे महिन्याच्या मध्यावरच उष्णतामान दहाच्या आत पोहोचते. अंतिम सामन्यापर्यंत खेळाडूंनी अंगावर ओढलेली ब्लँकेटस् पाहिली, की त्या थंडीची जाणीव होते. त्या थंडीतही स्टेडियममधील प्रचंड गर्दी ‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेटच्या लोकप्रियतेचीच पावती देत होती. याच लोकप्रियतेचा अचूक लाभ ललिद मोदी आणि त्यांच्या डोक्यातून साकारलेल्या आयपीएलने घेतला. आयपीएलची तीच लोकप्रियता ‘ट्वेन्टी-२०’च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाहायला मिळेल का? आयपीएलने उंचावलेले ग्लॅमर विश्वचषक स्पर्धेत पाहावयास मिळेल का? आयपीएलच्या प्रत्येक संघाचे रंगीबेरंगी गणवेष, चीअर गर्ल्स, आकर्षक जाहिराती, सामन्यानंतरची प्रत्येक चौकार, षटकारानंतरची फटाक्यांची आतषबाजी याची विश्वचषक स्पर्धेत तुलना होणार आहे. कॅमेऱ्यांची विविध ‘पोझिशन्स’, ‘ओव्हर व्ह्यू’ या नावीन्यपूर्ण कॅमेऱ्याचे सिंहावलोकन या गोष्टींचीही इंग्लंडमधल्या स्पर्धेदरम्यान तुलना होईल.
आयपीएलपेक्षा काहीतरी वेगळे, काहीतरी आकर्षक असे इंग्लंडला दाखवावे लागणार आहे. प्रेक्षकांच्या संख्येबरोबरच मैदानावरील कामगिरीचीही तुलना होणार आहे. आयपीएलची प्रतिभा तमाम क्रिकेट विश्वाने पाहिली होती. त्या प्रतिभेची क्रिकेट खेळले जाणाऱ्या प्रत्येक देशात विश्वचषक ‘ट्वेण्टी-२०’ दरम्यान, तुलना होईल. मैदानावरील यशाबरोबरच मैदानाबाहेरच्या यशाचीही यापुढे तुलना होणार आहे.
विनायक दळवी

अ गट-: भारत, बांगलादेश
आणि आर्यलड
ब गट-: पाकिस्तान, इंग्लंड
आणि नेदरलॅंड
क गट-: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका
आणि वेस्ट इंडिज
ड गट-: दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड आणि स्कॉटलंड

भारत -: महेंद्रसिग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सुरेश रैना, युवराज सिंग, युसूफ पठाण, रोहित शर्मा, हरभजन सिंग, झहिर खान, इशांत शर्मा, प्रवीण कुमार, आर.पी. सिंग, इरफान पठाण, प्रज्ञान ओझा आणि रवींद्र जडेजा. प्रशिक्षक-: गॅरी कर्स्टन, गोलंदाजी प्रशिक्षक-: वेंकटेश प्रसाद, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक-: रॉबीन सिंग.

ऑस्ट्रेलिया-: रिकी पॉन्टींग (कर्णधार), मायकेल क्लार्क, नॅथन ब्रॅकन, बेन हिलफेन्हॉस, ब्रॅड हॅडिन, नॅथन हाऊरित्झ, जेम्स होप्स, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मिशेल जॉन्सन, ब्रेट ली, पीटर सिडल, डेव्हिड वॉर्नर आणि शेन व्ॉटसन

इंग्लंड-: पॉल कॉलिंगवूड (कर्णधार), जेम्स अॅन्डरसन, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, अॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ, जेम्स फॉस्टर, रॉबर्ट की, दिमित्री मस्कारेन्हास, इओइन मॉर्गन, गॅ्रहम नेपिअर, केव्हिन पीटरसन, ओवेश शहा, रायन साइडबॉटम, ग्रॅमी स्वान, ल्यूक राईट.

पाकिस्तान-: युनूस खान (कर्णधार), अहमद शेहझाद, फवाद आलम, इफ्तिकार अंजुम, कामरान अकमल, मिसबाद-उल-हक, मोहम्मद आमीर, सइद अजमल, सलमान बट्ट, शाहिद अफ्रिदी, शोएब मलिक, शाहझेब हसन, सोहेल तन्वीर, उमर गुल, यासिर अराफत.

न्यूझीलंड-: डॅनियल व्हिटोरी (कर्णधार), नील ब्रुम, इयान बटलर, ब्रेन्डन दिमात्री, जेम्स फ्रॅन्कलीन, मार्टीन गुप्तील, ब्रेन्डन मॅक् क्यूलम, नॅथन मॅक् क्यूलम, पीटर मॅग्लॅशन, काईल मिल्स, इयान ओब्रायन, जेकब ओरम, जेसी रायडर, स्कॉट स्टायरीस, रॉस टेलर.

दक्षिण आफ्रिका-: ग्रॅमी स्मिथ (कर्णधार), जोहान बोथा, युसूफ अब्दुला, मार्क बाऊचर, अॅबी डी‘व्हिलिअर्स, जे.पी. डय़ुमिनी, हर्शेल गिब्ज, जॅक कॅलिस, अॅल्बी मॉर्केल, मॉर्न मॉर्केल, जस्टीन ऑन्टॉग, वेन पार्नेल, रॉबीन पीटरसन, डेल स्टेन, व्ॉन डर मव्र्ह.

श्रीलंका-: कुमार संगकारा (कर्णधार), इन्डीका दी सराम, तिलकरत्ने दिलशान, सनथ जयसूर्या, महेला जयवर्धने, नुवान कुलसेकरा, फरवीझ महरूफ, लसिथ मलिंगा, अॅन्गेलो मॅथ्यूज, अजंथा मेंडीस, जेहान मुबारक, मुथय्या मुरलीधरन, चमरा सिल्वा, थिलान तुषारा, इसुरू उदाना.

वेस्ट इंडिज-: ख्रिस गेल (कर्णधार), दिनेश रामदिन, लिओनेल बेकर, सुलेमान बेन, डेव्हिड बर्नाड, ड्वेन ब्राव्हो, शिवनारायण चंदरपॉल, फिडेल एड्वर्डस, आंद्रे फ्लेचर, झेव्हिर मार्शल, किरोन पोलार्ड, डॅरेन सॅमी, रामनरेश सारवान, लेन्डल सिमोन्स, जेरॉम टेलर.

स्कॉटलंड-: गेव्हिन हॅमिल्टन (कर्णधार), रिची बेरींगटन, जॉन ब्लेन, काईल कोत्झर, गोरडोन ड्रॅमोन्ड, माजीद हक, नील मॅक्यूलम, डेवॉल्ड नेल, नवदीप पूनीया, ग्लेन रॉजर्स, कॉलीन स्मिथ, जॅन स्टॅन्डर, रायन व्ॉटसन, फ्रेढर व्ॉट्स, क्रेग व्हाईट.

बांगलादेश-: मोहम्मद अश्रफूल (कर्णधार), अब्दूर रझ्झाक, जूनाद सिद्धीकी, महमुदूल्लाह, मश्रफ मुर्तूझा, मिथून अली, मुशफिकर रहीम, नीम इस्लाम, रकीबूल हसन, रूबेल, हुसेन, शाहदात हुसेन, शामसूर रेहमान, शकीब अल हसन, सय्यद रसेल, तमीम इक्बाल.

आर्यलड-: व्हिल्यम पोटरफिल्ड (कर्णधार), आंद्रे बोथा, जर्मी ब्रे, पीटर कॉनल, अॅलेक्स कुसॅक, ट्रेन्ट जॉन्सन, काईल मॅक् कॅलम, जॉन मूनी, केव्हिन ऑब्रियन, नील ऑब्रियन, बॉड रॅन्कीन, पॉल स्टीरलींग, रेगान वेस्ट, अॅन्ड्रय़ू व्हाईट, गॅरी व्हिल्सन.

नेदरलॅंड-: जेरोन स्मिथ (कर्णधार), पीटर बेरोन, मुदस्सर बुखारी, टॉम ग्रुथ, मॉउरित्झ जोन्कमन, अॅलेक्सी करिवीझी, ड्रीक नेन्स, रूड निझाम, डॅरन रीकर्झ, एडगर शिफेर्ली, पीटर सीलार, एरीक स्विरझिन्की, रायन टेन डोत्झे, डॅन वनॅ बुन्गे, बास झुडेरेन्ट.

इंडियन प्रीमियर लीगचा जल्लोष अखेर थंडावला. हा जोश, उत्साह तूर्तास ओसरला असला तरी दरवर्षी या उत्साहाला त्याच उत्फूर्तपणे उधाण येणार याची हमी मात्र यंदाच्या या क्रिकेटसोहळ्याने दिली आहे, यात शंका नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून ललित मोदी आणि कंपनीने जी आर्थिक गणिते किंवा समीकरणे बांधली होती, ती किती यशस्वी ठरली, संघमालकांचा किती फायदा झाला किती तोटा झाला, याचा लेखाजोखा मांडण्याचा हा प्रयत्न आहे, असे लेखाच्या मथळ्यावरून वाटूही शकते. पण आयपीएलने केलेली ‘कमाई’ वेगळ्या नजरेतूनही पाहण्यासारखी आहे. ही कमाई आर्थिक चष्म्यातून जशी पाहता येईल तशीच क्रिकेटच्या चष्म्यातूनही पाहता येईल.
क्रिकेटचा हा ट्वेन्टी-२० सारखा झटपट प्रकारच मुळी तद्दन मनोरंजनासाठी पुढे आला आहे, असा एक विचारप्रवाह आहे. ते पूर्ण चुकीचे आहे, असेही नाही. पण त्यामुळे या क्रिकेटकडून गंभीर असे काही मिळेल, अशी कुणाचीही अपेक्षा नसेल तर त्यात कुठेतरी थोडी गफलत होते. कारण क्रिकेटच्या या प्रकाराकडे त्याच गांभीर्याने पाहायला हवे, ज्या गांभीर्याने आपण कसोटी किंवा एकदिवसीय क्रिकेटकडे पाहतो. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि यंदा विजेतेपद पटकाविणाऱ्या डेक्कन चार्जर्स संघाचा कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट यानेच हे मत व्यक्त केले आहे. हे विश्लेषण आयपीएलला मिळालेल्या लोकप्रियतेतून आले आहे, असे नव्हे तर खरोखरच उत्तम क्रिकेटसाठी आवश्यक असलेल्या गुणवत्तेची कसोटी या क्रिकेटप्रकारातही पाहिली जाते, यातून असे मत मांडता येते. यंदाच्या आयपीएलमध्ये हे सिद्धही झाले. आपण त्या अनुषंगाने या क्रिकेटकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज असल्याचे वाटते.
ट्वेन्टी-२० क्रिकेट म्हणजे तरुण, तडफदार खेळाडूंचाच खेळ, असा एक उथळ विचार सुरुवातीच्या काळात पुढे येत होता. पण जसजसा ट्वेन्टी-२० क्रिकेटचा अंदाज साऱ्यांना येऊ लागला तसतसा हा खेळ तरुणांबरोबरच अनुभवी, ज्येष्ठ खेळाडूंचाही आहे, हे स्पष्ट होऊ लागले आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेली आयपीएल हे त्याचे एक ताजे उदाहरण म्हणता येईल. अॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, मॅथ्यू हेडन, अनिल कुंबळे, मुथय्या मुरलीधरन, जयसूर्या, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड अशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळी या आयपीएलच्या कोंदणात अगदी चपखल बसली. गिलख्रिस्ट आणि कुंबळे तर केवळ फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून नव्हे तर यशस्वी कर्णधार म्हणूनही उदयास आले. दोघांनीही आपल्या नेतृत्वाच्या आणि वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर गेल्यावर्षी तळाला असलेल्या संघांना यंदा विजेतेपदाच्या शर्यतीत नेले. शेन वॉर्नने कर्णधार, संघप्रशिक्षक, गोलंदाज अशा विविध भूमिका निभावताना त्यात योग्य संतुलनही राखले. इतरांनीही आपली उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध केली. या सर्व खेळाडूंचे सरासरी वय पाहिले तर ते पस्तिशीच्या पुढेच आहे. असे असतानाही त्यांच्या खेळावर कुठेही वयाचा शिक्का बसलेला पाहायला मिळाला नाही. आयपीएलच्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून झालेली ही कमाईच म्हणता येईल.
तंत्रशुद्धतेचा तर या क्रिकेटशी काडीचाही संबंध नाही, असे एक टोकाचे मत कधीमधी ऐकायला येते. काही खेळाडूंच्या बेफिकीर खेळण्याच्या पद्धतीमुळे ते खरे वाटूही लागते. पण वास्तव चित्र तसे नाही. या क्रिकेटपुरता तंत्रात बदल झालेला पाहायला मिळतो हे खरे असले तरी आडवेतिडवे फटके खेळणारा कोणताही फलंदाज या क्रिकेटमध्ये यशस्वी ठरतो, असे अजिबात म्हणता येणार नाही. आपण आयपीएलमध्ये खेळलेल्या खेळाडूंच्या कामगिरीकडे एकवार नजर टाकली तर असे दिसून येते की, तंत्राला धरून खेळ करणाऱ्यांनीच संघाचा डोलारा सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. युसूफ पठाणच्या बाबतीत पाहायचे झाले तर त्याची गतवर्षीची कामगिरी पाहता त्याच्याकडून यंदा खूप अपेक्षा होत्या. पण तंत्र आणि संयम यांच्या आधारावर फलंदाजी न केल्यामुळे तो अपयशी ठरला. पण दुसरीकडे गिलख्रिस्ट, हेडन, राहुल द्रविड, जे. पी. डय़ुमिनी, रोहित शर्मा, सुरेश रैना आदि फलंदाजांनी आपल्या तंत्राला मुरड न घालता फलंदाजी केल्यामुळे संघाला आधार देण्याची महत्त्वाची भूमिका त्यांना बजावता आली. या फलंदाजांच्या कामगिरीवर दृष्टीक्षेप टाकला तर ते इतरांच्या तुलनेत आघाडीवर आहेत. म्हणजेच तंत्रशुद्धतेला पर्याय नाही, हे ट्वेन्टी-२० सारख्या झटपट क्रिकेटमध्येही स्पष्ट होते.
अष्टपैलुत्व हादेखील ट्वेन्टी-२० क्रिकेटचा एक अविभाज्य पैलू आहे. तुमच्याकडे केवळ गोलंदाजी किंवा फलंदाजी असून भागणार नाही तर त्याबरोबरीने उपयुक्त फलंदाजी करण्याची, चपळ क्षेत्ररक्षण करण्याची आणि अडचणीच्या वेळेस डोके शांत ठेवून खेळण्याची हातोटी असायलाच हवी. हे सर्व गुण एकाच ठिकाणी एकवटलेले असतील तर ट्वेन्टी-२० क्रिकेटशी एकरूप व्हायला त्याला वेळ लागत नाही. शेन वॉर्न हे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. गिलख्रिस्ट, अनिल कुंबळे, रैना हेदेखील याच पंक्तीतले.
यंदाच्या आयपीएलने नव्या चेहऱ्यांनाही जन्म दिला आणि नवी ओळखही दिली. मनीष पांडे, शादाब जकाती, युसूफ अब्दुल्ला, वॉर्नर, डय़ुमिनी, अभिषेक नायर आदि खेळाडू स्वत:चा एक वेगळा ठसा निर्माण करू शकले. आयपीएलमधील त्यांच्या कामगिरीने काहींना विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघाचे दरवाजेही खुले झाले. आयपीएलमधून झालेल्या आर्थिक कमाईपेक्षाही ही कमाई खूप मोठी आहे. क्रिकेटचे मूल्य त्यामुळे वाढणार आहे.
भारतातील लोकसभा निवडणुकांमुळे ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवावी लागली आणि तिला भारताप्रमाणे प्रतिसाद मिळणार नाही, असा एक होरा होता. काहीवेळा तसे वाटलेही. पण प्रसारमाध्यमांकडून आयपीएलचे सातत्याने गुणगान होत राहिल्याने स्पर्धेची दखल चाहत्यांनाही घ्यावी लागली. भारतीय उपखंडात नक्कीच हवीतशी प्रसिद्धी आयपीएलने मिळविली असणार यात शंका नाही. म्हणजेच असे मनोरंजन कुठल्या देशात होते आहे हे आता महत्त्वाचे राहिलेले नाही तर ते होते आहे, हे महत्त्वाचे आहे. आयपीएलचे आयोजन करण्यासाठी भविष्यात ऑलिम्पिकप्रमाणे ‘बीडिंग’ (आयोजक बनण्याची शर्यत) झाले नाही म्हणजे मिळविले. एक मात्र खरे की इतर देशही ही स्पर्धा आपल्या इथे व्हावी यासाठी धडपडत असणार! ही आयपीएलच्या दृष्टीने मोठी पुंजी आहे. यंदा दक्षिण आफ्रिकेतील हंगाम संपलेला असल्यामुळे येथील खेळपट्टय़ांचा नूर पालटला होता. परिणामी, धावांची रतीब ओतलाच गेला नाही. कमी धावा होऊनही सामने रंगले तरीही मोठय़ा धावसंख्येची चाहत्यांची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. फलंदाजांनाही सावध खेळावर लक्ष केंद्रित करावे लागले. भविष्यात आयपीएल आयोजित करताना खेळपट्टीच्या दर्जाचाही विचार व्हावा, हे यातून सुचविले गेले.
महेश विचारे