Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

अमिताभने नाकारली ऑस्ट्रेलियाची ‘डॉक्टरेट’
नवी दिल्ली, ३० मे/पी.टी.आय.
भारतीय विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियामध्ये वांशिक विद्वेषामुळे होत असलेल्या हल्ल्याचा निषेध ‘बीग बी’ अमिताभ बच्चन यांनी केला आहे. ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठाद्वारे देण्यात येणारी ‘मानद डॉक्टरेट’ ही पदवीही त्यांनी नाकारली आहे. ब्रिस्बेनमधील ‘क्वीन्सलॅँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’तर्फे अमिताभ बच्चन यांना मनोरंजन उद्योगातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ‘मानद डॉक्टरेट’ देण्यात येणार होती. गेल्याच आठवडय़ात याबाबतचा प्रस्ताव बच्चन यांनी स्वीकारला होता.

मराठय़ांच्या राजकीय आरक्षणाला पवारांचा पूर्ण विरोध
सांगोला, ३० मे/वार्ताहर

मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र होत चालला असतानाच केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठय़ांच्या राजकीय आरक्षणाला आपला पूर्ण विरोध असल्याचे जाहीर केले आहे. पंढरपूर येथे उमा महाविद्यालय पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व मतदारांचे आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रसंगी केंद्रिय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते.

काँग्रेसमधील फितुरी ठेचून काढू
नारायण राणे यांचा पुन्हा हल्लाबोल
रत्नागिरी, ३० मे/खास प्रतिनिधी
निवडणुकीमध्ये नीलेश यांना मिळालेल्या मताधिक्याबाबत मी अजिबात समाधानी नाही. माझ्या अपेक्षेनुसार सुमारे दीड लाख मतांनी हा विजय व्हायला हवा होता. पण तसे न होण्यास भाजप-सेना युती कारणीभूत नसून काँग्रेसमधील फितुरांमुळेच हा फटका बसला आहे, असा स्पष्ट आरोप राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीतच केल्यामुळे नवा वाद रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार नीलेश राणे यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज येथे झाला. याप्रसंगी बोलताना राणे यांनी पुन्हा एकदा तोफ डागली.

बारावीचा निकाल ४ जूनला
मुंबई, ३० मे / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २००९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल ४ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजल्यापासूनच मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल बघता येईल. त्याच दिवशी विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांत गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार नाही.

राष्ट्रपती, स्थिरावलात ना..
आता तरी कसाब, अफझलला फाशी द्या!
मुंबई, ३० मे/प्रतिनिधी
राष्ट्रपतीजी, आता आपल्याला राष्ट्रपती भवनात दोन वर्ष होत आहेत. आपण स्थिर झालात व केंद्रात स्थिर सरकारही आले. आता तरी कसाब आणि अफझल या दोन नराधमांना तात्काळ फासावर लटकवा व जनतेच्या भावनांचा आदर करा, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना कठोर शब्दांत सांगितले आहे. प्रतिभा पाटील या मराठी असल्याने त्यांना भाजपचा विरोध पत्करून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता.

शिवशाहीर पुरंदरेंना नितीन गडकरींचे प्रशस्तीपत्र
नाशिक, ३० मे / प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असल्याचे स्पष्ट करतानाच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी सध्या होणारी वक्तव्ये दुदैवी असून या वक्तव्यांचा आपण निषेध करतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पुरंदरे यांनी संशोधन केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र बालपणापासून आपल्या मनावर बिंबले आहे. त्यांनी या क्षेत्रात स्वतला वाहून घेत अतुलनीय अशी कामगिरी केली असल्याचे प्रशस्तीपत्रही गडकरी यांनी दिले.

विरोधी पक्षनेतेपदाचा चंद्र भाजपच्या हाती?
संदीप प्रधान
मुंबई, ३० मे

आकाशातील चंद्राप्रमाणे भाजपला हवेहवेसे वाटणारे व सध्या शिवसेनेकडे असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे खेचून घेण्याकरिता भाजपचे नेते हट्ट धरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वी सेनेच्या रामदास कदम यांच्या डोक्यावरील फिरता लाल दिवा भाजपच्या एकनाथ खडसे यांना पळवता येईल. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे गोपीनाथ मुंडे तर शिवसेनेचे प्रताप जाधव, सुभाष वानखेडे हे विधानसभा सदस्य विजयी झाले.

सवलती व घोषणांचा पाऊस पडणार!
मुंबई, ३० मे / खास प्रतिनिधी

सप्टेंबरअखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सोमवारपासून सुरू होणाऱ्या ११व्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती तसेच लोकानुनयाच्या घोषणांवर सरकारचा अधिक भर राहणार आहे. चार जूनला मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात विविध समाज घटकांना खूश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न राहील.
सध्याच्या ११व्या विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबरला संपत आहे.

टीम मनमोहनने आखला शंभर दिवसांचा प्लॅन
नवी दिल्ली, ३० मे/खास प्रतिनिधी

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात राबवावयाचे कार्यक्रम आणि चार जून रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना करावयाच्या अभिभाषणावर आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ७, रेसकोर्स या निवासस्थानी दोन तास चाललेल्या मंत्रिमंडळाच्या या विस्तारित बैठकीत स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रीही उपस्थित होते. मनमोहन सिंग यांनी सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात अंमलात आणावयाच्या कार्यक्रमाची रुपरेषा मांडली आणि प्रत्येक मंत्रालयापुढचे उद्दिष्ट समजावून सांगितले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात मनमोहन सिंग सरकारतर्फे हाती घेण्यात येणाऱ्या वर्षभरातील कार्यक्रमांचा तसेच काँग्रेस आणि युपीएच्या घटक पक्षांच्या धोरणांचा समावेश असेल. जागतिक मंदीवर मात करण्यासाठी करावयाच्या आर्थिक उपाययोजना, समाजातील कमकुवत घटकांच्या हितासाठी राबवावयाच्या योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेविषयी अभिभाषणात भाष्य होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर वर्णद्वेषापोटी होत असलेल्या हल्ल्यांबद्दल पंतप्रधानांनी या बैठकीत चिंता व्यक्त केली. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधांनाची भेट घेऊन आयला वादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालला मदत करण्याविषयी विनंती केली.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी