Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

नांदेड व कुंडलवाडीत शोककळा
परिवहन लेखाधिकारी कोंडावार यांची हत्या
नांदेड, ३० मे/वार्ताहर
औरंगाबाद येथील प्रादेशिक परिवहन विभागात कार्यरत असलेल्या लेखाधिकारी डी. एस. कोंडावार यांच्या हत्येने त्यांच्या मूळ गावी म्हणजेच कुंडलवाडी आणि नांदेड शहरात शोककळा पसरली आहे. शिवाय नांदेड येथील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र शब्दात निषेध केला आहे. औरंगाबादच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखाधिकारी असलेले डी. एस. कोंडावार हे जिल्ह्य़ातल्या कुंडलवाली येथील रहिवासी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर ते कोषागार कार्यालयात सहायक लेखाधिकारी म्हणून रुजू झाले.

अपहारामुळेच झाला गोळीबार
औरंगाबाद, ३० मे/खास प्रतिनिधी

अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लिपिक असलेल्या आर. बी. तायडे यांनी रोखपाल म्हणून सव्वाबारा लाख रुपयांचा अपहार केला. या अपहारामुळेच आर. बी. तायडे यांचे चिरंजीव सचिन तायडेला गोळीबार करावा लागला. अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांची बनावट नोंदणी, पैसे पळविणे आणि बोगस परवाने असा प्रकार सर्रासपणे होत होता. आर. बी. तायडे हे २००४ मध्ये अंबाजोगाई कार्यालयात रुजू झाले. मुंबईच्या महालेखापालाच्या तपासणीमध्येच आर. बी. तायडे यांचा अपहार उघड झाला.

हे सारे कोठे जाते?
शाळा. पाटी. पुस्तक. लेखन-वाचन. कळायला लागलं की, अनेकांचा या शब्दांशी संबंध येतो. त्या वस्तूंशी तो येणं अपरिहार्य बनतं. शाळेतलं सोडून दुसरं कसलं तरी पुस्तक असंच कधी तरी हाती लागतं. गोष्टींचं, गाण्यांचं. परिकथा, धमाल कथा, पौराणिक कथा, बडबड गाणी. काही भाग्यवंतांनाच त्याचं वेड लागतं. वय वाढतं, तसं ते वेडही वाढतं. वाचनाचे प्राधान्यक्रम बदलतात. आवडते लेखक नावडते होतात. नावडते आवडते.

परभणी जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
परभणी, ३० मे/वार्ताहर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केला असून, एकूण २४ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभाजन होणार की नाही या बाबतची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू असतानाच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने विभाजनाच्या मुद्दय़ावरच आता पडदा पडला आहे. बँकेच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास लगेचच सुरुवात होत आहे. तहसील कार्यालयात ८ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.

लहान येथेही अखेर बाटली आडवी
नांदेड, ३० मे/वार्ताहर

लोहा तालुक्यातल्या माळाकोळी पाठोपाठ आज अर्धापूर तालुक्यातल्या लहान येथील दारूबंदीचे आंदोलन यशस्वी झाले. ग्रामसभेत १३०० पैकी सुमारे ११०४ महिलांनी दारूबंदीच्या समर्थनार्थ मतदान केल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागातील महिला दारूबंदीसाठी सरसावल्या आहेत. लोहा तालुक्यातल्या माळाकोळी येथील दारूबंदीचे आंदोलन संपूर्ण मराठवाडय़ात गाजले होते. अनेक ठिकाणी महिलांची मागणी असूनही केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दारूबंदीसाठी अडचणी येत आहेत.

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे ९ जूनपासून मुंबईत उपोषण
परभणी, ३० मे/वार्ताहर
राज्य ग्रंथालय परिषदेच्या बैठकीत वेतनश्रेणी व सेवाशर्तीसंबंधी निर्णय न झाल्याने राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी ९ जूनपासून मुंबईत आझाद मैदान येथे उपोषणास बसणार आहेत. राज्य ग्रंथालय परिषदेच्या बैठकीत ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना वाटाण्यांच्या अक्षदा लावण्यात आल्या. वेतनश्रेणी व सेवाशर्तीबाबत चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु या बैठकीत कुठलाही निर्णय न झाल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत. सरकारच्या या कृतीच्या विरोधात राज्यातीलग्रंथालय सेवक १ जूनला जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देऊन मुंबई येथे ९ जूनला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. कार्यकर्त्यांनी ९ जूनला मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा विभाग कर्मचारी संघाचे अध्यक्ष दशरथ क्षीरसागर , कार्याध्यक्ष राम मेकले, सचिव विलास शिंदे , सतीश टाकळकर , दिगंबर मोकाटे , सिद्धलिंग कीर्तनकार , विश्वंभर गणाचार्य लक्ष्मण मोरे आदींनी केले आहे.

जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या दुकानावर छापा
हिंगोली, ३० मे/वार्ताहर
येथील गोपाल मशिनरी अ‍ॅण्ड सीड्स य खत, बी-बियाणे विक्री करणाऱ्या दुकानावर कृषी विभागाच्या पथकाने छापा घालून माल विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गोपाल मशिनरी व सीड्स या दुकानात जादा दराने बियाण्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती कृषी अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी एक बनावट ग्राहक त्या दुकानात बियाणे खरेदीसाठी पाठविले असता राशी-२च्या बियाण्यांची किंमत ६५० रुपये असताना ग्राहकाकडून १२०० रुपये तर राशी-१ची किंमत ७५० असताना त्याच्याकडून ८५० रुपये जादा दराने बियाणे विक्री झाल्याचे निष्पन्न झाले. कृषी अधीक्षक मधुकर पन्हाळे व कृषी उपअधीक्षक पी. एस. बरदाळे यांनी या दुकानावर छापा घालून माल विक्री बंद करण्याचे आदेश दिले व दुकानातील या दुकानात बियाण्यांचा ५० बॅग आढळून आल्या. उशिरापर्यंत पुढील कारवाई चालू होती.

सोयगाव तालुक्यातील धरणांची पातळी खालावली
सोयगाव, ३० मे/वार्ताहर
कडक उन्हामुळे तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून ९ प्रमुख धरणांपैकी केवळ सोयगाव धरणात जेमतेम पाणी असून बाकी तलावात आता केवळ आरक्षित साठा आहे. मागील वर्षी जेमतेम पावसामुळे जलसाठय़ात विशेष वाढ झाली नाही. वर्षभर केवळ पिण्यासाठी वापरण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. तालुक्यातील सोयगाव, बनोटी, वरठाण, हनुमंतखेडा, अंजना, गोंदेगाव, वरखेडी, देव्हारी, जंगलातांडा या मध्यम प्रकल्पांपैकी केवळ सोयगावच्या धरणात जेमतेम पाणी आहे. मे महिन्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून चार गावांत पाण्याचे टँकर सुरू आहेत. जंगलातांडा येथील संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या एकमेव विहिरींनी तळ गाठल्याने गावात टँकर चालू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

‘संबोधी’ चा उद्या सामूहिक विवाह
परभणी, ३० मे/वार्ताहर
संबोधी अकादमी व महिला बाल विकास विभाग, राज्य सरकारत्च्यावतीने दहावा सामूहिक विवाहसोहळा सोमवारी (दि.१ जून) होणार आहे. हा विवाहसोहळा महात्मा फुले हायस्कूल, जिंतूर रस्ता येथे आहे. या विवाहसोहळ्यास राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्या. सी. एल. थुल, जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे, ब.स.प.चे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश साखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. डी. वळवी, जिल्हा पोलीस अधीक्षक रघुनाथ खैरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. बी. कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या विवाहसोहळ्यात १०० जोडपे विवाहबद्ध होणार आहेत.

छत्रपती राजर्षी शाहू बँक उत्कृष्ट
बीड, ३० मे/वार्ताहर
महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक असोसिएशनने उत्कृष्ट नागरी बँकांसाठी आयोजित स्पर्धेत छत्रपती राजर्षी शाहू नागरी सहकारी बँक अव्वल ठरली आहे. छत्रपती राजर्षी शाहू बँकेने असोसिएशतर्फे घेतलेल्या उत्कृष्ट नागरी बँक स्पर्धेत अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. २००७-०८ या वर्षांचा वसंतदादा पाटील पुरस्कार बँकेला मिळाल्याचे नुकतेच राज्य असोसिएशनने बँकेला कळवले आहे. सलग तीन वर्षे बँक मराठवाडय़ात अव्वलस्थानी राहिली आहे. बँकेच्या या कार्याचा अभिमान असल्याचे व्यवस्थापक अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील, अध्यक्ष सत्यनारायण लोहिया, उपाध्यक्ष अजय पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. चंदनशिव यांनी सांगितले.

प्रा. आवचार तिसऱ्यांदा नेट परीक्षा उत्तीर्ण
परभणी, ३० मे/वार्ताहर
ज्ञानोपासक महाविद्यालयातील प्रा. दीपाली आवचार या युजीसीतर्फे डिसेंबर २००८ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अधिव्याख्याता पात्रता परीक्षेत तिसऱ्यांदा हिंदी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार गणेश दुधगावकर यांनी अभिनंदन केले.

दुधगावकर यांनी घेतली शिवसेनाप्रमुखांची भेट
परतूर, ३० मे/वार्ताहर

परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार खासदार गणेशराव दुधगावकर यांनी अलीकडेच मुंबईत जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
खासदार झाल्यानंतर दुधगावकर यांची बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ही पहिलीच भेट होती. या वेळी परतूरचे शिवसेना आमदार तथा विधान परिषद सदस्य सुरेशकुमार जेथलिया, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल उपस्थित होते.

राजपिंपरीत चार लाखांचे चंदन पकडले
गेवराई, ३० मे / वार्ताहर

बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने राजपिंपरीतील मोरे वस्तीवरील एका घरावर छापा घालून सुमारे चार लाख रुपये किमतीचे १६२ किलो चंदन गुरुवारी पकडले. तालुक्यात अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. मनोहर मोरे याच्या घरी हे चंदन आढळल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक लखमी गौतमी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हय़ातील अवैध धंदे काही महिने बंद झाले. मात्र तालुक्यात सर्वत्र अवैध धंदे बोकाळले आहेत. बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने शेतकऱ्यांच्या शेतातून चोरून आणलेले चंदन राजपिंपरी येथील मोरे वस्तीवर छापा घालून पकडण्यात आले. या ठिकाणी वजन चार पोत्यांमध्ये १६२ किलो चंदन सापडले. त्याची किंमत ३ लाख ५६ हजार एवढी आहे. आरोपीविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.

आर्थिक मदत देण्याची फळबागधारकांची मागणी
परभणी, ३० मे / वार्ताहर
गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पालम तालुक्यातील संत्री, मोसंबीच्या फळबागा वाळून गेल्या आहेत. त्यामुळे या फळबागाधारकांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने यंदा उन्हाळ्यात विहिरी-बोअर इतर पाण्याचे स्रोत कोरडे पडले. त्याचा चटका फळबागांना बसला. पारंपरिक शेतीला सोडून अनेकांनी फळबागांची लागवड केली होती. मात्र या वर्षी पाण्याअभावी या फळबागा करपल्याने फळबागधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे या सर्व फळबागधारकांना हेक्टरी साठ हजारांची आर्थिक मदत देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर भगवान करंजे, वामन बरडे, बालाजी बरडे, बालाजी शेटी, सोपान शिनगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मुंबई, पुणे व ठाणे संघात आज अंतिम लढत
नांदेड, ३० मे / वार्ताहर
जिल्हा हौशी बास्केटबॉल संघटना व महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना यांच्यावतीनेआयोजित ६०व्या ज्युनियर महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल स्पर्धेत आज (रविवार) पुरुष गटात मुंबई विरुद्ध पुणे तर महिला गटात पुणे विरुद्ध ठाणे संघात अंतिम लढत होणार आहे. नांदेडच्या गुरु गोविंदसिंगजी स्टेडियम परिसरात गेल्या तीन दिवसांपासून राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा सुरू आहेत. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पुरुष गटांत पुणे संघाने अहमदनगरचा ८१-५६ ने पराभव केला. मध्य मुंबई संघाने ७२-६५ च्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. महिला गटात पहिला उपांत्य सामना नाशिक विरुद्ध पुणे संघात झाला. पुणे संघाने नाशिक संघाचा ६२-२४ अशा फरकाने विजय मिळवला. दुसरा उपांत्य सामना नागपूर विरुद्ध ठाणे असा झाला. ठाणे संघाने नागपूरचा ५५-२० अशा फरकाने धुव्वा उडविला.

रानडुकराच्या हल्ल्यात चौघे जखमी
भोकर, ३० मे/वार्ताहर

तालुक्यातील किनी परिसरात रानडुकराने धुमाकूळ घातला असून दोन दिवसांत रानडुकराने केलेल्या हल्ल्यात चारजण जखमी झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २९ मे रोजी किनी परिसरात शेतात असलेल्या श्रीनिवास दयलवाड (२०),साधना रामल्लू टोकलवाड (६०) या दोघांवर गावालगतच रानडुकराने हल्ला करून जखमी केले तर ३० मे रोजी सकाळी प्रातर्विधीसाठी गेलेल्या गंगारेड्डी पेंटमवाड (५०) यांच्यावर हल्ला करून रानडुकराने किनी गावात धुमाकूळ घालून परशुराम मारुती मिरेवाड (४०) यासही जखमी केले. दोन दिवसांत किनी येथील चार जणांना रानडुकराने जखमी केले आहे.

खरीप हंगामासाठी पीककर्ज द्यावे - पाटील
औरंगाबाद, ३० मे / खास प्रतिनिधी

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू होत असून अद्यापही जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वि.का.स. संस्थेमार्फत पीककर्जाचे वाटप सुरू झालेले नाही. हे वाटप तात्काळ सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. किशोर पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्याकडे केली आहे. सध्या शेतकरी अडचणीत असून खरीप हंगामासाठी बी-बियाणे रासायनिक खते खरेदीसाठी त्यास कर्जाच्या रुपाने मदत होणे गरजेचे आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत पीक कर्जासाठी जाचक अटी व नियम घालून देण्यात आले आहे. यामध्ये शिथिलता आणून कर्जवाटप तत्काळ सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर राष्ट्रवादीने उपोषण करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. जिल्हाध्यक्ष प्रा. किशोर पाटील, उपाध्यक्ष रंगनाथ काळे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांना भेटले.

कोंडावर यांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्मचारी काळ्या फिती लावणार
औरंगाबाद, ३० मे/खास प्रतिनिधी

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील लेखाधिकारी डी. एस. कोंडावार यांच्यावर झालेल्या अमानवी हल्ल्याचा निषेध करून महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील सर्व अधिकारी व कर्मचारी या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. या गंभीर घटनेतील आरोपीला त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून श्रद्धांजलीनंतर संघटनेमार्फत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. एक जूनला लेखा कोष भवनाच्या प्रांगणात सकाळी अकरा वाजता कोंडावार यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या श्रद्धांजलीकरीता अधिकारी, कर्मचारी आणि महासंघाच्या सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वरिष्ठ कोषगार अधिकारी जे. बी. चव्हाण यांनी केले आहे.

परतूर तालुक्यात तीस हजार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके
परतूर, ३० मे / वार्ताहर
सर्वाना शिक्षण मोहिमेत तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण ३१ हजार ८४४ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठय़पुस्तके देण्यात येणार आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या २६ हजार ९८६, सेमी इंग्रजी माध्यमाच्या ७६८ तर ऊर्दू माध्यमाच्या ३ हजार ९० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २००९-१० या शैक्षणिक वर्षांत इयत्ता पहिली ते आठव्या वर्गात शिकणाऱ्या एकूण १२ हजार ७८१ मुलींना मोफत पाठय़पुस्तके देण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जातीच्या २ हजार १४९, अनुसूचित जमातीच्या ५३४ तर उर्वरित १० हजार ९८ मुलींचा समावेश आहे. ऊर्दू माध्यमाच्या ३ हजार ९० तर इंग्रजी (सेमी) माध्यमाच्या ७६८ विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येणार आहेत. मागील वर्षी शाळा सुरु होऊन महिना उलटून गेला तरी अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नव्हती. हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी सर्व मुलांना पुस्तके देण्याची अपेक्षा पालक व्यक्त करीत आहेत.

गुंड पतसंस्थेत अपहार; दहा संचालकांवर गुन्हा दाखल
बीड, ३० मे / वार्ताहर
श्रीधर गुंड नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये झालेल्या १२ लाख ७९ हजार रुपयांच्या अपहार प्रकरणात या संस्थेतील एकूण दहा संचालकांविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आष्टी तालुक्यातील श्रीधर गुंड नागरी सहकारी पतसंस्थेत १२ लाख ७९ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला होता. पतसंस्थेच्या लेखा परीक्षणामध्ये हा अपहार उघडकीस आला.त्यानंतर विशेष लेखा परीक्षक श्रीमंत नाटकर यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिसांत पतसंस्थेच्या दहा संचालकांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संचालकांमध्ये विद्या हनुमंत काकडे, अरुणा अनिल लगड, राम शेळके, प्रताप एरंगळे, श्रीराम काकडे, भारत शिंदे, बाजीराव गुंड, शेख रसूल व शेख जावेद आदींचा समावेश आहे.

परभणीत सामूहिक उपनयन संस्कार
परभणी, ३० मे / वार्ताहर

ब्राह्मण महासंघाच्या वतीने येथे उपनयन संस्कार शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. परभणी जिल्हा ब्राह्मण महासंघाच्या वतीने रंगनाथ महाराज नगरात आयोजित करण्यात आलेल्या या उपनयन संस्कार सोहळ्यात काल ५२ बटूंचा उपनयन संस्कार शंकराचार्य यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे या सोहळ्यात मातृभोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.एकाच वेळी १०० जणींना जेवण घालता यावे, अशी भव्य व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी खास इंदूर येथून आसन व्यवस्था मागविण्यात आली होती. हा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महासंघाचे अध्यक्ष विजय पिंगळे, डॉ. संदीप नरवाडकर, बंडू सराफ, भानुदास पडगावर, अनिल मुदगलकर, प्रफुल्ल चामणीकर, धर्माधिकारी, उदय लाखकर, सूर्यकांत जोशी यांनी प्रय घेतले.