Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

(सविस्तर वृत्त)

अमिताभने नाकारली ऑस्ट्रेलियाची ‘डॉक्टरेट’
नवी दिल्ली, ३० मे/पी.टी.आय.

 

भारतीय विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियामध्ये वांशिक विद्वेषामुळे होत असलेल्या हल्ल्याचा निषेध ‘बीग बी’ अमिताभ बच्चन यांनी केला आहे. ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठाद्वारे देण्यात येणारी ‘मानद डॉक्टरेट’ ही पदवीही त्यांनी नाकारली आहे. ब्रिस्बेनमधील ‘क्वीन्सलॅँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’तर्फे अमिताभ बच्चन यांना मनोरंजन उद्योगातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ‘मानद डॉक्टरेट’ देण्यात येणार होती. गेल्याच आठवडय़ात याबाबतचा प्रस्ताव बच्चन यांनी स्वीकारला होता. जुलै महिन्यात त्यांच्या सन्मानार्थ योजण्यात आलेल्या एका चित्रपट सोहळ्यामध्ये त्यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार होती. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचे दृक-श्राव्य माध्यमांतील वृत्तांकन पाहून मला प्रचंड धक्का बसला असून, ऑस्ट्रेलियातील त्या दुर्दैवी विद्यार्थ्यांबाबत दुख वाटत आहे. जी संस्था माझा गौरव करीत आहे त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणताही अनादर नाही, मात्र सद्यस्थितीत माझ्या देशातील नागरिकांना ज्या देशामध्ये अमानवी अन्यायाला सामोरे जावे लागत आहे, त्या देशाकडून सन्मान स्वीकारणे माझ्या तत्त्वात बसत नाही. असे कृत्य म्हणजे माझ्या देशातील नागरिकांचा अपमान आहे, असे बच्चन यांनी आपल्या ताज्या ‘ब्लॉगपोस्ट’मध्ये लिहिले आहे.
गेल्या आठवडाभरात ऑस्ट्रेलियात चार भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झाले आहेत. या हल्ल्यातील आंध्र प्रदेशमधील श्रवण कुमार हा २५ वर्षीय विद्याथ्र्यी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्युशी झुंज देत आहे.