Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

(सविस्तर वृत्त)

बारावीचा निकाल ४ जूनला
मुंबई, ३० मे / प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २००९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल ४ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजल्यापासूनच मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल बघता येईल. त्याच दिवशी विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांत गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार नाही.
या परिक्षेला संपूर्ण राज्यातून एकूण ५३०१ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ११ लाख ८४ हजार २२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ६ लाख ९० हजार १३९ विद्यार्थी आणि ४ लाख ९४ हजार ८७ विद्यार्थीनी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे त्यांनी १५ जून २००९ पर्यंत विहित शुल्कासह संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर २००९ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी अंतिम मुदत १५ जून २००९ आहे तर विलंब शुल्कासह अर्ज २२ जून पर्यंत कनिष्ठ महाविद्यालायाकडे सादर करावेत, असे मंडळाच्या पत्रकात सांगण्यात आले आहे. परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परिक्षेस बसण्याची संधी मार्च २००८ पासून लागू करण्यात आली आहे. त्याचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतील, असे मंडळाने कळविले आहे.