Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रपती, स्थिरावलात ना..
आता तरी कसाब, अफझलला फाशी द्या!
मुंबई, ३० मे/प्रतिनिधी

 

राष्ट्रपतीजी, आता आपल्याला राष्ट्रपती भवनात दोन वर्ष होत आहेत. आपण स्थिर झालात व केंद्रात स्थिर सरकारही आले. आता तरी कसाब आणि अफझल या दोन नराधमांना तात्काळ फासावर लटकवा व जनतेच्या भावनांचा आदर करा, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना कठोर शब्दांत सांगितले आहे.
प्रतिभा पाटील या मराठी असल्याने त्यांना भाजपचा विरोध पत्करून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळी अफझलला फाशी देण्याबाबत राष्ट्रपतींनी भूमिका घ्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्याची आठवण ठाकरे यांनी पाटील यांना करून दिली. कसाब आणि अफझल हे जणू भगतसिंग-राजगुरू असल्याप्रमाणे त्यांच्या चर्चा मीडियात सुरू आहेत. हा निर्लज्जपणा थांबवायला हवा व शहीदांची चेष्टा न चालविता कसाब, अफझलला फासावर लटकविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे एक शिष्टमंडळ लवकरच राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे म्हणाले की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीकरिता नेमलेल्या राम प्रधान समितीचा अहवाल व सध्या सुरू असलेला कसाबचा खटला म्हणजे मूळ मुद्दय़ांपासून लोकांना दूर नेण्याचा प्रकार आहे. करकरे, कामटे, साळसकर, शिंदेंसारख्या अनेक अधिकाऱ्यांची हत्या कसाबने केली. सरकार व पोलीस दल सक्षम असते तर इतके बळी गेले नसते. मात्र या भीषण हल्ल्याची जबाबदारी कुणावरही न टाकता सर्वानाच मोकळे रान प्रधान समितीने दिले. मग या पोलीस अधिकाऱ्यांना कसाबने मारले नसून त्यांनी स्वतच आत्महत्या केल्या असे प्रधानांच्या सरकारी समितीला म्हणायचे आहे काय? नराधम कसाबचे इतके लाड कशासाठी चालले आहेत, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, त्याला बचावाची संधी देऊन एकप्रकारे दहशतवादी हल्ल्यातील बळींची व हुतात्म्यांची चेष्टाच सरकारने चालविली आहे. ज्या कसाबला फासावर लटकवायचे त्याच्या सुरक्षेकरिता कोटय़वधी रुपयांचा खर्च का केला जात आहे? पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रे देण्यावरील खर्च लालफितीत अडकतो मग कसाबवरील खर्च कोणत्या नियमात बसतो? दहशतवादी हल्ल्यानंतर विलासरावांना मुख्यमंत्रीपदावरून जावे लागले. त्यांनाच केंद्रात मंत्रिपदाची बक्षिसी देऊन काँग्रेसने शहिदांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.