Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

(सविस्तर वृत्त)

शिवशाहीर पुरंदरेंना नितीन गडकरींचे प्रशस्तीपत्र
नाशिक, ३० मे / प्रतिनिधी

 

छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असल्याचे स्पष्ट करतानाच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी सध्या होणारी वक्तव्ये दुदैवी असून या वक्तव्यांचा आपण निषेध करतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पुरंदरे यांनी संशोधन केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र बालपणापासून आपल्या मनावर बिंबले आहे. त्यांनी या क्षेत्रात स्वतला वाहून घेत अतुलनीय अशी कामगिरी केली असल्याचे प्रशस्तीपत्रही गडकरी यांनी दिले.
बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी राजकीय हेतूने होणाऱ्या वक्तव्यामुळे संघर्ष निर्माण होवून महाराष्ट्राचे नुकसान होवू नये, अशी आपली भूमिका आहे. पुरंदरे यांच्याविषयी सर्वानीच आदरभाव राखला पाहिजे. राजकीय हेतूने होणाऱ्या या वक्तव्याला राज्यातील जनता बळी पडणार नाही, असेही ते म्हणाले. मनसे-भाजपच्या सलोख्याबाबत छेडले असता या प्रश्नाला मात्र गडकरी यांनी बगल दिली. लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपने चांगली कामगिरी केली आहे. तसेच त्यात सुधारणा करण्याची आणखी संधी असल्याने आगामी विधानसभा निवडणुका सेना-भाजप एकत्रित लढविणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
भाजपच्यावतीने दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण व प्रतापदादा सोनवणे यांचा सत्कार गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपची राज्यात चांगली कामगिरी झाली असली तरी विधानसभा निवडणुकीसाठी यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करावयाची असल्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले. विधानसभेची निवडणूक सोपी नसून पक्षापुढे मताधिक्य वाढविण्याचे आव्हान असल्याने त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयाने विधानसभेत कुणी गाफील राहू नका. विधानसभेसाठी या दोन्ही मतदारसंघात बारा विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी आठ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले पाहिजे अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. उपमहापौर अजय बोरस्ते यांच्या ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करिअर महामेळाव्यासही गडकरी यांनी हजेरी लावली.