Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेसमधील फितुरी ठेचून काढू
नारायण राणे यांचा पुन्हा हल्लाबोल
रत्नागिरी, ३० मे/खास प्रतिनिधी

 

निवडणुकीमध्ये नीलेश यांना मिळालेल्या मताधिक्याबाबत मी अजिबात समाधानी नाही. माझ्या अपेक्षेनुसार सुमारे दीड लाख मतांनी हा विजय व्हायला हवा होता. पण तसे न होण्यास भाजप-सेना युती कारणीभूत नसून काँग्रेसमधील फितुरांमुळेच हा फटका बसला आहे, असा स्पष्ट आरोप राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीतच केल्यामुळे नवा वाद रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार नीलेश राणे यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज येथे झाला. याप्रसंगी बोलताना राणे यांनी पुन्हा एकदा तोफ डागली. ते म्हणाले की, युतीचे उमेदवार सुरेश प्रभू यांच्यासाठी काँग्रेस पक्षातील एक गट कार्यरत होता, अशी माझी माहिती आहे. हे फितूर कोण, हेही मला माहित आहे. मी त्यांना सोडणार नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षश्रेष्ठींपर्यंत हा प्रश्न धसाला लावला जाईल आणि अशी प्रवृत्ती ठेचून काढली जाईल.
दरम्यान, कोकणच्या विकासासाठी सर्वतोपरी सहाय्य आणि सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. कोकणातील विविध प्रश्नांबाबत विचारविनिमय करून उपाययोजना सुचवण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशींवर अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कोकणासाठी विशेष पॅकेज दिले जाईल. राज्य मंत्रिमंडळाची बैठक लवकरच कोकणामध्ये घेण्याचा मनोदय आहे. या बैठकीमध्ये अशा स्वरूपाच्या पॅकेजला मूर्त स्वरूप दिले जाईल.
कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याची मागणी पुन्हा लावून धरली जाईल. तसेच स्वतंत्र माध्यमिक शिक्षण मंडळाचीही निर्मिती लवकरच करण्यात येईल. श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला निधी उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.