Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

(सविस्तर वृत्त)

विरोधी पक्षनेतेपदाचा चंद्र भाजपच्या हाती?
संदीप प्रधान
मुंबई, ३० मे

 

आकाशातील चंद्राप्रमाणे भाजपला हवेहवेसे वाटणारे व सध्या शिवसेनेकडे असलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे खेचून घेण्याकरिता भाजपचे नेते हट्ट धरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वी सेनेच्या रामदास कदम यांच्या डोक्यावरील फिरता लाल दिवा भाजपच्या एकनाथ खडसे यांना पळवता येईल.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे गोपीनाथ मुंडे तर शिवसेनेचे प्रताप जाधव, सुभाष वानखेडे हे विधानसभा सदस्य विजयी झाले. त्यामुळे त्यांना विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. परिणामी विधानसभेत सध्या भाजपचे ५३ आणि शिवसेनेचे ५४ सदस्य आहेत. स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप यांचा भाजपला पाठिंबा असल्याने दोन्ही पक्षाच्या सदस्यांची संख्या ५४ होते. विरोधी पक्षातील दोन्ही पक्षांची सदस्य संख्या समान असल्यावर विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जावे यामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या शब्द अंतिम ठरू शकतो. अशा परिस्थितीत दादा भुसे यांच्यासारख्या अपक्षाची मदत घेऊन शिवसेना विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे राखू शकते. मात्र उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासोबत असलेले व अजून तांत्रिकदृष्टय़ा शिवसेनेत असलेले विनायक निम्हण, माणिकराव कोकाटे, राजेंद्र राऊत हे तीन आमदार कोणती भूमिका घेतात याला महत्व प्राप्त होणार आहे.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा शिवसेनेचे संख्याबळ घटल्याचे लक्षात येताच भाजपचे नेते प्रमोद महाजन व नितीन गडकरी यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपद भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांना देण्याची मागणी केली होती. ठाकरे यांनी ही मागणी तोंडदेखली मान्य केली मात्र प्रत्यक्षात विरोधी पक्षनेतेपदावरील दावा सोडला नाही. त्यामुळे महाजन-मुंडे शिवसेनेवर नाराज झाले होते. आज महाजन हयात नाहीत तर मुंडे हे दिल्लीच्या गाडीत बसले आहेत. आता भाजपच्या एकनाथ खडसे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद चालून येऊ शकते. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, सरचिटणीस विनोद तावडे कोणती भूमिका घेतात याकडे आमदारांचे लक्ष लागले आहे. विनोद तावडे यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नारायण राणे यांनी शिवसेनेत असलेल्या आपल्या तीन समर्थक आमदारांची मते दिली होती. आता भाजपकडे विरोधी पक्षनेतेपद खेचून आणण्याकरिता तावडे आपले वजन खर्च करणार का, असा सवाल भाजप विधिमंडळ पक्षात केला जात आहे. प्रभुरामचंद्रांनी चंद्र मागितला तेव्हा त्यांना तो आरशातील प्रतिबिंबाच्या रुपाने मिळाला होता. रामसेवकांना शिवसैनिक कोणता आरसा दाखवतात त्याबद्दल कुतूहल आहे.