Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

(सविस्तर वृत्त)

मराठय़ांच्या राजकीय आरक्षणाला पवारांचा पूर्ण विरोध
सांगोला, ३० मे/वार्ताहर

 

मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र होत चालला असतानाच केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठय़ांच्या राजकीय आरक्षणाला आपला पूर्ण विरोध असल्याचे जाहीर केले आहे. पंढरपूर येथे उमा महाविद्यालय पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व मतदारांचे आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रसंगी केंद्रिय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते.
मुंबईतील नियोजित शिवस्मारकावरून सुरू झालेल्या वादावर पवारांनी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विनायक मेटे यांनाही अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले. शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद कोणाकडे असावे, समितीचे स्वरूप कसे असेल याचा निर्णय घेण्यास राज्य सरकार सक्षम असून इतरांनी त्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा पवारांनी यावेळी दिला.
पवार म्हणाले, की शेतकऱ्यांनी भविष्यात शेतीचे नियोजन करून कोणत्यावेळी कोणती पिके घ्यावयाचे याचे नियोजन करून शेती करावी. बाजारात मालाला किंमत येईल त्याच पिकाचे उत्पादन करावे. यूपीए सरकारने दोन वर्षांपूर्वी साखर कारखान्यास मदत केली नसती तर देशातील साखर कारखाने व शेतकरी संकटात आला असता पुढील दोन वर्षे ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्याला चांगले दिवस आहेत.