Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

प्रादेशिक

वास्तुरचनाकार विभागातील त्रिकूटाचा ‘घोडेबाजार’ रोखणार!
रावळेंच्या पुनर्नियुक्तीबाबत न्यायालयाला पत्र
मुंबई, ३० मे / प्रतिनिधी
म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देताना प्रति चौरस फुटाने मलिदा मागणाऱ्या वास्तुरचनाकार विभागातील त्रिकूटाचा घोडेबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचे ठरविले आहे. याशिवाय मुंबई मंडळाकडूनही मलिद्याशिवाय फाईली हलविल्या जात नसल्याची अनेक विकासकांची तक्रार असून ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दाऊद टोळीच्या शस्त्रागारावर भुरटय़ा चोराचा डल्ला!
मुंबई, ३० मे / प्रतिनिधी

९१७ जिवंत काडतुसांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मामुली चोराने थेट दाऊद टोळीच्या शस्त्रागारावरच डल्ला मारल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. दाऊद टोळीसाठी जो शस्त्रपुरवठा केला जातो त्यापैकीच ही काडतुसे असावीत, असा संशय व्यक्त केला जात आहे. मकसूद खान या भंगारवाल्याला गुरुवारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या अधिकाऱ्यांनी जिवंत काडतुसांसह अटक केली होती.

‘पहिली सिगारेट ओढण्यापूर्वीच विचार करा’
तंबाखूच्या ‘बळीं’चा सावधानतेचा इशारा
मुंबई, ३० मे / प्रतिनिधी
पहिल्यांदा तंबाखूची एक पुडी वा एक सिगारेट घेताना लोकांना माहीत नसतं, की याचे परिणाम किती भयंकर होतील; पण आम्ही याचे उदाहरण आहोत. आज आमच्यापैकी जवळपास सर्वानीच आपला नैसर्गिक आवाज गमाविला आहे. आमच्यावर कर्करोगाची शस्त्रक्रिया तर झालीय; पण हा रोग परत उद्भविण्याची टांगती तलवारही डोक्यावर आहेच.

व्यवसायाचा अभिमान बाळगा - डॉ. टिकेकर
यूआरएल पुरस्कारांचे वितरण

मुंबई, ३० मे / प्रतिनिधी

‘आपल्या व्यवसायाचा अभिमान बाळगा. त्यासाठी प्रथम आपली स्वत:ची आचारसिंहता निश्चित करा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांनी केले. ‘यूआरएल फाउण्डेशन’तर्फे विविध क्षेत्रांतील मान्यवरांना शिवाजी मंदिर येथे झालेल्समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना सहा महिन्यांची मुदतवाढ
मुंबई, ३० मे / खास प्रतिनिधी

राज्य शासनाच्या शिफारसीवरून केंद्र सरकारने मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. अर्थसंकल्प, विधानसभेच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर विकास कामांना खीळ बसू नये तसेच पाऊस या मुद्दय़ांवर राज्य सरकारने जोसेफ यांना मुदतवाढ द्यावी अशी शिफारस केली होती. जोसेफ हे आज निवृत्त होणार होते. मात्र केंद्र सरकारने त्यांना सहा महिन्यांची म्हणजेच ३० नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जोसेफ यांना मुदतवाढ मिळाल्याने या पदासाठी प्रयत्नशील असलेल्या जे. पी. डांगे व चंद्रा अय्यंगार यांना आणखी सहा महिने वाट पाहावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाचा कॅप्टन बदलण्याऐवजी कायम ठेवावा, असा विचार सरकारच्या पातळीवर झाला. त्यानुसार जोसेफ यांना कायम ठेवण्याचा निर्णय झाला. मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केलेल्या जोसेफ यांच्या अनुभवाचा उपयोग राज्य शासन करून घेणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अजित निंबाळकर व प्रेमकुमार या दोन मुख्य सचिवांना प्रत्येकी सहा महिने तर अरुणकुमार मागो यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. जोसेफ यांनी नंदलाल यांच्या जागी राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी अर्ज केला होता. तसेच केंद्रीय निवडणूक आयुक्तपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. मुख्य सचिवांपाठोपाठ पोलीस महासंचालक विर्क हे जुलैअखेर निवृत्त होत आहेत.

सलमान खान ‘डीआयडी’चा विजेता
मुंबई, ३० मे / प्रतिनिधी

अत्यंत चुरशीच्या झालेल्या ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअ‍ॅलिटी शोच्या विजेतेपदावर सलमान खान याने आपले नाव कोरले.‘झी वाहिनी’बरोबर ५० लाख रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट आणि बोनी कपूरच्या आगामी वॉँटेड चित्रपटात अभिनेता सलमान खानसोबत नाचण्याची संधी या सलमान खानला मिळणार आहे. अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात रंगलेल्या या कार्यक्रमात विजेत्यांची नावे आज घोषित करण्यात आली. द्वितीय क्रमांक अलिशा सिंगने तर तृतीय क्रमांक सिद्धेश पै याने पटकाविला. या स्पर्धेत एकूण १८ स्पर्धकांचा समावेश होता. रेमो डिसूझा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस या तीन नृत्यदिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धकांनी नृत्ये सादर केली. त्यापैकी सलमान खान, अलिशा सिंग, सिद्धेश पै आणि जयकुमार नायर यांनी अंतिम फेरी गाठली होती. सलमानला ८ लाख ९१ हजार ६९३, अलिशाला ८ लाख ४८ हजार १७२ तर सिद्धेश पै याला ७ लाख ७९ हजार ३७६ मते मिळाली. या अंतिम फेरीचे पुन:प्रसारण ३१ मे रोजी दुपारी १ वाजता झी वाहिनीवर करण्यात येणार आहे.

निर्माते-वितरक आणि मल्टिप्लेक्सचालकांमधील वाद मिटण्याची चिन्हे
मुंबई, ३० मे / प्रतिनिधी
हिंदी चित्रपट निर्माते-वितरक आणि मल्टिप्लेक्सचालक यांच्यातील वादामुळे बंद असलेली मल्टिप्लेक्सची कवाडे थोडी किलकिली झाली आहेत. कारण मल्टिप्लेक्सचालकांपैकी ‘बिग सिनेमाज’नी निर्माते-वितरकांच्या अटी मान्य केल्याचे समजते. त्यामुळे हिंदी चित्रपट निर्मात्यांना सिंगल स्क्रीन्सप्रमाणेच ‘बिग सिनेमाज’च्या देशभरातील मल्टिप्लेक्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे निर्माते-वितरकांनी मांडलेल्या इतर अटींचीही पूर्तता करण्यात आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या आठवडय़ात हिंदी चित्रपट निर्माते-वितरकांना एकूण उत्पन्नापैकी ५० टक्के वाटा, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या आठवडय़ात अनुक्रमे ४२.५ टक्के, ३७.५ टक्के आणि ३० टक्के एवढा वाटा मिळणार आहे. गेले सुमारे दोन महिने हिंदी चित्रपट निर्मात्यांनी मल्टिप्लेक्सवर बहिष्कार घातला होता. क्वचित दोन-तीन चित्रपट वगळता लोकप्रिय अभिनेत्यांचे चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्यात आले नाहीत. दरम्यानच्या काळात अनेकदा निर्माते-वितरक आणि मल्टिप्लेक्सचालक यांच्यात चर्चा झाल्या. पण त्यातून कोणताही तोडगा निघालेला नव्हता. आता मात्र हा वाद मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. ‘बिग सिनेमाज’नी या दृष्टीने पहिले पाऊल उचलले आहे. उत्पन्न विभागणीप्रमाणेच, करमणूक कर आणि इतर प्रशासकीय समस्यांचेही समाधान झाले आहे. त्यामुळे मात्र रसिकांना पुन्हा एकदा मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहता येणार आहेत.