Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

वाहतूक पोलिसांना भरचौकात टोळक्याची मारहाण
तिघांना अटक

नगर, ३० मे/प्रतिनिधी

मोटरसायकल मागे घेण्यास सांगितल्याचा राग धरून टोळक्याने शहर वाहतूक शाखेचे शिपाई अनिल पोपट जाधव यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर या टोळक्याने येथील जीपीओ चौकात धुडगूस घातला. विशेष म्हणजे चौकातील उपस्थित नागरिकांनी जाधव यांना सोडविण्यास कोणताही प्रयत्न केला नाही.

साखर धोरणाबाबत स्वतंत्र विभाग सुरू करावा - विखे
राहाता, ३० मे/वार्ताहर

आयात-निर्यात धोरणाचा मोठा परिणाम सहकारी साखर कारखानदारीवर होतो. त्यामुळे प्रत्येक साखर कारखान्याने आता साखरेच्या आयात-निर्यात धोरणाचा विचार करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा, अशी सूचना ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली. विखे सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना श्री. विखे बोलत होते.

सर्व २२ आरोपींना अटकपूर्व जामीन
नगर दूध संघातील अपहार
नगर, ३० मे/प्रतिनिधी
नगर तालुका दूध संघातील २ कोटी २ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी सर्व २२ आरोपींना न्यायालयाने आज अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. जामिनासाठी १३ आरोपींनी काल, तर आज ९ आरोपींनी आपल्या वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज सादर केले. कालच्या अर्जांवर काल युक्तिवाद करण्यात आला. मात्र, न्यायालयाने निर्णय दिला नव्हता. आज दुपारनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश रमेश कदम यांच्यासमोर २२ आरोपींच्या अर्जांची सुनावणी झाली. प्रथमदर्शनी तरी या गुन्ह्य़ात आरोपींचा सहभाग दिसत नाही.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेलारांचा आंदोलनाचा फार्स - पाचपुते
श्रीगोंदे, ३० मे/वार्ताहर

स्वतला राष्ट्रवादीचे नेते म्हणून घेणाऱ्या घनश्याम शेलार यांना कुकडीच्या पाण्याचे काहीही घेणे-देणे नाही. केवळ आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा आंदोलनाचा खटाटोप सुरू असल्याची टीका वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी केली. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने शेलार यांनी पदाचा राजीनामा दिल्याचा आरोप जिल्हा सरचिटणीस प्रा. तुकाराम दरेकर यांनी केला. हे दोन्ही नेते पत्रकारांशी बोलत होते.

पाचपुतेंनी जनतेला वाऱ्यावर सोडले - शेलार
कुकडीच्या पाण्यासाठी ‘रास्ता रोको’

श्रीगोंदे, ३० मे/वार्ताहर

वनमंत्री बबनराव पाचपुते तालुक्यातील जनतेच्या भावनेशी खेळत असून, आजपर्यंत फसव्या घोषणा करून लोकांना भूलविण्याचे उद्योग त्यांनी केले. कुकडीच्या पाणीप्रश्नातही खोटय़ा घोषणा करून आवर्तनासाठी जनतेला वाऱ्यावर सोडले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांनी केली. कुकडीचे शेतीसाठी आवर्तन सोडावे, या मागणीसाठी तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील नगर-दौंड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पिण्यासाठी भंडारदऱ्यात पुरेसा पाणीसाठा
अकोले, ३० मे/वार्ताहर

भंडारदरा धरणात सध्या सुमारे २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाळा लांबला तरी भंडारदऱ्याच्या लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही आणि पावसाळा लवकर सुरू झाला, तर हा पाणीसाठा धरणातील पाणीपातळी वाढण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. एकूण ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात आजअखेर २ हजार १५२ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते.

पाणी-भक्ष्यासाठी बिबटय़ा सैरभैर!
कैलास ढोले
नगर, ३० मे

जिल्ह्य़ातील बिबटय़ांची संख्या अलिकडे स्थलांतरामुळे का होईना वाढत असली, तसेच त्यामुळे पर्यावरणवादी सुखावले असले, तरी बिबटय़ांच्या वाढत्या स्थलांतराने अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. पाणी, शिकार आणि मिलनाचा काळ यामुळे बिबटे सैरभैर होत असल्याचे दिसते. उन्हाळ्यातील तपमानाने वरचे टोक गाठले आहे. अशा वातावरणात बिबटय़ांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातूनच तो मनुष्यवस्तीकडे वळू लागल्याने बिबटय़ा व माणसांत ‘संघर्ष’ सुरू झाला आहे.

फॅन्टसी स्वप्न
माझा पॅरिसचा शिल्पकार मित्र
‘हॅन्स’चा फोन आला,
तो नगरला येतोय
खास ‘अजंठा अन् वेरूळ’ बघण्यासाठी
----------------
त्याच्या सोबत जाण्यासाठी
मी लँडस्केपला लागणारे
रंग, हँडमेड पॅड
तसेच स्केच बुक, कॅमेरा
या सर्व कलासाहित्याची

संघर्ष व सोनचाफा यांचे संमिश्रण
माझे परमित्र बाबा आढाव १ जून २००९ रोजी ऐंशीव्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. ही गोष्ट आम्हा मित्रांच्या व कष्टक ऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आहे. लोहिया यांच्या त्रिसूत्रीमध्ये तुरुंग, फावडा व मतपेटी होती. बाबांनी ती बदलून मतपेटीच्या जागी सोनचाफा आणला. आपल्या प्रांगणातील सोनचाफ्याची फुले काढून भेटेल त्याला ती देणं हा बाबांचा छंद. सुगंधी समाज निर्मितीसाठी बाबा हे करत असावेत. आमच्या दोघांच्याही जीवनाचे ताणेबाणे जणू एकाच हातमागावरचे आहेत. ते दुसऱ्या पिढीपर्यंत नैसर्गिक रीतीने पोहोचले आहेत.

टँकर-मालमोटारीच्या अपघातात १ ठार
संगमनेर, ३० मे/वार्ताहर
दूध वाहतुकीचा टँकर आणि मालमोटारीची समोरासमोर धडक होऊन एक ठार आणि चारजण जखमी झाले. नाशिक-पुणे मार्गावरील कऱ्हे घाटाच्या जवळ आज पहाटे झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मालमोटारीतील प्रवासी बापू दादा दुशिंग (रा. लोहारे) असे अपघातातील मृताचे नाव आहे. गणेश जाधव (१२), रुक्मिणी तुपे (६०), गोरख ढापसे, ताराबाई वेताळ अशी जखमींची नावे आहेत. अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी - पुण्याहून नाशिकडे जाणाऱ्या मालमोटारीवरील (एपी १२ यू ६१२३) चालकाचा ताबा सुटल्याने मालमोटार समोरून येणाऱ्या टँकरवर (एमएच १७ टी ९४४४) आदळली. मालमोटारमध्ये चालकाच्या मागे बसलेले दुशिंग जागीच ठार झाले. जखमींना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

क्रमांक नसलेली दहा रुपयांची नोट
कोपरगाव, ३० मे/वार्ताहर

शहरातील एका व्यापाऱ्याकडे आलेल्या भरण्यात दहा रुपयांच्या नोटेवर क्रमांक नसल्याचे निदर्शनास आले. केंद्रीय सरकारद्वारा प्रत्याभूत भारतीय रिझव्‍‌र्ह बँक चलनी नोटा व्यवहारात आणते.
दहा रुपयांची नोट येथील किराणा व्यापारी गुलशन होडे यांच्याकडील भरण्यात आढळली. त्यांचे बंधू महेश होडे यांना नोटावरील क्रमांक तपासण्याचा छंद आहे. त्यांना ही नोट आढळली. या १० रुपयांच्या नोटेवर डाव्या बाजूस फक्त ५४ क्रमांक आहे. उजव्या बाजूस वर क्रमांकच नाही. नोटेच्या पाठीमागील बाजूस ५४ टी व ७६८ असे क्रमांक तिरप्या रितीने छापले आहेत. त्यामुळे ही नोट विनाक्रमांकाची बाजारपेठेत आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तंटामुक्ती अभियानांतर्गत ८२ गावांना ९८ हजारांचे अनुदान
राहुरी, ३० मे/वार्ताहर
महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानांतर्गत तालुक्यातील ८२ गावांना रजिस्टर बनविण्यासाठी सुमारे ९८ हजार रुपयांचे अनुदान राज्य सरकारने दिले आहे. चार हजार लोकसंख्या असलेल्या गावांना एक हजार व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना दोन हजार रुपये अनुदान धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे. संबंधित गावांना लवकरच धनादेशांचे वाटप करण्यात येईल. तालुक्यातील केसापूर या एकमेव गावाने महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात भाग घेतलेला नाही.यावर्षी या अभियानामध्ये मोकळ ओहोळ, केंदळ बुद्रुक, खडांबे बुद्रुक, कोळेवाडी या गावांनी सर्व तंटे मिटविण्यात यश मिळविले आहे. संभाव्य तंटामुक्त गावांमध्ये गणेगाव, खुडसरगाव, ब्राह्मणगाव भांड, पिंप्री वळण, चंद्रकापूर, वावरथ, कुरणवाडी, दवणगाव, कुक्कडवेढे, वरशिंदे, मल्हारवाडी, धानोरे, ताहाराबाद, तांदुळनेर, निंभेरे आदींचा समावेश आहे. गेल्या वर्षी तालुक्यातील पाच गावांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत पुरस्कार मिळाला होता.

मिरजगाव ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांना ३५ टक्के पगारवाढ
मिरजगाव, ३० मे/वार्ताहर

येथील ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रथमच ३५ टक्के वाढ केल्यामुळे सरपंच डॉ. शुभांगी गोरे, उपसरपंच ई. पी. खेतमाळस व सदस्याचे कर्मचाऱ्यांनी आभार मानले.ग्रामपंचायतीची मासिक सभा काल झाली. सरपंच डॉ. गोरे यांनी व ग्रामविकास अधिकारी विजयकुमार बनाते यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची घोषणा केली. कमी वेतनात हे कर्मचारी आतापर्यंत काम करीत होते. आता त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करणारी मिरजगाव ग्रामपंचायत एकमेव आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.ग्रामपंचायतीचे कर्मचारी नितीन गाडेकर, घोडके, तुपे, देशपांडे, नवले, जगधने व कर्मचारी महिलांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांचे अभिनंदन केले.