Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

राज्य

मी महाराष्ट्राची मुलगी -रेखा
पुरस्काराने झालेला आनंद शब्दातीत - आमिर
पुणे, ३० मे/प्रतिनिधी
‘महाराष्ट्र माझा आहे व मी महाराष्ट्राची मुलगी आहे’ या शब्दांत अभिनेत्री रेखा हिने आपल्या भावना व्यक्त करीत हजारो चित्ररसिकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाचा ‘राज कपूर प्रतिभा गौरव पुरस्कार’ स्वीकारला, तर अभिनेता आमीर खाननेदेखील, मुंबई हे माझे जन्मस्थान आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेल्या राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने मला विशेष आनंद झाला आहे व तो शब्दातीत आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

चार हजार वऱ्हाडींसह डहाणूत रंगला सामूहिक लग्न सोहळा
काही वधू-वरांची मुलेही लग्नाची साक्षीदार
सोपान बोंगाणे
ठाणे, ३० मे

आदिवासी वधू-वरांच्या ४७० जोडय़ा, शेकडो वाजंत्री, १०० स्वयंपाकी आणि पारंपरिक वेष परिधान करून विवाह सोहळ्यास हजर असलेल्या चार हजार आदिवासी वऱ्हाडी मंडळींच्या उत्साही व पवित्र वातावरणात डहाणूच्या लायन्स क्लब मैदानावर आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा काल दुपारी दोनच्या मुहूर्तावर थाटामाटात संपन्न झाला. काही वधू-वरांची चक्क मुलेही आपल्या माता-पित्याच्या लग्नाला अक्षता टाकण्यास हजर होती. हे या विवाहसोहळ्याचे आगळेवेगळे वैशिष्टय़ ठरले.

विधानसभा निवडणुकाही काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करूनच लढवाव्या -दत्ता मेघे
वर्धा, ३० मे / प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करूनच लढवाव्या, असे मत खासदार दत्ता मेघे यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर दिल्लीच्या बैठकीत सहभागी होऊन परतलेले खासदार दत्ता मेघे यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला.वर्धेचा खासदार म्हणून काम करताना वर्धेचा औद्योगिक विकास करण्याला प्राधान्य राहील. पर्यावरण तसेच गांधीभूमीचे पावित्र्य जपून हा विकास केला जाईल.

‘लोकसत्ता’च्या मोहिमेमुळे ग्रंथसंग्रहालय आता डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळच
डोंबिवली, ३० मे/प्रतिनिधी

‘लोकसत्ता’ने साथ दिली नसती तर पालिकेतील उद्दाम अधिकाऱ्यांनी पालिकेचे ग्रंथसंग्रहालय कोठेतरी अडगळीत नेऊन टाकले असते. ‘लोकसत्ता’ने गेले सात दिवस चालविलेल्या मोहिमेमुळे ग्रंथसंग्रहालय आता फडके रोड परिसरातील पालिका कार्यालयाच्या वास्तूत स्थलांतरित करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आता ग्रंथसंग्रहालय सुनीलनगरमध्ये स्थलांतरित करण्यात येणार नाही, या विषयावर महापौर रमेश जाधव, सभापती वामन म्हात्रे ठाम आहेत.

दिवसाढवळ्या औरंगाबादच्या परिवहन कार्यालयात गोळीबार
औरंगाबाद, ३० मे/खास प्रतिनिधी

अपहार करणाऱ्या निलंबित वडिलांना कामावर घ्यावे यासाठी मुलाने औरंगाबादच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन वित्त अधिकाऱ्यास गोळी घालून ठार मारले. ही घटना शनिवारी दुपारी पाऊण वाजता रेल्वे स्टेशन भागातील परिवहन कार्यालयात झाली. वित्त अधिकाऱ्याचे नाव डी. एस. कोंडावार असे आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल असाच थरार परिवहन कार्यालयाने आज अनुभवला.

राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबादमध्ये स्थापणार
औरंगाबाद, ३० मे/खास प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पूर्ण केली आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबाद येथे स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेऊन एक आगळीवेगळी भेट मराठवाडाकरांना दिली आहे. औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने या संदर्भात वारंवार पाठपुरावा केलेला आहे. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. मुख्य न्यायमूर्तीच्या परिषदेत कायदेविषयक शिक्षण आणि प्रशिक्षण यासाठी १९९३ मध्ये नेमण्यात आलेल्या समितीने बंगळुरू येथील नॅशनल स्कूल ऑफ इंडिया युनिव्‍‌र्हसिटीच्या धर्तीवर एक संस्था स्थापन करण्याची शिफारस केली होती.

कोपरखैरणे येथे सिंडिकेट बँकेवर दरोडा
बेलापूर, ३० मे /वार्ताहर

कोपरखैरणे सेक्टर-१५ मधील सिंडिकेट बँकेवर तीन जणांनी आज दुपारी सशस्त्र दरोडा टाकून चार लाख ८० हजारांची रोकड लंपास केली. दुपारी एक वाजता बँक बंद झाल्यानंतर कर्मचारी आतमध्ये रक्कम मोजत होते. अडीच वाजता तीन जण बँकेच्या उघडय़ा दरवाजाद्वारे आत शिरले व त्यांनी आतील सहा कर्मचाऱ्यांना चाकू व बंदुकीचा धाक दाखवून तिजोरीतील चार लाख ८० हजारांची रक्कम चोरून पळ काढला. पोलिसांनी बँकांना दिलेल्या सुरक्षिततेच्या सूचनांना या बँकेने हरताळ फासल्याचे या ठिकाणी निदर्शनास आले आहे. दरम्यान, पोलिसांनी मुंबई व ठाण्याच्या दिशेने शोध पथके रवाना केल्याचे सूत्रांनी सांगितले.

शाहूवाडीजवळील अपघातात चार ठार, तीन जखमी
शाहूवाडी, ३० मे/वार्ताहर

आंबा (ता.शाहूवाडी) येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव टाटा सुमो झाडावर आदळून झालेल्या अपघातात चौघे ठार, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी दोनच्या सुमारास तळवडे गावानजीकच्या अँबी रिसॉर्ट नजीकच्या वळणावर झाला. टाटा सुमोमधील लोक सांगलीचे रहिवासी असून, ते गणपतीपुळ्याला निघाले होते. या अपघातात सुधीर विश्वनाथ सरकाळे (२५), सर्जेराव तानाजी पोवार (२५), प्रियांका धनंजय सरकाळे (२८), संस्कार सर्जेराव पोवार (दीड वर्ष) अशी मृत झालेल्यांची नावे असून, धनंजय विश्वनाथ सरकाळे (वय ३०), नंदा सर्जेराव पोवार (वय २२) सुमोचालक संतोष अथणीकर (वय ३०) अशी जखमींची नावे आहेत.