Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

क्रीडा

नॉनस्टॉप नदाल!
पॅरिस, ३० मे/ पीटीआय

‘लाल मातीतला बादशहा’ अशी बिरूदावली मिरविणार स्पेनचा अव्वल मानांकित राफेल नदाल एकामागून एक विजयाचे शिखर नॉनस्टॉप पादाक्रांत करीत असून त्याने सहजपणे चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याच्याबरोबरच फ्रेंच ओपनच्या पुरुष गटात चौथा मानांकित नोवाक जोकोव्हिक, अ‍ॅन्डी मरे, फर्नाडो वरदास्को आणि निकोल डेव्हिडेन्को यांनी विजयी आगेकूच कायम ठेवली आहे. तर फ्रान्सच्या सातव्या मानांकित गिल्स सिमोन्सला पराभवाचा धक्का बसला आहे. महिलांच्या एकेरीमध्ये रशियाच्या स्वेतलाना कुर्नेत्सोव्हाने तिसरी फेरी जिंकून चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. तर रशियाच्याच चौथ्या मानांकित एलेना दिमेंतिव्हाचा तिसऱ्या फेरीत पराभव झाला आहे.

युद्ध आमुचे सुरू..
लंडन, ३० मे, वृत्तसंस्था

आगामी ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखविण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज झाला असल्याचे या संघाचा कर्णधार रिकी पाँटिंग याने सांगितले. नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत प्रमुख खेळाडूंना भाग घेऊ न देण्याच्या निर्णयामुळे ऑस्ट्रेलिया संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सरावाची चांगली संधी दवडली अशी टीका होत आहे. मात्र पाँटिंग मात्र या टीकेशी सहमत नाही. आयपीएल स्पर्धेत आम्ही भाग घेतला नसला तरी आमचा संघ पूर्ण तयारीनीशीच ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत उतरणार आहे, असे पाँटिंग याने द इंडिपेंडंट या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

मी ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळण्यायोग्य नाही
केव्हिन पिटरसनचा कबुलीजबाब
लंडन, ३० मे / पीटीआय
इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील सर्वात महाग खेळाडू आणि इंग्लंडचा फलंदाज केव्हिन पिटरसनने सर्वाधिक लोकप्रिय ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात खेळण्यासाठी आपण योग्य नसल्याचा कबुलीजबाब दिला आहे. परंतु इंग्लंडमध्ये पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर आपण आपल्या फलंदाजीत नवे परिवर्तन करणर असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. एका वर्तमानपत्राला प्रतिक्रिया व्यक्त करताना पिटरसन म्हणतो की, तुम्ही जितके अधिक ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळाला तितके तुम्ही अधिक चांगले खेळाडू व्हाल.

विश्व ज्युनिअर बॉकिंसग : संदीपचा अंतिम फेरीत पराभव, भारताला एक रौप्य आणि तीन कांस्य
नवी दिल्ली, ३० मे/ पीटीआय
अर्मेनिया येथे सुरू असलेल्या विश्व ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फे रीत पोहोचल्याने संदीपकडून भारतीय रसिकांना सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. पण अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. यावेळी भारताने एक रौप्य आणि तीन कांस्यपदकाची कमाई केली आहे. यापूर्वी २००७ साली झालेल्या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकाविले होते.

भारत-पाकिस्तान सराव सामनालाहोर हल्ल्यातील बाधितांसाठी
मुंबई, ३० मे/ क्री. प्र.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ३ जून रोजी ओव्हल येथे ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी सराव सामना खेळविण्यात येणार असून त्याच्यातून जमा होणारा निधी लाहोर येथे श्रीलंकेच्या संघावर झालेल्या हल्ल्यातील बाधितांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष डेव्हिड मॉर्गन यांनी दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सराव सामन्याला ‘कॅच द स्पिरिट’ असे नाव देण्यात आले आहे. कारण या सामन्यातून जमा होणारा निधी लाहोर येथे श्रीलंकेच्या संघावर झालेल्या हल्ल्यातील बाधित झालेल्या कुटुंबासाठी वापरण्यात येणार आहे. या पैशांमधून बाधित कुटुंबाच्या शिक्षणासाठी निधी उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर आशिया खंडात शांतता राहण्यासाठी आणि खेळाच्या योजनांसाठी या पैशांचा वापर करण्यात येईल, अशी महिती आयसीसीचे अध्यक्ष मॉर्गन यांनी दिली.

भुतियाच्या उत्तरावर मोहन बगानने अजून विचार केलेला नाही- मित्रा
कोलकाता, ३० मे, वृत्तसंस्था
कारणे दाखवा नोटिशीला बायचुंग भुतिया याने पाठविलेल्या उत्तरावर मोहन बगान क्लबने अजून विचार केलेला नाही. क्लबचे जनरल सेक्रेटरी अंजन मित्रा यांनीच आज येथे ही माहिती दिली. ते म्हणाले की, मी कामानिमित्त बरेच दिवस कोलकात्याबाहेर होतो त्यामुळे भुतिया याने पाठविलेले उत्तर मी अजून वाचलेले नाही. क्लबच्या कामानिमित्त मित्रा हे आज परदेशी रवाना होत आहेत. ते परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतरच क्लबच्या कार्यकारिणीची बैठक होईल. त्या बैठकीत भुतियाने पाठविलेले उत्तर विचारार्थ ठेवण्यात येईल. मोहन बगान संघाच्या सराव सत्राला विना परवानगी अनुपस्थित राहिल्याबद्दल मोहन बगान क्लबने भुतिया याला १४ मे रोजी कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. प्रथम भुतियाने या नोटिशीला आपण उत्तर देणार नसल्याचे सांगितले होते. आपल्या फुटबॉलविषयी असलेल्या बांधिलकीबाबत शंका व्यक्त केली गेल्याने आपल्याला मोहन बगान क्लबकडून या पुढे खेळायचेच नाही, असे भुतिया याने पत्रकारांना सांगितले होते.

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सायना सातव्या स्थानावर
नवी दिल्ली, ३० मे/पीटीआय
भारताच्या सायना नेहवालने सुदीरमन चषक स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरीच्या आधारे जागतिक बॅडिमटन क्रमवारीत सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बॅडिमटन महासंघाने जाहीर केलेल्या मानांकनानुसार नेहवाल हिला १० व्या क्रमांकावरून बढती मिळाली आहे. तिचे आता ५८ हजार ४५४.४ गुण झाले आहेत. महाराष्ट्राच्या आदिती मुटाटकर हिने ३७ व्या क्रमांकावरून ३५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. नेहा पंडित मात्र ८७ व्या क्रमांकावर घसरली आहे. पुरुष गटात चेतन आनंद याने १२ वे स्थान राखले आहे तर अरविंद भट याने २६ व्या स्थानावरून २४ व्या क्रमांकावर मजल गाठली आहे. स्पॅनिश स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या पी.कश्यपने ३१ व्या क्रमांकापर्यंत झेप घेतली आहे. सुदीरमन चषक स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे मिश्रदुहेरीत डी.दिजू व ज्वाला गट्टा यांनी दहाव्या क्रमांकावरून नवव्या स्थानानर झेप घेतली आहे.

क्रिकेटचा विकास साधणे हाच एकमेव हेतू-वेंगसरकर
पुणे, ३० मे/ क्री. प्र.
पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा विकास साधण्यासाठीच मी थेरगाव परिसरात स्टेडियमकरिता जागा मागितली होती,असे राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांनी येथे सांगितले. वसंतदादा सेवा संस्थेतर्फे वेंगसरकर यांना आज भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक चंदु बोर्डे यांच्या हस्ते राजीव गांधी क्रीडा पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी वेंगसरकर यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. क्रिकेटचा विकास साधणे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत आजपर्यंत मी प्रयत्न केला आहे. स्टेडियमकरिता जमीन मागितली ते अव्वल दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठीच! पुण्यात क्लब क्रिकेटमध्ये चांगले गुणवत्ता असलेले खेळाडू आहेत. त्यांना अधिकाधिक संधी देण्याची आवश्यकता आहे. बोर्डे यांनीही क्लब क्रिकेटला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून आंतर क्लब स्पर्धेतून गुणवान खेळाडू तयार होतात. या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी देण्याची गरज आहे. या वेळी वसंतदादा सेवा संस्थेचे संस्थापक संजय बालगुडे, पिंपरी चिंचवडचे नगरसेवक श्रीरंग बारणे हे उपस्थित होते.

चार भारतीय बॅडमिंटनपटू उपान्त्य फेरीत दाखल
नवी दिल्ली, ३० मे / पीटीआय
पी. कश्यप, आदित्य प्रकाश, सायली गोखले आणि नेहा पंडित या भारतीय खेळाडूंनी फ्रान्समधील टोलूज येथे सुरू असलेल्या ओपन व्होलांट डी’ओर बॅडमिंटन स्पध्रेतील दुसऱ्या फेरीच्या लढती जिंकून उपान्त्यपूर्व फेरीत मजल मारली आहे.तिसऱ्या मानांकित कश्यपने डेन मार्टिन बिल्ली लार्सनचा २१-१०, २१-१३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. कश्यपची आता गाठ पडेल ती आठव्या मानांकित डेन ख्रिश्चन लिंड थॉमसनशी. डेनने फ्रान्सच्या मॅथ्यू लो यिंग पिंगचा २१-१०, २१-९ असा सहज पराभव केला. स्पॅनिश विजेत्या सायलीने चुरशीच्या लढतीत कॅमिल्ला सोरेनसेनला २१-१८, १६-२१, २१-१६ अशा फरकाने हरविले. सायलीची आता इंडोनेशियाच्या अटू रोसालिनाशी गाठ पडेल. अटूने ऑस्ट्रियाच्या सिमवन प्रुचला २१-१०, २१-११ असे हरविले. आदित्य प्रकाशने हॉलंडच्या रुन मॅसिंगचा १९-२१, २१-१८, २१-१८ असा रंगतदार लढतीत पराभव केला. सहाव्या मानांकित नेहा पंडितने जर्मनीच्या क्लाऊडिया व्होगलग्सँगला १८-२१, २१-१६, २१-११ असे हरविले.

विजेतेपदासाठी पाकिस्तानही दावेदार- आलम
कराची, ३० मे, वृत्तसंस्था

आगामी ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघ बलाढय़ फलंदाजीच्या जोरावर चांगली कामगिरी करून दाखवेल, असा विश्वास पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक इंतिखाब आलम यांनी व्यक्त केला आहे. ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना आलम म्हणाले की, आमच्या खेळाडूंना ट्वेंटी-२० सामन्यांचा भरपूर अनुभव आहे. आमची फलंदाजी ट्वेंटी-२० सामन्यांना पोषक अशीच आहे. त्यामुळेचआमचा संघ या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी दावेदार आहे.