Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

काळा तलावाचा पांढरा हत्ती!
भगवान मंडलिक
कल्याण-डोंबिवलीत ज्या-ज्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचारसभा, उद्घाटन कार्यक्रमानिमित्त आले, त्या-त्यावेळी त्यांनी काळा तलाव विकासाचा मुद्दा आपल्या भाषणातून मांडला. त्यामुळे काळा तलावाचे भाग्य फळफळले आणि या तलावाचे किमान सुशोभीकरण तरी झाले. अन्यथा, कल्याणमधील अन्य प्राचीन ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे काळा तलावही सडत गेला असता. आता त्याची अवस्था भग्नावस्थेत बुजलेल्या तलावासारखी झाली असती.

श्रीपुरी-घारापुरी-एलिफंटा

घारापुरी गुफा किंवा एलिफंटा केव्हज् या जगप्रसिद्ध ठिकाणी असलेल्या भगवान शंकराच्या कोरीव शिल्पांचे आगळ्या पद्धतीने केलेले वर्णन आणि त्या मूर्तींमधील विविध भावमुद्रा यांचा अर्थ देण्याचा वेगळा प्रयत्न लेखक रामदास खरे यांनी केला आहे. त्याची ही क्रमश: लेखमाला.
स्थळ-जिजामाता उद्यान, भायखळा, मुंबई, वेळ-एक टळटळीत दुपार. मी प्रवेशद्वाराजवळील महाकाय पाषाणी हत्तीसमोर नि:स्तब्ध उभा आहे. तो अविचल, मात्र कुठल्यातरी विवंचनेत दिसत आहे. त्याला आता स्पर्श करावा असा मनी विचार. त्याच्या डोळ्यात तर, अवघे कारुण्य साठलेलं!

कलंगुटचा रम्य किनारा
सदाशिव टेटविलकर

शापोरा नदी ते मांडवी नदी दरम्यान बारदेश प्रांत (तालुका) पसरला आहे. बारदेशच्या पूर्वेला आहे डिचोली, तर पश्चिमेला आहे अरबी समुद्र. सागराचे गोमंतकावर विशेष प्रेम जडले असावे, त्यातल्या बारदेशच्या किनारपट्टीवर अधिकच असावे. शापोरा किल्ल्यापासून आग्वाद किल्ल्यापर्यंत व्हेगाटोर बीच, वाघा बीच, अंजुना बीच, कलंगुट बीच, कांदोळी बीच व सिंक्वेरीया बीच असे सहा बीच असून, तेथे मऊसूत तांबूस-सोनेरी पुळणीची पखरण करून निसर्गवेडय़ा पर्यटकांना सागराने भुरळ घातली आहे. येथील कलंगुट बीच हा गोव्यातील प्रसिद्ध बीचपैकी सर्वात लोकप्रिय बीच आहे. याला क्वीन ऑफ बीचेस म्हणजे ‘समुद्र किनाऱ्याची राणी’ असे म्हटले जाते. हॉटेल, रेस्टॉरन्टची रेलचेल, समुद्रस्नान, स्पीड बोटिंग, पॅराग्लायडिंग इत्यादी समुद्रीखेळ व मन लुभावणारा सूर्यास्त आणि पिठुर चांद्रप्रकाशात सागराच्या धीरगंभीर आवाजाने मंत्रमुग्ध होणारा पर्यटक येथे आपोआप खेचला जातो. कलंगुट बीचच्या लोकप्रियतेमुळे येथे तुफान गर्दी होते. तेव्हा निवांतपणे गर्दीचे दिवस टाळूनच येथे आले पाहिजे.

टेलिकॉम क्षेत्राला नवीन सरकारकडून पहिल्या शंभर दिवसांत काय हवे?
डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा दुसरा टप्पा नुकताच पार पडला आणि खातेवाटप जाहीर झाल्यावर टेलिकॉम खाते ए. राजा यांच्याकडेच पुन: आले आहे. या सरकारने पहिल्या १०० दिवसांत काय करावे, या विषयीच्या सूचना सर्वच क्षेत्रांतील मंडळी करीत आहेत. टेलिकॉम क्षेत्रामध्ये मात्र सरकारच्या दूरसंचार खात्याने स्वत:च टेलिकॉम कंपन्यांना २० मे २००९ रोजी पत्र धाडून त्यांच्या सूचना मागवल्या आणि त्याला या कंपन्यांनी तत्परतेने प्रतिसादही दिला. त्यात सर्व प्रकारचे कर कमी करावेत आणि थ्रीजी स्पेक्ट्रमचे वाटप लवकर करावे इत्यादी मागण्या आहेत आणि त्यात आश्चर्यकारक असे काही नाही. परंतु हे ‘उंबरातले किडे मकोडे, उंबरी करीती लीला’ असा हा प्रकार आहे. टेलिकॉम क्षेत्राला ज्या इंडियन टेलिग्राफ अ‍ॅक्ट १८८५ च्या कायद्यानुसार जखडून टाकले आहे, बंदीवान केले आहे, तो कायदाच बदलल्याशिवाय या क्षेत्राची प्रगती होणार नाही. तेव्हा इंडियन टेलिकॉम विधेयक पुढील तीन महिन्यांत सरकारने सादर करावे, असे मला वाटते.

आरोग्य गेले कचऱ्यात
संजय बापट
पाणीटंचाईचा प्रश्न संपूर्ण जिल्ह्यासमोर आ वासून उभा असतानाच खुद्द महापालिकाच लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे धडधडीत पुरावे समोर येत आहेत. वाढते लोंढे आणि त्यातून निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करीत असले तरी लोकांच्या आरोग्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही नकारात्मकच दिसतो. ‘आपल्या घरात घाण नको, दुसऱ्याचे काय व्हायचे ते होवो’ अशी भूमिका सर्वच महापालिका घेत आहेत. परिणामी, पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने जीवघेणी ठरणारी ही घनकचऱ्याची समस्या प्रशासकीय बेफिकिरी आणि राजकीय अनास्थेमुळे सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे.

अत्यवस्थ रस्त्याची अस्वस्थ कहाणी
ठाणे प्रतिनिधी
घोडा का अडला? भाकरी का करपली? पान का सडले? या प्रश्नांचे उत्तर एकच आहे. मुख्य म्हणजे ते ठाऊक आहे, पण ठाणे जिल्ह्यातील ठाणे-बेलापूर या १४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला वाढीव खर्च का यावा? इतका विलंब का व्हावा? आणि या निकृष्ट कामाचा भार करदात्यांनी का सोसावा? या प्रश्नाचे उत्तर ठाणे आणि नवी मुंबईतील नागरिक गेली चार वर्षे शोधत आहेत. उत्तर काही सापडत नाही. प्रश्नही मिटत नाही. आता तर या अत्यवस्थ रस्त्याची अस्वस्थ आत्मकथा लिहिण्याची वेळ आली आहे.

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम
डॉ. नरेंद्र जावळे

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, त्यामुळे उद्भवणारे आजार याची माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. आज ३१ मे.. म्हणजे जागतिक तंबाखूविरोधी दिन होय. आजच्या दिवशी जगातील सर्व आरोग्यप्रेमी संघटना व सुजाण नागरिक तंबाखू सेवनाविरोधी एकत्र येऊन त्याबद्दल जनजागृती मोहीम जनमाणसात पोहोचावी, याकरिता प्रयत्न करीत असतात. आज तंबाखू हे व्यसन उच्चवर्गीय ते तळागाळात पोहोचलेले आहे. मद्यपानाप्रमाणेच यास काही लोकांनी सामाजिक दर्जा बहाल केला आहे. मद्यपान, तंबाखू व वेश्यागमन यासारख्या पूर्वीच्या जमान्यातील वाईट व्यसनांना आज सोशल स्टेटस्् यादृष्टीने पाहिले जात आहे, हे समाज व सामाजिक अध:पतनाचे लक्षण आहे.