Leading International Marathi News Daily

रविवार, ३१ मे २००९

विविध

तालिबान्यांविरोधात पाकिस्तानचा कणखर संघर्ष - पेट्रोस
वॉशिंग्टन, ३० मे / पी.टी.आय.

स्वात खोऱ्यामध्ये व संलग्न परिसरात पाकिस्तानी लष्कराने तालिबान्यांविरोधात चालविलेली कारवाई अधित तीव्र केली असून पाकिस्तानसाठी दहशतवाद्यांचे तेथे असलेले अस्तित्व म्हणजे त्यांनी दिलेला इशारा आहे व पाकिस्तानसाठी हे युद्ध अतिशय कठीण असे आहे, असे वरिष्ठ अमेरिकी लष्करी अधिकारी जनरल डेव्हिड पेट्रोस यांनी सांगितले.

परवडणाऱ्या घरांची निर्मिती हेच उद्दिष्ट; घरबांधणीत खाजगी क्षेत्रालाही सामावून घेणार - सेलजा
नवी दिल्ली, ३० मे/ पी.टी.आय.
गरीब व मध्यमवर्गीय लोकांसाठी परवडणारी घरे बांधणे हे आमच्या सरकारचे प्रमुख लक्ष्य असेल. या गृहनिर्मितीसाठी खाजगी क्षेत्रालाही सामावून घेण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण व शहरी दारिद्रय़ निर्मूलन खात्याच्या मंत्री कुमारी सेलजा यांनी दिली. देशात सुमारे दोन कोटी ५० लाख घरांची आवश्यकता असून लोकांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी सरकार प्रयत्नशील राहील.

लोकसभा अध्यक्षांच्या नावावर काँग्रेसश्रेष्ठींचा खल
किशोरचंद्र देव यांचे
नाव आघाडीवर

नवी दिल्ली, ३० मे/खास प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे खासदार किशोरचंद्र देव यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. आज काँग्रेसच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत देव यांची उमेदवारी तसेच लोकसभेचे उपाध्यक्षपद संसदीय परंपरेनुसार विरोधी पक्षांना देण्याविषयी चर्चा करण्यात आली. आंध्र प्रदेशातील अनुसूचित जमातींसाठी राखीव अराकू लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आलेले डॉ. किशोरचंद्र देव हे चौदाव्या लोकसभेत विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष होते.

गोवा पोलिसांनी केली मुंबईतील पर्यटक मुलामुलींची छळवणूक
पणजी, ३० मे /पी.टी.आय.

गोव्यात पर्यटकांना रात्री फिरण्यास गोव्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी नकार दर्शविला, त्याच्या दुसऱ्या दिवशीच मुंबईच्या पर्यटकांना गोवा पोलिसांच्या छळाचा अनुभव घ्यावा लागला. पोलिसांनी नाकाबंदीच्या नावाखाली थांबवून आम्ही वेश्याव्यवसाय करणारे आहोत असा संशय व्यक्त करीत पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी दिली व त्या पोलिसांना पैसे दिल्यानंतरच आम्हाला सोडण्यात आले, असे मुंबईतील एका पर्यटकांच्या गटाने आपला अनुभव मांडला आहे.

हल्ल्यांप्रकरणी कठोर कारवाई करा
ऑस्ट्रेलियामधील भारतीय विद्यार्थी संघटनेची मागणी
मेलबर्न, ३० मे/पी.टी.आय.
परदेशी विद्यार्थ्यांकरीता ‘असुरक्षित राष्ट्र’ अशी प्रतिमा जगात जाऊ नये हे सध्या ऑस्ट्रेलियासमोर आव्हान असून, संतप्त भारतीय विद्यार्थ्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या आठवडय़ात एका कार्यक्रमावेळी ‘स्क्रू-ड्रायव्हर’ने भोसकलेला श्रवण कुमार हा विद्यार्थी सध्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्युशी लढत आहे. त्याबाबतच्या टीव्हीवरील वृत्तांकनामुळे ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या सुमारे ९५ हजार भारतीय विद्यार्थ्यांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली आहे. विद्यार्थ्यांच्या संघटनेने भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.

अण्वस्त्रे नसती, तर २६/११ हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बचाव अशक्य होता
पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञांची स्पष्टोक्ती
इस्लामाबाद, ३० मे/पी.टी.आय.

अण्वस्त्रसज्जतेमुळेच कारगिल युद्ध, भारतीय संसदेवरील हल्ला आणि मुंबईतील २६/११ हल्ल्यासारख्या घटनांनंतर पाकिस्तानचा आपला बचाव करू शकला, असे पाकिस्तानच्या मुख्य अणुशास्त्रज्ञांनी आज स्पष्ट केले. अणुकार्यक्रमावर देशामध्ये मोठय़ा प्रमाणावर खर्च केला जातो, यावरून चर्चा केली जात आहे. मात्र त्यांना अण्वस्त्रांच्या क्षमतेची कल्पना नाही, असे अणुशास्त्रज्ञ आणि पाकिस्तानच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. सामर मुबारकमांड यांनी आज सांगितले. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे नसती तर कारगिल युद्ध, भारतीय संसदेवरील हल्ला आणि मुंबईतील सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला आपला बचाव करणे अशक्य होते असेही त्यांनी नमूद केले.

कृष्णासह तीन भारतीयांचा एव्हरेस्टदिनानिमित्त गौरव
काठमांडू, ३० मे/पीटीआय
माऊंट एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई करणाऱ्या तीन भारतीय गिर्यारोहकांचा आज येथे नेपाळ पर्यटन विभागातर्फे सत्कार करण्यात आला. निमित्त होते एव्हरेस्ट दिनाचे!
तेनसिंग नोर्गे व एडमंड हिलरी यांनी २९ मे १९५३ रोजी या शिखरावर प्रथम चढाई केली होती. एव्हरेस्टवर माणसाचे ते पहिले पाऊल होते. त्यांच्या या विजयाची आठवण म्हणून गतवर्षीपासून २९ मे हा एव्हरेस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. पुण्याची पहिली यशस्वी महिला गिर्यारोहक कृष्णा पाटील, राजस्थानचा गौरव शर्मा व तापी मारा (अरुणाचल प्रदेश) या तीन भारतीय गिर्यारोहकांचा येथे सत्कार करण्यात आला. तसेच दोन डझन परदेशी गिर्यारोहकांसह १०० सदस्यांचाही गौरव करण्यात आला.भारताच्या ११ गिर्यारोहकांनी ८८४८ मीटर उंचीच्या या शिखरावर २० व २१ मे रोजी यशस्वी चढाई केली होती. कृष्णाने सर्वात लहान भारतीय यशस्वी महिला गिर्यारोहकाचा मान मिळविला तर तापीने बेस कॅम्पपासून ४१ तासांत शिखर गाठून अरुणाचल प्रदेशकडून वेगवान गिर्यारोहक होण्याचा मान मिळविला. गौरव हा राजस्थानचा पहिलाच एव्हरेस्टवीर आहे.

पाटणा येथे अपहरण केलेल्या मुलाची हत्या
पाटणा, ३० मे/पीटीआय

येथील एका नऊ वर्षे वयाच्या मुलाचे त्याच्या दोन शेजाऱ्यांनीच अपहरण केले व त्याची गेल्या गुरुवारी हत्या केल्याचे उघड झाले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज निदर्शने केली. पाटणा येथील कनाकारबाग भागातल्या डून अ‍ॅकॅडमी शाळेत ४ थ्या इयत्तेत शिकणारा सत्यम हा मुलगा पीपल्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील आपल्या घराजवळ खेळताना गुरुवारी संध्याकाळी दिसला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. या सोसायटीजवळ असलेल्या किराणा सामान दुकानाचे मालक अविनाश व मोनू या दोघांना सत्यमचे अपहरण केल्याच्या संशयावरून पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी सत्यमचे अपहरण करुन नंतर त्याची कशा प्रकारे हत्या केली हे त्या मुलाच्या शवचिकित्सेनंतरच कळू शकेल. सत्यमचा मृतदेह पोलिसांनी आज अशोक नगर येथील एका घरातून ताब्यात घेतला. या घटनेने संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी अविनाशच्या किराणा सामान दुकानाची नासधूस केली तसेच टायर पेटवून देऊन रस्त्यावरील वाहतूक अडविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी केलेल्या निदर्शनांमुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता पण पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

स्वातच्या चकमकीत २५ तालिबानी ठार
इस्लामाबाद, ३० मे/पीटीआय

तालिबानी अतिरेक्यांभोवतालचा फास पुरता आवळत पाकिस्ताने लष्कराने आज मिंगोरा शहरावर पूर्ण कब्जा मिळविला. यावेळी झालेल्या चकमकीत तालिबानींच्या दोन वरिष्ठ कमांडरसह २५ अतिरेकी ठार झाले. या महिन्याच्या प्रारंभी स्वात खोऱ्यातील मिंगोरा शहरावर तालिबानी अतिरेक्यांनी कब्जा केला होता. हे शहर पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने गेल्या तीन दिवसांपासून कारवाई अधिक तीव्र केली होती. पाकिस्तानच्या लष्कराचे मुख्य प्रवक्ते मेजर जनरल अत्तार अब्बास यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले की, मिंगोरा शहर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने मोहिम तीव्र करताच तालिबानी अतिरेक्यांनी गोळीबारास प्रारंभ केला. मात्र आपण चारी बाजूंनी घेरले गेलो आहे हे लक्षात येताच अतिरेक्यांनी फार जोरकसपणे प्रतिकार केला नाही. यावेळी झालेल्या चकमकीत किती अतिरेकी व लष्करी जवान मृत किंवा जखमी झाले याबद्दल लष्कराच्या प्रवक्त्याने माहिती देण्याचे टाळले. मात्र पुरेशा औषधांसह २० डॉक्टरांचे एक पथक मिंगोरा शहरात पोहोचले असून वैद्यकीय मदतकार्य सुरू झाले आहे असे या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान पाकिस्तानचे माहितीमंत्री कमर झमान कैरा यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने २५ तालिबानी अतिरेक्यांना ठार केले. ठार झालेल्यांमध्ये तालिबानचे कमांडर अबु सईद मिसबुद्दीन व सुल्तान खान यांचा समावेश आहे.

हिलरी क्लिंटन जुलैमध्ये भारत भेटीवर
नवी दिल्ली, ३० मे/वृत्तसंस्था

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्याशी प्रथमच शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी दूरध्वनी करून चर्चा केली. हिलरी क्लिंटन या येत्या जुलै महिन्यात भारतभेटीवर येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अमेरिकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, एस. एम. कृष्णा व हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये झालेले संभाषण गोपनीय व खाजगी स्वरुपाचे आहे. अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री विलियम बर्न्‍स हे पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत असून त्या पाश्र्वभूमीवर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये आज झालेल्या चर्चेस विशेष महत्व आहे.

अपघातात सात मजूर ठार
चंबा, ३० मे/पी.टी.आय.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मजुरांना घेऊन जाणारी एक जीप सुमारे सातशे मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सात मजूर ठार व अन्य आठजण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्य़ात काल संध्याकाळी हा अपघात झाला. रस्त्याच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारी बोलेरो जीप एका वळणावर असताना घसरून दरीत कोसळली.