Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भंडारदरा धरणातून पाण्याची गळती
मोरीची झडप बिघडली, पुढील आवर्तनात अडचण शक्य
अकोले, ३१ मे/वार्ताहर

 

भंडारदरा धरणातून पाण्याची गळती होत असून, धरणाच्या ५० फुटांवरील एका मोरीची झडप बिघडली आहे. ही झडप तातडीने दुरुस्त न झाल्यास धरणाच्या पुढील आवर्तन अडचणीत येण्याची शक्यता आहे.
धरणाला ५० फूट, १०० फूट, १५० फूट व २०० फूट उंचीवर प्रत्येकी दोन अशा आठ मोऱ्या आहेत. सुमारे १०० वर्षांपूर्वी तयार झालेली पाणी सोडण्याची ही यंत्रसामुग्री आता जुनाट झाली आहे. त्यातच मागील काही वर्षांपासून देखभाल व दुरुस्तीकडेही जलसंपदा विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे या मोऱ्यांच्या झडपा वारंवार नादुरुस्त होतात. तसेच त्यातून पाण्याचीही मोठय़ा प्रमाणात गळती होते. गतवर्षी १०० फूट उंचीवरील एका मोरीची झडप बिघडली होती. तिची यावर्षी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. या वर्षी आता ५० फूट उंचीवरील एका मोरीची झडप बिघडली. ५० फूट उंचीवर ‘स्लुईस’ व ‘निडल’ प्रकारची झडप आहे. त्यातील निडल प्रकारच्या झडपेचा रॉड तुटला होता. तो दुरुस्त केला. पण या झडपेचे आवरणच आता तुटले. धरणाच्या मोऱ्यांच्या झडपा नादुरुस्त झाल्या, तर जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागामार्फत त्याची दुरुस्ती करून घ्यावी लागते. मात्र, आता दुरुस्तीची पूर्ण रक्कम भरल्याशिवाय हा विभाग दुरुस्ती करीत नाही. त्यामुळे स्थानिक अधिकारी आपल्या पातळीवरच दुरुस्ती करून घेतात. नादुरुस्त झडप दुरुस्तीसाठी नाशिक येथे पाठविण्यात आल्याचे समजते.
दि. १० जूनला भंडारदऱ्याचे पुढील आवर्तन आहे. त्यापूर्वी झडप दुरुस्त झाली नाही, तर आवर्तनात पाणी बाहेर काढणे अडचणीचे ठरणार आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी १३१ फूट आहे. ती अजून खाली गेल्यानंतर ५० फूट उंचीवरील मोऱ्यांमधून पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही. गतवर्षी नादुरुस्त झालेली १०० फूट उंचीवरील मोठी झडप दुरुस्त झालेली असली, तरी त्या मोरीचा इंडिकेटर अद्याप नादुरुस्तच आहे. त्यामुळे या मोरीतून बाहेर पडणारा विसर्ग अचूकपणे मोजता येत नाही.
धरणाच्या झडपा वारंवार नादुरुस्त होतात. यंत्रसामुग्री जुनाट झाली आहे. झडपांच्या काही भागांची मोठय़ा प्रमाणात झीज झाली आहे. एकविसाव्या शतकातही पाणी सोडताना त्याची चाके माणसांनाच फिरवावी लागतात. या झडपांची दुरुस्ती करून आधुनिक प्रकारच्या स्वयंचलित झडपांची उभारणी करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या दुरुस्तीचा हा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहे.

पाण्याची गळती
धरणाच्या जुनाट झडपांची तात्पुरती थातुरमातूर दुरुस्ती केली जाते. त्यामुळे त्या वारंवार बिघडतात. या बिघडलेल्या झडपांमधून पाण्याची मोठय़ा प्रमाणात गळती होत असते. सध्याही धरणातून पाण्याची मोठय़ा प्रमाणात गळती सुरू आहे. धरणाच्या भिंतीचे बांधकाम जुने झाले असून, अनेक वर्षांत त्याचे मजबुतीकरण केलेले नाही. त्यामुळे धरणाच्या भिंतीमधूनही मोठय़ा प्रमाणात पाणी पाझरते. धरण भरल्यानंतर पाझरण्याचे, तसेच गळतीचे प्रमाण वाढते. गळणाऱ्या पाण्याचे अचूक मोजमाप करण्याची यंत्रणाही धरणस्थळावर नाही. सध्या धरणातून दर दिवशी अर्धा दशलक्ष घनफूट, तर पावसाळ्यात धरण भरल्यावर दर दिवशी १३-१४ दशलक्ष घनफूट पाण्याची गळती होत असल्याचे जलसंपदा विभागाची आकडेवारी दर्शविते. म्हणजेच वर्षभरात सुमारे दोनशे ते अडीचशे दशलक्ष घनफूट पाणी गळतीमुळे धरणातून बाहेर पडते. प्रत्यक्षात गळतीचे प्रमाण यापेक्षाही जास्त असावे, असा जाणकारांचा अंदाज आहे. जलसंपदा विभागाचे गळतीचे आकडे ग्राह्य़ धरले तरी अंबितसारख्या एका लघुपाटबंधारे तलावाच्या क्षमतेएवढी पाण्याची गळती सुरू आहे. एवढय़ा क्षमतेचा तलाव बांधायचा तर आज २५-३० कोटी रुपये खर्च येईल. मात्र, चार-पाच कोटी रुपयांत पाणी सोडण्याच्या यंत्रणेचे आधुनिकीकरण व गळती थांबविणे शक्य असतानाही ते केले जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

देखभाल-दुरुस्तीस तरतूदच नाही!
भंडारदरा धरणातून सरकारला पाणीपट्टीच्या रुपाने दरवर्षी १० ते १२ कोटींचा महसूल मिळतो. लाभक्षेत्रात ५ साखर कारखाने आहेत. शेकडो कोटींची संपत्ती दरवर्षी निर्माण होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून धरणाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कोणतीच भरीव आर्थिक तरतूद केली जात नाही. त्यामुळे किरकोळ दुरुस्त्याही होत नाहीत. जलसंपदा मंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी धरणाला भेट दिली. मात्र, त्यानंतरही स्थिती कायम आहे. लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींचेही या बाबत दुर्लक्षच होत आहे.