Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना जामीन नाकारला
नगर, ३१ मे/प्रतिनिधी

 

वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना न्यायालयाने आज जामीन नाकारून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर आरोपींची सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली.
न्यायाधीश श्रीमती धोलम यांच्यासमोर आज दुपारी आरोपी शिवाजी महादू दुसुंगे, अशोक नाथा भगत, राजू नाथा भगत या तिघांना उभे करण्यात आले. भिंगार ठाण्याचे सहायक निरीक्षक यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयास केली. आरोपींच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायाधिशांनी जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
शनिवारी सकाळी जीपीओ चौकात शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी अनिल जाधव व तांबे यांना एका टोळक्याने बेदम मारहाण केली होती. जाधव यांनी मोटरसायकल मागे घ्या, असे सांगितल्याचा राग धरून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर भिंगार ठाण्यात दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यापैकी तिघांना अटक झाली, तर उर्वरित फरारी आहेत.
शहरातील गुंडांचा वाढता धुडगूस सर्वसामान्यांना त्रासदायक तर आहेच, परंतु आता पोलीसही सुरक्षित राहिलेले नाहीत. वाहतूक पोलिसांना शिवीगाळ, धमक्या, वेळप्रसंगी मारहाण अशा घटना अलिकडे वारंवार घडू लागल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ शकतो. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तथाकथित दादांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
वाहतूक पोलीस चिरीमिरीसाठी धावाधाव करतात, अशी चर्चा नेहमीच ऐकावयास मिळते. पोलिसांनी कायद्याची बूज राखली, तर वरिष्ठांनीही त्यांच्यामागे उभे राहिले पाहिजे. पोलिसांच्या कामामध्ये राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होता कामा नये.
कालच्या घटनेने पोलिसांनी आता आक्रमक धोरण घेतले आहे. वाहतूक पोलिसांनी रविवारी प्रत्येक चौकात नियमांची कडक अंमलबजावणी केली. त्यामुळे वाहनचालक निमूटपणे जाताना दिसत होते. वाहतूक शाखेचे निरीक्षक टी. के. वहिले यांनी आज दिवसभर शहरातील गर्दीच्या रस्त्यावर, चौकात फेरी मारून पोलिसांना सूचना दिल्या. चांदणी चौक, जीपीओ चौक, मार्केट यार्ड चौक, दिल्ली दरवाजा, स्वस्तिक चौक या ठिकाणी चार-चार वाहतूक पोलीस तैनात होते.