Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कुंटणखाना मालकिणीसह तिघांना कोठडी
मुलीच्या विक्रीप्रकरणी ‘पिटा’चा गुन्हा
शेवगाव, ३१ मे/वार्ताहर

 

देहविक्रयासाठी मुलीची विक्री करून तिच्या इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले, तसेच धमकी देऊन प्रतिज्ञापत्र करावयास भाग पाडल्याच्या आरोपावरून येथील कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध, तसेच तिच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी ‘पिटा’ (स्त्रियांचा अनैतिक व्यवहार प्रतिबंध कायदा) कायद्याखाली, तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी माहिती अशी की, परळी हमालवाडी (तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड) येथील एक गरीब कुटुंबातील मुलगी बोकरफाटा (साईनाथ कलाकेंद्र, अर्धापुरी, नांदेड) या ठिकाणी राहत असताना कलाकेंद्रातील आरोपी दुकानदार काका ऊर्फ मधुकर दिगंबर मचे याने तिला शेवगाव येथील कुंटणखानाचालक आरोपी मीना रूपचंद भुसावत हिला १ लाख रुपयांना विकले. तिचा मुलगा आरोपी प्रदीप रूपचंद मुसावत याने व आरोपी मीना हिने या मुलीस तिच्या इच्छेविरुद्ध देहविक्रय करण्यास भाग पाडले, असे संबंधित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वरील तिन्ही आरोपींना शेवगाव पोलिसांनी अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने दि. ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली. गुन्ह्य़ाचा तपास पोलीस उपअधीक्षक दत्तात्रेय गायकवाड, निरीक्षक भास्कर पवार, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर करचे करीत आहेत.
या गुन्ह्य़ाच्या संदर्भात अशी माहिती मिळते की, शेवगाव येथील कुंटणखाना चालविणाऱ्या मीना मुसावत हिच्या शिवाजीनगर भागातील अड्डय़ावर एक मुलगी बळजबरीने वेश्याव्यवसाय करीत असल्याचे, तसेच तिची विक्री झाल्याचे वृत्त वर्तमानपत्रांत आल्यावर या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी या मुलीस बोलावून चौकशी केली होती. मात्र, तिने वरील आरोपींविरुद्ध कोणतीही तक्रार दिली नाही. उलट असा कोणताही प्रकार नसल्याचे प्रतिज्ञापत्र या मुलीने तहसीलदारांसमोर करून दिले. तक्रार केली असती, तर या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल केला असता, अशी माहिती शेवगावचे पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी दिली. आरोपी मीनाविरुद्ध यापूर्वीही ‘पिटा’खाली गुन्हा दाखल झाला होता. यासंदर्भात पाथर्डी येथील काही कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार केल्यावर या मुलीस नगर येथे नेण्यात आल्यावर तिने सर्व माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक डोंगरे यांनी दिला. या गुन्ह्य़ाची बारकाईने चौकशी सुरू करण्यात आली असून, यात बरेच गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता उपअधीक्षक गायकवाड यांनी व्यक्त केली. शेवगावातील वेश्यांचे अड्डे कायमस्वरूपी अशांत टापू बनला असून, कुंटणखाने चालवणाऱ्या मालकिणी व त्यांचे हस्तक गुंड यांची येथे मोठी दहशत आहे. अनोळखी ग्राहकांना मारहाण करून लुटणे, आपसात दंगली करणे असे अनेक गुन्हे शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल आहेत. राजकीय आश्रय मिळविण्यातही या अड्डेवाल्यांचा हातखंडा असून, प्रसंगी पोलिसांवरही दबाव आणण्याचा प्रकार येथे चालू असतो. तसेच मराठवाडय़ातील गुन्हेगारांचे आश्रयस्थान म्हणूनही या अड्डय़ांचा ‘लौकिक’ आहे.