Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जोगेवाडीचे आणखी सातजण उपचारासाठी दाखल
पाथर्डी, ३१ मे/वार्ताहर

 

तालुक्यातील जोगेवाडी येथे गॅस्ट्रोसदृश्य साथीमुळे आरोग्य यंत्रणांची गर्दी झाली असून, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गावात औषधे व पाण्यात मिसळण्याचे द्रावण वाटप करण्यात येत आहे. आज दुपारपर्यंत आणखी सातजण उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसाराम खाडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, पंचायत समिती सदस्य भगवान आव्हाड, अर्बन बँकेचे संचालक विजय मंडलेचा आदींनी आज भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. डॉ. खाडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आवश्यक औषधे पिंपळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात साठविण्यात आली असून, नगरहूनही जास्तीची औषधे आज येथे पोहोचली. गावातील पाणीसाठय़ाचे नमुने, रुग्णांच्या वांत्या व जुलाबाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल दोन दिवसांत मिळणार आहे. गावातील एकूण पाच हातपंपांभोवतीचे डबके आज नष्ट करण्यात आले. साथीचा फैलाव होण्यापूर्वी एक दिवस लग्नसमारंभानिमित्त साठविलेले पाणी दूषित होते काय, याची तपासणी करण्यासाठी त्या पाण्याचेही नमुने आज घेण्यात आले. नमुने तपासणी झाल्याशिवाय साथीच्या आजाराचे नेमके स्वरूप स्पष्ट होऊ शकत नाही. दाखल रुग्णांपैकी अनेकांना बरे वाटू लागल्याने आज घरी सोडण्यात आले.