Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बेलवंडीजवळ मिळणार २० बिबटय़ांना ‘निवारा’!
श्रीगोंदे, ३१ मे/वार्ताहर

 

तालुक्यातील बेलवंडी परिसरात होणाऱ्या देशातील पहिल्या बिबटय़ा निवारण केंद्रात (लेपर्ड रेस्क्यू सेंटर) साधारण २० बिबटय़ांना आश्रय मिळेल. त्यांच्या संगोपन व देखभालीसाठी एक वैद्यकीय अधिकारी, एक वनपाल, एक वनरक्षक, १० मजूर असा ताफा असणार आहे. याबरोबरच बिबटय़ांवर उपचारासाठी शस्त्रक्रिया विभाग, स्वतंत्र पिंजरे असतील.
पुढील महिन्यात प्रत्यक्षात वन विभागाच्या या केंद्राचे काम सुरू होणार आहे. एकशे पाच हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या केंद्रासाठी १७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येथे संशोधन केंद्रही स्थापन करण्यात येणार असून, आधुनिक निसर्ग पर्यटन सुरू होईल. वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारणार आहे.
नवी दिल्ली येथील मध्यवर्ती चिडिया घर प्राधिकरण (सेंट्रल झू अ‍ॅथोरेटी) यांनी या बिबटय़ा निवारा केंद्राला परवानगी दिली. नगर-दौंड रस्त्यानजीक बेलवंडी शिवारातील हे केंद्र पर्यटकांसाठी आकर्षण असेल. हा प्रकल्प ५ वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून, सध्या येथे निसर्ग परिचय केंद्राचे काम पूर्ण झाले आहे.
केंद्रात बिबटय़ाचे दिवसा व रात्री वेगळे पिंजरे असतील. पिंजऱ्यांना अत्याधुनिक ‘चैन लिंक’ बसविले जातील. एक पिंजरा साधारण ६ ते ७ गुंठे आकारावर उभारण्यात येईल. बिबटय़ाची पिंजऱ्यात असतानाही शिकारीची सवय मोडू न देण्याची दक्षता या केंद्रात घेतली जाईल. त्यासाठी ‘हंटिंग ट्रॅक’ सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे बिबटय़ांना जिवंत प्राणी पकडता येईल.
बिबटय़ांचे संगोपन करतानाच नजीकच्या काळात तेथे संशोधन केंद्र प्रस्तावित आहे. असे केंद्र सध्या देशात कोठेही नाही. पर्यटकांना बिबटय़ांना व्यवस्थित पाहता यावे, यासाठी विशेष व्यवस्था असेल. क्लोज-सर्किट कॅमेरे बसवून बिबटय़ाच्या बारीक-सारीक गोष्टी पडद्यावर दाखविल्या जातील. शिवाय काचेची केबिन अशा पद्धतीने बनविली जाईल की बिबटय़ा पर्यटकांना सहज दिसू शकेल, परंतु पर्यटक बिबटय़ांना दिसणार नाहीत. पर्यटकांसाठी चिल्ड्रेन
हाऊस, आयुर्वेदिक गार्डनची उभारणी होईल. पाण्यासह इतर मुबलक सुविधांचा प्रकल्पात समावेश आहे.

मन:शांतीसाठी राशी वृक्ष!
बिबटे निवारा केंद्र असले, तरी माणसालाही मन:शांती मिळावी, यासाठी शास्त्रीय आधार घेऊन २७ राशीनुसार झाडे लावण्यात येणार आहेत. त्याला चिंतन कुटी किंवा नक्षत्रवन असे संबोधले जाईल. या झाडांखाली बसून आत्मसमाधान मिळविण्याचा प्रयत्न माणसांना करता येईल, अशी वन विभागाची अपेक्षा आहे.