Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पक्षाने उमेदवारी दिल्यास विधानसभा लढवू - भोस
श्रीगोंदे, ३१ मे/वार्ताहर

 

कुकडीच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वानी वनमंत्री बबनराव पाचपुते यांना भक्कम पाठबळ देण्याची गरज होती. मात्र, दुर्दैवाने त्यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी याप्रश्नी राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रश्न चिघळला. यापुढे तरी विकासात्मक मुद्दय़ावर सगळ्यांनी एकजूट ठेवून लढा द्यावा, असे आवाहन करतानाच पक्षाने उमेदवारी दिल्यास विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी स्पष्ट केले.
भोस यांचा उद्या (सोमवारी) ५७वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते.
माझ्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत जिल्ह्य़ातील पत्रकारांचे योगदान मोठे असल्याचे नमूद करीत भोस म्हणाले की, तालुक्यातील जिरायत भागातून ३० वर्षांपूर्वी राजकीय प्रवासाला सुरुवात केल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर लोकांनी भरभरून प्रेम केले. जिल्हा परिषदेत सत्ता प्राप्त झाली. कुठलाही राजकीय वारसा नसताना, आर्थिक बळकटी नसतानाही सहकाऱ्यांच्या प्रेमामुळे राजकारणात आजपर्यंत यशस्वी होऊन तग धरू शकलो.
केवळ राजकीय विरोधासाठी विकासात अडसर निर्माण करू नका. राजकारणाच्या वेळा ठरलेल्या आहेत. तालुक्यातील लोकांनी लोकप्रतिनिधीला साथ दिली पाहिजे. मात्र, लोकप्रतिनिधी चुकल्यास विरोध ताकदीने करा, पण तो तात्त्विक असावा. पाणीप्रश्नात कुणाला शिव्या देऊन प्रश्न सुटणार नाही, तर समजुतीचे धोरण घेऊन तोडगा काढणे आवश्यक होते. परंतु पाचपुतेंसह जगताप-शेलार यांनी राजकीय स्वार्थ ठेवून परिस्थिती हाताळल्याने अडचणी वाढल्या. अशा प्रश्नांमध्ये सरकारला निर्णय घेण्यास मुभा देऊन मदत करणे आवश्यक आहे. मात्र, तालुक्यात दुर्दैवाने तसे घडत नाही. सत्तेत असणाऱ्यांना पद राखण्याचे, तर विरोधात असणाऱ्यांचा पदे मिळविण्यासाठी अट्टहास सुरू आहे.
विधानसभा निवडणूक लढविणार का, या प्रश्नावर त्यांनी पक्षाने संधी दिली तर लढाईत उतरणार असल्याचे सांगितले. त्याकरिता मतदारसंघातील गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांची मते अजमविणार आहे. मात्र, त्याचवेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांच्याबरोबरच राजकारण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पाचपुतेंनी २९ वर्षांच्या सत्तेत तालुक्यात विकासात्मक कुठलेही ठोस काम केले नाही. आता गावोगावी त्यांना लोकांच्या उद्रेकाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. या वेळी नगरसेवक समीर बोरा उपस्थित होते.