Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गोदापात्रातून बेकायदा वाळूउपसा चालूच
राहाता, ३१ मे/वार्ताहर

 

येथील गोदावरी नदीपात्रातून वाळूचा मोठय़ा प्रमाणात बेकायदा उपसा सुरू असून महसूल खात्याकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
गोदावरी नदीपात्राच्या राहाता तालुका हद्दीतील वाळूउपशास स्थगिती असताना शिंगवे, रस्तापूर, यज्ञसेनीदेवी मंदिरासमोर तसेच चांगदेव मंदिर मातुलठाण या भागातून वाळूचा बेसुमार अनेक वर्षांपासून उपसा होत असून सध्या पावसाळा तोंडावर आल्याने वाळूची मागणी वाढल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून रात्री व दिवसाही वाळूचा उपसा होत असताना महसूल खात्याचे कर्मचारी वाळूतस्करांबरोबर असलेल्या संबंधामुळे दुर्लक्ष करताना दिसतात. वाळूचोरीविरोधात काही महिन्यांपूर्वी राहाता तहसीलदारांनी पथक स्थापन केले होते. पथकाने सुरुवातीला या भागात छापे टाकून एकदोन वेळेस वाळू वाहनांवर कारवाई केली. परंतु तीन-चार महिन्यांपासून पथकाची कार्यवाही थंडावलेली दिसते. कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण झाल्याने वाळूउपसा सुरू असल्याची चर्चा आहे. वैजापूर तालुका हद्दीतील लिलावाच्या नावाखाली गोदावरी पात्रातून कुठूनही वाळूउपसा होत असून, महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.