Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बंगलोरच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल ;ससेपालन व्यावसायिकांची फसवणूक
नगर, ३१ मे/प्रतिनिधी

 

ससेपालन व्यवसायात २ लाख ६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी बंगलोर येथील रॅबीट फार्मस अँड ब्रीड्स सोसायटी या कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कर्मचारी अशा १६जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संकेत दिगंबर पानसरे (रा. यशोदानगर, पाईपलाईन रस्ता, नगर) यांनी फिर्याद दिली. पानसरे यांच्याबरोबरच पिंपळगाव उजनी, नेवासे, राहुरी व आष्टी तालुक्यांतील अनेक व्यावसायिक फसवले गेले आहेत.
बंगलोर येथील या कंपनीतर्फे छोटय़ा व्यावसायिकांना ससेपालनासाठी दहा ससे (एक युनिट) प्रत्येकी १८ हजार ५०० रुपयांना देण्यात आले. सशांचे उत्पादन वाढल्यानंतर १०० रुपये किलोप्रमाणे आम्ही परत घेऊ, असे आश्वासन कंपनीतर्फे देण्यात आले होते. मात्र, अनेक व्यावसायिकांचे ससे कंपनीने परत घेतले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे या व्यावसायिकांच्या लक्षात आले.
पोलिसांनी कंपनीचे अध्यक्ष सतीश किल्लेकर, उपाध्यक्ष अन्नपूर्णा पाटील, सचिव सिनल इटवाड व इतर १३ कर्मचारी अशा १६जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक अहिराव करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीचे राज्यात जाळे आहे. ससेपालनाच्या माध्यमातून कंपनीने कोटय़वधींची उलाढाल केली. बाजारपेठेत सध्या सशाच्या मांसाला मागणी नाही. त्यामुळे भावही नाही. कंपनीही ससे घेत नाही. त्यामुळे व्यावसायिक कोंडीत सापडले आहेत.