Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

. मी पोरका झालो

 

इंग्रजी सातवीत गेलो, परंतु तोपर्यंत मला भूमिती, काव्य वगैरे विषय नव्हते. द्रविड, साठे आणि इतर काही शिक्षकांनी मला विनामोबदला शिकवायला सुरुवात केली. शाळेत वेळेअभावी जादा तास घेता येत नसल्याने आठवडय़ातून एक दिवस रात्रीच्या वेळी ते मला शिकवत. मी गावी जाऊन-येऊन शिकत होतो. परंतु यासाठी संगमनेरी मुक्काम करण्याची वडिलांकडून परवानगी घेतली. रंगारगल्लीत आम्ही दहा-बारा विद्यार्थ्यांनी मिळून भाडय़ाने खोली घेतली. मी आठवडय़ातून एक दिवस खोलीवर मुक्काम करायचो.
आमच्या घरमालकाच्या घराच्या पुढील भागात भाडय़ाने दिलेले एक दारूचे दुकान होते. त्याच्या बाजूलाच एका श्रीमंत व्यक्तीचे घर होते. तेथे नेहमी संगीताच्या मैफली चालायच्या. आमचा घरमालक तबलजी असायचा. मैफलीच्या दिवशी तो घराच्या मागील दरवाजास कुलूप लावून जात असे. आमच्या खोलीचा वाग याच बाजूने होता. एके दिवशी माझ्या दुर्दैवाने ज्या दिवशी माझा मुक्काम खोलीवर होता, त्याच दिवशी शेजारी गाण्याची मैफल होती. मालक नेहमीप्रमाणे मागील दरवाजास कुलूप लावून मैफलीस गेला. मी आणि माझा मित्र चवरे शिकवणीवरून रात्री परत आलो तर दरवाजाला कुलूप. नाईलाज म्हणून ज्या घरात गाण्याची मैफल होती त्या घराच्या समोर असलेल्या देवळाच्या ओटय़ावर आम्ही बसलो. हेतू हा की कोणीतरी आतून बाहेर येईल व त्याच्यामार्फत घरमालकाकडून किल्ली मागवून घेता येईल. तेवढय़ात के. टी. बाबा (देशमुख) नावाचे सद्गृहस्थ बाहेर आले. वडिलांमुळे ते मला ओळखत असत. त्यांना विनंती करून किल्ली मागवण्याच्या आतच ‘तू गाणे ऐकायला येतोस काय?’ म्हणून मोठय़ाने ते ओरडले. किल्ली मागणं बाजूला राहिले. आमचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. नाईलाज झाला. मैफल संपेपर्यंत बसून राहिलो.
प्रकरण एवढय़ावरच थांबलं नाही. के. टी. बाबा मूळचे राजापूरचे. मैफल संपली आणि त्यांनी थेट माझे गाव गाठले. सर्व हकिकत वडिलांच्या कानावर घातली. सकाळी नऊ- साडेनऊच्या सुमारास वडील हजर! मला सोबत घेतले आणि नाव शाळेतून कमी करण्यासाठी शाळिग्राम सरांसमोर उभे केले. सरांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु वडिलांना ते पटले नाही. मला घेऊन तसेच घरी आले. आजपासून शिक्षण बंद असे त्यांनी निक्षून सांगितले. शिकण्याच्या नावाखाली तमाशे पाहण्यात-ऐकण्यात तुला रस आहे. तू काय शिकणार.. असं बरंच बोलले. आईला बजावले याला मातेरा धुण्याचं काम दे. माझे काम सुरू झाले.
शाळा संपली. पण सुटीचा दिवस बघून मी राजापूर गाठले. के. टी. बाबांना विनवून सोबत घेतले. घरमालकाची भेट घडवून आणली. मित्र चावरेची साक्ष दिली. के. टी. बाबांची खात्री झाली. त्यांनी वडिलांची भेट घेऊन वरील सर्वाशी त्यांची गाठ घालून दिली. माझी शाळा पुन्हा सुरू झाली. या गोष्टीतून जीवनात एक धडा मिळाला. मी अजून तमाशा पाहिला नाही. आजवर आयुष्यात फक्त दोनच चित्रपट पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिले. कॉलेजात असताना प्रा. दांडेकरांच्या सांगण्यावरून ‘संत तुकाराम’ आणि दोन एक वर्षांपूर्वी नातजावयांनी ‘लगान’ची कॅसेट घरी आणून दाखविली तो.
यथावकाश मी वकील झालो. संगमनेरी वकिली सुरू केली. १९४७ पावेतो वकिलीत बऱ्यापैकी जम बसला. त्या वर्षांच्या सुरुवातीला वडिलांना कॉलरा झाला म्हणून संगमनेरी आणले. डॉक्टरी उपचारांनी त्यांना बरे वाटले. तेव्हा त्यांना तंबाखूची चिलीम ओढण्याची सवय होती. मी पत्नीला सांगून ४-५ विडय़ांचे बंडल आणून त्यांच्या उशाजवळ ठेवण्यास व तेथील चिलीम आणि ती शिलगावयाची साधने उचलण्यास सांगितले. वडिलांचे लक्ष नाही असे पाहून पत्नीने हे काम नीट बजावले. थोडय़ा वेळाने वडील आले. त्यांनी तो प्रकार पाहिला. सुनबाईला बोलावले आणि म्हणाले ‘आता तुमचे पती वकील झालेत. त्यांना आमच्या चिलिमीची लाज वाटत असावी,’ असं म्हणून विडय़ांच्या बंडलाचा चुरा केला. तो उशाजवळ तसाच ठेवला. सुनबाईकडून चिलीम आणि इतर साधने मागून घेतली आणि सर्व घराबाहेर फेकून दिली. सुनबाईंना सांगितले. ‘मुलाच्या मिळकतीवर व्यसन करणारा मी बाप नाही. त्याला सांगा चिलीमच काय, तंबाखूचे वा इतर कोणतेही व्यसन मी करणार नाही.’ पुढे त्यांनी चिलीम कायमची सोडली, पण जाता जाता सुनबाईंना एक गोष्ट बजावून सांगितली. ‘पतीराजांना सांगा, त्यांनीही सिगारेट पिण्याचे सोडावे. न सोडल्यास म्हणावे माझ्याशी गाठ आहे.’ संध्याकाळी मी घरी आलो. झालेला प्रकार कानी आला आणि घामाघूम झालो. आतापर्यंत वडिलांनी त्याची एकतर दखल घेतली नव्हती किंवा घेतली असती तरी स्वतच तंबाखूचे व्यसनाधीन असल्याने मुलास तू तसे करू नकोस हे सांगण्याचा आपल्याला अधिकार नाही असे तरी ते समजत असावेत. मीही त्या दिवसापासून सिगारेट सोडली.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. दोन कारणांसाठी हे वर्ष माझ्या जीवनात आणखी बरेच काय देऊन गेले. थोरल्या चिरंजीवांनंतर दुसरा मुलगा झाला, प्रमोद त्याचे नाव. दोन-तीन महिन्यांचा असताना त्याला देवीचा आजार झाला. त्यात त्याची सकाळी आठच्या सुमारास जीवनयात्रा संपली. योगायोगाने त्याच दिवशी किंवा एक अर्धा दिवसाच्या अंतराने माझ्या एका बहिणीचे लग्न होते. मुलाच्या मृत्यूची बातमी वडिलांना ज्या व्यक्तीमार्फत कळविली, त्याच्यामार्फत उलट निरोप आला. ‘मुलीचे लग्न त्याच दिवशी त्याच वेळी लागेल. मुलाची व्यवस्था लावून उभयता लग्नात हजार व्हा.’ निरोप आला. कृतीचे काय? आम्ही मुलाची व्यवस्था लावली आणि पती-पत्नी विवाहास हजर झालो. समरस होऊन मुलीस वाटे लावेपावेतो कार्यरत राहिलो. वडील हे सर्व बघत होते.
सर्व आटोपल्यावर वडिलांनी आम्हाला जवळ बोलावले. म्हणाले, माझे वागणे तुम्हाला तऱ्हेवाईक वाटले असेल. कदाचित निर्दयीही, पण तसे मानू नका. मी आता पिकले पान झालो आहे. कधी तुम्हा सर्वाचा निरोप घेईल हे सांगता येत नाही. मृत्यू समीप आला आहे हे मला समजले आहे. विवाहाचा कार्यक्रम पुढे ढकलला असता, तर इतक्या सगळ्या लोकांची गैरसोय झाली असती आणि पुन्हा होणाऱ्या खर्चाची जबाबदारी कोणावर टाकली असती?
सुनेकडे बघून म्हणाले, याला जीवनात कोणीच नाही आणि नव्हते. आई, बहीण, मातुलगृह हे कोणतेही सुख याला माहीत नाही. बंधू दोन्ही डोळ्यांनी अंध, शेवटी पाप मी करायचे आणि बोजा तुमच्या पतीवर टाकायचा हे मनाला पटेना. माझ्याशिवाय त्याचा विचार कोणीच केला नाही. सुनबाई मी त्याला पदरी टाकीत आहे. सांभाळा. तसा तो वाईट नाही.. त्यांच्या डोळ्यात अश्रू चमकले. सुनबाई रडू लागल्या. विशेष म्हणजे तीन-चार महिन्यांनी वडिलांची जीवनयात्रा संपली. मी पोरका झालो. माझ्या वडिलांचा दरबार संपला. न्याय द्यायला कोणीच राहिले नाही.