Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पालकमंत्र्यांची नाराजी फक्त दाखवण्यापुरतीच?
स्वीकृत सदस्य निवडीचा वाद
नगर, ३१ मे/प्रतिनिधी

 

स्वीकृत सदस्य निवडीबाबत पालकमंत्री दिलीप वळसे यांनी जाहीर केलेली नाराजी फक्त दाखवण्यापुरती होती की पक्ष खरोखरीच त्याची दखल घेणार आहे, अशी कुजबूज महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाने केलेल्या स्वीकृत सदस्य निवडीवरून त्यांच्याही नगरसेवक, कार्यकर्त्यांत असंतोष असून काहीजण यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधणार असल्याचे समजते. मनपा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध शिवसेनेकडून निवडणूक लढवून पराभूत झालेल्या उमेदवाराला सकाळी पक्षात घेऊन दुपारी स्वीकृत नगरसेवकपद बहाल केले गेल्यामुळे पक्षाचे जुने नेते व कार्यकर्त्यांसह सगळेच अवाक् झाले.
एखाद्याला, त्यातही वादग्रस्त राजकीय कार्यकर्त्यांला पक्षात घेण्याचा, घेतल्यानंतर लगेचच इतके मोठे पद देण्याचा अधिकार स्थानिक नेतृत्वाला आहे का असा सवाल या जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. अशा बेलगाम वृत्तीमुळेच शहरात काँग्रेस पक्ष रसातळाला गेला, अशी खंत त्यांच्यापैकी काहींनी बोलून दाखवली. पक्षश्रेष्ठींनी याची दखल घ्यावी, यासाठी त्यांना काहीजणांकडून बातम्यांच्या कात्रणांसहीत सर्व कागदपत्रे पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, सत्ताधारी आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने स्वीकृत सदस्य म्हणून निवडलेल्या नगरसेवकांबद्दल पालकमंत्र्यांनीच नाराजी व्यक्त केली असली, तरी पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच नाराजी फक्त जाहीर करण्यासाठीच होती का, अशी चर्चा राष्ट्रवादीत आहे. त्यांच्यातही अशा वैयक्तिक हित सांभाळणाऱ्यांच्या हातात पक्ष गेल्यामुळेच मनपात व विधानसभेत पक्षाला कायम अपयश बघावे लागते, अशी टीका होत आहे.