Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

बहु होणार खणखणाट!
साऱ्या शक्याशक्यतांचे पट उधळून देत काँग्रेसची दिल्लीस्वारी पार यशस्वी झाली. काँग्रेसच्या या यशाची ध्वजपताकाजनतेने एवढय़ा उंचावर नेऊन ठेवली आहे की, खुद्द कांँग्रेसच्या विविध तंबूंतली आश्चर्याची लाट अद्याप ओसरायला तयार नाही आणि विरोधकांच्या रणनीतीचा चोळामोळा कितीही इस्त्री फिरवली तरी झटक्यात कडक होण्याचे धाडस करणार नाही. अर्थात अशा धक्कादायक निकालांची भारतीय लोकशाहीतील ही काही पहिलीच वेळ नाही. अशा कितीतरी उलटय़ासुलटय़ा थपडा जनतेने तिला गृहीत धरणाऱ्या राजकारण्यांना लगावल्या आहेत आणि मी मी म्हणणाऱ्यांना साफ भुईसपाट केले आहे. मात्र काँग्रेसचा हा विजय भासतो तसा एकहाती नाही.

विधानसभा मतदारसंघांचा फ्लॅशबॅक
रंगीत तालीम सुरु
अभिजीत कुलकर्णी

मतदारसंघ पुनर्रचनेमुळे नाशिक शहर व लगतच्या परिसरातील विधानसभा मतदारसंघांची संख्या दोनवरून चारवर गेली आहे. परिणामी, ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ या उक्तीनुसार इच्छुकांची अवस्था झाली आहे. साहजिकच, आजवर विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याच्या उद्देशाने राजकारण करणाऱ्या मंडळींसोबत स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अनेकांनाही आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे अपवाद वगळता आजवरचे महापौर, पालिका स्थायी समितीचे अध्यक्ष, विविध समित्यांचे पदाधिकारी असे सारेचजण कामाला लागल्याचे पहावयास मिळते. विधानसभेचे वाढलेले मतदारसंघ आणि स्वबळावर लढण्याच्या विविध पक्षांच्या वल्गना यामुळे अनेकांच्या आकांक्षांना घुमारे फुटत असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील शह-काटशह म्हणजे जणू त्याची रंगीत तालीमच म्हणावी लागेल. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. दौलतराव आहेर यांच्यासारख्या मोहऱ्याला पराभूत करण्याची करामत करणाऱ्या काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव सद्यस्थितीत नाशिकच्या आमदार आहेत. पण, त्यांच्या या मतदारसंघाचे आता नाशिक पूर्व, पश्चिम व मध्य असे तीन वेगवेगळे मतदारसंघ बनले आहेत. त्यामुळे डॉ. बच्छाव या कुठून उमेदवारी करणार, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण, स्थानिक राजकारणाचे आडाखे पाहता त्या नाशिक मध्य मध्ये उमेदवारी करतील असे आजचे वातावरण आहे. डॉ. बच्छाव यांच्या रुपाने गतवेळी नाशकात काँग्रेसला तब्बल वीस वर्षांनी प्रतिनिधित्व मिळाल्याने त्यांच्या कारकीर्दीकडे अनेकांच्या नजरा होत्या. अलीकडेच बच्छाव यांना आरोग्य राज्यमंत्रीपदही मिळाले. या दोन्ही पदांवर त्यांनी झपाटून काम केल्याचे दिसत नाही, पण तुलनेने स्थानिक पातळीवर पाडापाडीचे वा नकारात्मक राजकारणही केलेले नाही. सत्तापदी असलेल्यांना अपेक्षाभंगाचा मुद्दा नेहमीच सतावत असतो. बच्छाव याही त्याला अपवाद नाहीत. त्यांच्याच पक्षाचे अनेकजणही या मतदारसंघावर दावा सांगत आहेत. मित्रपक्षाबाबतही तसेच आहे. राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढविल्यास त्यांच्याकडेही इच्छुकांची लंबीचवडी यादी असल्याने संबंधितांना त्या कसे ‘कन्व्हीन्स’ करतात त्यावर बरेच काही ठरेल. विरोधी तंबूतही इच्छुकांची मांदियाळी आहे. महापालिकेत युतीची सत्ता असल्याने अनेकजण तोच मूलाधार मानून चालले आहेत. सेनेपेक्षा भाजपचे या भागात प्राबल्य आहे. हे पाहता मतदारसंघ भाजपला सुटेल हे गृहीत धरून अनेक मंडळी तयारीला लागली असली तरी उपमहापौर अजय बोरस्ते, शहराध्यक्ष विजय साने, नगरसेविका सीमा हिरे यांची नांवे पुढे आहेत. मात्र, त्याहीपेक्षा चर्चा आहे ती मनसेची. कारण, लोकसभा निवडणुकीत येथे राष्ट्रवादीपाठोपाठ मनसेने मते घेतली आहेत आणि सेनेपेक्षा ती तब्बल दहा हजाराने अधिक आहेत. विधानसभेसाठी मनसेकडून वसंत गीतेंसारखा आघाडीचा मोहरा येथून रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित आहे. आपापली पॉकेटस् सांभाळून असलेले अनेक हौशे-नवशेही फुटकळ पक्षांच्या साथीने वा स्वयंभूपणे निवडणुकीत उतरणारच. त्यामुळे येथील लढत किमान तिरंगी आणि कमाल चुरशीची होणार, यात शंका नाही.

‘समाधान आणि आशा’
नाशिकच्या विद्यमान आमदार आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव त्यांच्या कारकिर्दीबद्दल पूर्णपणे समाधानी आहेत. एक महिला म्हणून पक्षाने प्रथम आमदार आणि नंतर मंत्रीपदाची संधी दिली आणि मी देखील माझ्यापरीने जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीचा मतदारसंघ मोठा असूनही लोकांच्या मागणीनुसार मी विविध कामे करण्यात यशस्वी झाले असून नव्या रचनेनुसार मतदारसंघाची व्याप्ती कमी झाल्याने आता अधिक सुनियोजितपणे काम करणे शक्य होणार असल्याचे त्या म्हणाल्या. मी केलेली कामे सर्वाच्या समोर आहेत, त्यामुळे मध्य नाशिकमध्ये पक्ष आणि मतदारही पुन्हा आपल्याला नक्की संधी देतील, अशी त्यांना आशा आहे.

स्लम्स आणि मिलिऑनर्स !
जुने नाशिक व डझनभर झोपडपट्टय़ा अशा निम्न आर्थिक स्तरातील वस्त्या, गावठाण आणि इंदिरानगर सारखा मध्यमवर्गीय परिसर आणि कॉलेजरोड, गंगापूररोड सारख्या उच्चभ्रू वसाहती अशा संमिश्र चेहऱ्याचा हा मतदारसंघ आहे. तथापि, पांढरपेशा व उच्चभ्रू मतदारांची मतदानाबाबतची उदासिनता पाहता अनेकांची भिस्त या भागातल्या ‘स्लम्स’वरच राहणार आहे. अर्थात, जो ‘मिलिऑनर’ त्यासाठी अधिकाधिक औदार्य दाखवेल तो विजयाच्या जास्त जवळ जाईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

वेगवेगळे प्राधान्यक्रम
मतदारसंघातील आर्थिक स्तर संमिश्र असला तरी त्याचा तोंडवळा पूर्णपणे शहरी आहे. परिणामी, शहर विकासाशी निगडीत मुद्देच प्रचारात मुख्यत्वेकरून दिसतील. जुने नाशिक भागात पाणीपुरवठा, रस्ते, वीज हे दैनंदिन स्वरुपाचे प्रश्न आहेत. त्यांचा संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांशी नजीकचा असल्याने राज्यस्तरावरून या प्रश्नांशी संबंधित योजना, अनुदाने याबाबत उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरेल तर अन्य ठिकाणी वाहतूक सुविधा, पार्कीग, औद्योगिक वाढ, शिक्षण अशा धोरणात्मक बाबी प्राधान्यक्रमात मोडतील.

वैयक्तिक प्रतिमा महत्त्वाची
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मध्यच्या परिसरात राष्ट्रवादीला सर्वाधिक म्हणजे ४६, ६६५ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर असलेली मनसे त्याहून १५ हजाराने मागे आहे तर शिवसेना मनसेपेक्षा १० हजाराने कमी आहे. मुस्लीम तसेच दलीत मतदारांची मोठी संख्या हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. मात्र, विधानसभा निवडणुकीतील स्थानिक संदर्भ आणि विविध समाजांतील इच्छुकांची संख्या पाहता, पक्षीय निकषांपेक्षा वैयक्तिक प्रतिमेवरच मतदानाचा टक्का अवलंबून असेल.