Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

क.जी. टू पी.जी.

गुणवत्ता अध्यापन प्रक्रियेची..
विद्यार्थी शाळेत येतो. शिकतो. परीक्षा देतो. प्रगतिपुस्तक मिळवितो. उत्तीर्ण होत पुढच्या वर्गात जातो किंवा लाल शेरा देण्यात येऊन पुन्हा त्याच वर्गात बसतो. नवीन वर्ष सुरू होते नि पुन्हा याच शिक्षणचक्रात पहिले पाढे पंचावन्न होत राहतात. अशात अध्यापन-अध्ययन प्रक्रियेची गुणवत्ता वाढणार तरी कशी? ती वाढविणार कोण? त्यासाठी पुढाकार घेणार तरी कोण? आशय व शिक्षककेंद्रित शिक्षणावरून कृति व विद्यार्थिकेंद्रित शिक्षणाकडे जाणाऱ्या या गुणवत्तापूर्ण प्रवासाविषयी.. एखादी स्थितीप्रज्ञ व्यक्ती म्हणेल की, वा! सारे कसे आलबेल चाललंय! तुमच्या-आमच्यातील बहुतांश व्यक्ती या अशाच विचाराने चालणाऱ्या असतात. काही अघटित घडले नाही, की सारे कसे चांगले चाललंय असे आपण मानतो. आपल्यातील काही मोजक्याच व्यक्ती जरा डोळे उघडून क्षितिज विस्तारतात. बाहेरील जगामध्ये काय चालले आहे, ते न्याहाळतात. आणि मग त्यांना समजते, की आपण मागे पडतो आहोत! मग काय करता येईल? काही जणं म्हणतात, की आडय़ातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार? शिक्षकांचीच पात्रता उच्च दर्जाची नाही, तर विद्यार्थी काय शिकणार?.. मग कुणीतरी फतवा काढतो.. शिक्षकांची पात्रता वाढवा. त्यामधूनच मग येतो प्रस्ताव डीएडसाठीची शैक्षणिक मर्यादा बारावीवरून पदवी स्तरापर्यंत वाढविण्याचा. शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाची (डीएड) पात्रता बारावीवरून पदवीपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावावर विचाराधीन आहे. त्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पुण्यात राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत या प्रस्तावाला एकमुखी विरोध झाला. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शिक्षण आणि एकूणातच अध्यापन-अध्ययन प्रक्रियेची गुणवत्ता वाढविण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचारमंथन करण्यात आले.

‘त्यांना फुलासारखं फुलायला शिकवा’
काही दिवसांपूर्वी शानू या मुलीचा तिच्या शिक्षिकेने केलेल्या शिक्षेमुळे झालेला मृत्यू, त्या पाठोपाठ दोन दिवसांपूर्वी परीक्षेत नापास झाल्यामुळे दोन मुलींनी केलेली आत्महत्या! या व अशा अधूनमधून येणाऱ्या बातम्या वाचून मन फार सुन्न होतं.
एकीकडे, तळागाळातल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहचावं म्हणून सर्व शिक्षा मोहिमेच्या माध्यमातून, सरकार कोटीने पैसा खर्च करीत आहे. तर दुसरीकडे शिक्षणाच्या भितीने मुले आत्महत्या करीत आहेत, पळून जात आहेत. शिक्षण आणि शिक्षकांइतकेच काही बाबतीत, यास पालकही जबाबदार आहेत.
सरकार कोणतेही असो, त्यांना शिक्षणावर पैसा खर्च करायचाच आहे. कारण देशाच्या उज्ज्वल भवितव्याची ती गुंतवणूक आहे. पण शिक्षणासाठी पैसा पुरविण्याबरोबरच चालू शिक्षण पद्धतीतील दोष, ती राबविणारे प्रशासन, अधिकारी, प्रशिक्षक यांची गुणवत्ता, दर्जा यांचे योग्य शिक्षणतज्ज्ञांकडून, संस्थांकडून डोळसपणे परीक्षण व्हायला पाहिजे. कागदावरील रिकाम्या जागा भरून हे परीक्षण होणार नाही.
सध्याची शिक्षणपद्धती आणि ती राबविणारी सर्व स्तरावरील मंडळी, विद्यार्थ्यांना फक्त परीक्षार्थी बनवू पाहात आहे. त्या गडबडीत विद्यार्थ्यांना प्रथम माणूस बनवायचे आहे. हे ते पूर्ण विसरलेले आहेत. तेच काय? आजचे पालकही तोच मार्ग स्वीकारताना दिसत आहेत.
ज्याप्रमाणे एकाच झाडाची सर्व फळे एकाच वजनाची; समान मापाची निपजणार नाहीत. थोडाफार फरक असणारच! त्याचप्रमाणे एका वर्गातील सर्वच मुले काही उच्चपदस्थ अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर.. होणार नाहीत. त्यातील काही कारकून होतील, काही स्वत:चा व्यवसाय करतील तर काही हमाल, नोकर असं चतुर्थश्रेणीचे कामही करतील. कित्येक ठिकाणी पदवीधर मुले, शिपाई, वेटर, वॉर्डबॉय अशी कामे करत आहेत. काम कोणतेही असो पण ते, प्रामाणिकपणे करतील! त्या कामाचा दर्जा उंचावतील! तिथे आपल्या सृजनशीलतेचा उपयोग करतील! असे संस्कार निर्माण करणारे शिक्षक आणि पालक आता क्वचितच सापडतील! संस्कारमूल्ये नुसती शिकवून किंवा सांगून अंगी बाणत नाहीत तर ती रुजवावी लागतात. स्वत:च्या आचरणात ती असतील तरच ती आपल्या विद्यार्थ्यांत आणि मुलांमध्ये रुजतील. याचा विचार शिक्षक आणि पालकांनीही केला पाहिजे.
आमच्या बालपणीच्या काळाचा विचार करता आत्ताच्या मुलांमध्ये भावनिक, मानसिक, वैचारिकदृष्टय़ा फरक नक्कीच आहे. पण प्राथमिक शिक्षण घेण्याच्या वयात आजही मुलांना, त्यांचे गुरुच खरे आयडॉल वाटतात. खरं तर हा गुरुंचा किती मोठेपणा आहे. पण आपण या मोठेपणाला खरंच पात्र आहोत का? याचा विचार करायची वेळ आज आलेली आहे.
आत्ता मे महिन्यात कित्येक शिक्षकांना, डोकेदुखी वाटणारी प्रशिक्षणे चालू झाली आहेत. खरं तर कोठारी आयोगाने शिक्षकांची गुणवत्ता वाढावी म्हणून शिक्षक प्रशिक्षणाचे महत्त्व चाळीस वर्षांपूर्वी स्पष्ट केले आहे. पण सध्याच्या शिक्षणविभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व स्तरावरील प्रशिक्षणाबाबत किती शिक्षकांना आस्था व गरज वाटते? या प्रश्नाप्रमाणेच सर्व पातळीवर दिली जाणारी ही प्रशिक्षणे खरोखरच दर्जेदार आणि आनंददायी होत आहेत का? हाही विचार करण्याचा प्रश्न आहे. काहींचे अनुभव ऐकून, एखादं कार्य उरकावं त्याप्रमाणे ही प्रशिक्षणे सर्व स्तरावर उरकली जात आहेत. दरवर्षी त्याच त्याच समस्यांची पुनरावृत्ती होत आहे. या प्रशिक्षणातून शिक्षकांची गुणवत्ता कशी वाढेल? ती विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचेल? यावर विचार करण्यास वेळ देण्यापेक्षा, हिशेबांची जुळवाजुळव करण्यातच प्रशिक्षण अधिकाऱ्यांचा वेळ जात आहे.
शिक्षकांसाठी होणाऱ्या प्रशिक्षणांमध्ये अभ्यासक्रमाबरोबरच तज्ज्ञव्यक्ती, समुपदेशक समस्यांवर मात करून यशस्वी झालेल्यांच्या मुलाखती, व्यक्तिमत्त्व विकास आणि ज्ञान मनोरंजनाची सांगड घालणारे कार्यक्रम, अशा उपक्रमांची जोड देऊन, प्रथम शिक्षकांमधील उदासीनता मरगळ झटकून त्यांच्यातील सृजनशीलता जागी केली पाहिजे. प्रशिक्षणे अशी व्हायला हवीत की, त्यामुळे शिक्षकांना जणू कात टाकल्याचा आनंद मिळायला हवा. यासाठी प्रथम, प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शिक्षक आणि अधिकाऱ्यांमधील तज्ज्ञ व्यक्ती या पात्र आणि स्वत: शिक्षणात प्रयोगशील असणाऱ्या, अनुभवी अशा असायला हव्यात. अशा तज्ज्ञ व्यक्तींची, आधीच काही निकष ठेवून निवड करायला हवी. परंतु काही वेळा वेगळेच चित्र दिसते. ते म्हणजे अनुभव नसलेले, अचानक अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिली म्हणून आलेले, .. ज्यांना प्रशिक्षण म्हणजे मोठे संकट वाटते असे प्रशिक्षक, प्रशिक्षण घ्यायला आणि द्यायला येतात. तर कधी कधी पात्रता आणि आवड असणाऱ्या व्यक्ती बाजूलाच राहतात. याचा परिणाम असा होतो की, राज्यस्तरापासून सुरू झालेल्या प्रशिक्षणाचे ज्ञान, अनुभव, तालुकास्तरापर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत जे गुणाकाराच्या पटीत वाढायला हवे ते बऱ्याच प्रमाणात उलट होते. तरीही कागदी मूल्यमापनात याचे फलित मात्र उत्तमच दिसून येतं.
खरं तर शिकण्याची तळमळ असलेली आणि शिकण्यासाठी काहीही सहन करण्यास तयार असलेली, एकलव्य आणि साध्वी सावित्रीबाई फुलेंसारखी आपली परंपरा आहे. कुठे कुठे ती जिवंतही आहे. विचार केला तर आत्महत्या करण्याची परिस्थिती त्यांच्यावर होती! तरीही त्यांनी जिद्दीने जे कार्य केलं, त्यामुळे आजही ते जिवंत व पुजनीय आहेत. पण आजची परिस्थिती अशी आहे की, शिक्षण घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही तेवढी तळमळ राहिलेली नाही म्हणूनच अशा आत्महत्या वारंवार होत आहेत. ही किती भयानक गोष्ट आहे. खरं तर मुलांनी फुलासारखं फुलावं म्हणून शिक्षक आणि पालकांनीही धडपडलं पाहिजे!
माझ्या, शिक्षक मित्रांना मी एवढीच कळकळीची विनंती करेन की, इतर परिस्थिती काही असो, कदाचित पूर्ण समाजाला आपण सर्व काही देऊ शकणार नाही. पण माझ्या वर्गाचा तरी मी तळमळीने विचार करेन. वेतन घेऊन मी जो व्यवसाय करीत आहे, तो निर्जिव वस्तूंचा नाही. ती सजीव मुले आहेत. त्यांच्या क्षमतेप्रमाणेच ती शिकतील. पण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे जाऊन समाजात जगण्यासाठी त्यांच्यात जे संस्कार रुजवायचे आहेत. ते तुमच्यामुळेच रुजणार आहेत. ही जबाबदारी मोठी तितकीच नाजूक आहे. ती तळमळीने पार पाडलीत, तर आदर्श माणूस म्हणून ती नक्कीच यशस्वी होतील आणि मग अशा हत्या आणि आत्महत्या कधीच घडणार नाहीत! कारण जीवन किती सुंदर आहे! हे त्यांना तुमच्यामुळेच कळलेले असेल!
एक आई-बाई
ब्रह्मकन्या

आव्हान प्रवेशाचे..
अभियांत्रिकी-वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही अथक परिश्रम करून ‘सीईटी’ दिलीत. आता प्रतिक्षा आहे ती निकालाची. येत्या काही दिवसांमध्ये तुमचे भवितव्य निश्चित होईल. मग प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेचे आव्हान पेलायचे कसे? प्रवेशप्रक्रिया कशी असते, प्राधान्यक्रमाचे अर्ज कसे भरावे, गेल्या वर्षीचे ‘कट्-ऑफ’ गुण कसे कळतील, असे नाना तऱ्हेचे प्रश्न तुम्हाला भेडसावतील. म्हणूनच, ‘केजी टू पीजी’च्या माध्यमातून या वर्षीही आम्ही उपलब्ध करून देत आहोत ‘आव्हान प्रवेशाचे’ हे विद्यार्थ्यांचे व्यासपीठ. त्यामधून अभियांत्रिकी-वैद्यकीय प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेबद्दल तज्ज्ञमंडळी तुम्हाला ८ जूनपासून मार्गदर्शन करतील. त्यासाठी लवकरात लवकर तुमच्या शंका-समस्या पुढील ई-मेलद्वारे पोचवा -
kgtopg.loksatta@gmail.com