Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

लोकमानस

मराठी पाऊल पडते पुढे..
महाराष्ट्र मागे पडत चाललाय, अशी हाकाटी सर्वत्र होत असताना काही गोष्टींत आघाडीवर राहण्याची परंपरा आजही महाराष्ट्राने कायम ठेवली आहे. मराठी मनगटे कोवळ्या वयात आकाशालासुद्धा गवसणी घालतात, हे पुनश्च सिद्ध झाले आहे. कृष्णा पाटीलच्या एव्हरेस्टवारीनंतर मराठीच्या शौर्याचा डंका जगभर वाजणार यात शंकाच नाही.

 


१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात तेजाने तळपणारी राणी लक्ष्मीबाई कोकणची माहेरवाशीण. म्हणजे मराठीच होती. पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी या महाराष्ट्रकन्या. प्रथम महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला त्या प्रतिभा पाटील मराठीच ना? जिब्राल्टरची खाडी प्रथम पोहणाऱ्या भारतीय महिलेची माळ पडली ती ठाण्याच्या आरती प्रधानच्या गळ्यात. आरती प्रधानचा तो विक्रम अजूनही कुणी मोडलेला नाही.
शीतल महाजनने खरे तर सर्व जगाने थक्क व्हावे असा पराक्रम केला आहे तोही वयाच्या १८व्या व २१व्या वर्षी. अवघे घर २२ लाखांना गहाण टाकून कर्ज काढून ही मुलगी ‘गिनिज वर्ल्डबुक’ने दखल घ्यावी असा पराक्रम करून गेली, पण आमच्या देशात तिचे म्हणावे तसे कौतुक झाले नाही.
सरकारदरबारी तिच्या पराक्रमाची योग्य ती दखल घेतली नाही की कुण्या संस्थेने तिला आर्थिक मदत केली नाही. (अपवाद टेल्को). तरी ती डगमगली नाही. आपल्या आई-वडिलांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे दोन्ही ध्रुवावर (दक्षिण व उत्तर) पॅराशूट ग्लायडिंग करून उतरणारी (वयाने सर्वात लहान असूनही) ती एकमेव महिला, तीही भारतीय व मराठी- पुण्यनगरीची.
हे होतेय तो कृष्णा पाटीलने तर यशाचे शिखरच गाठले. तिच्या वयाची बरीच मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत सकाळी अंथरुणात लोळत पडणे पसंत करीत असतात; अशात बोचऱ्या वाऱ्याचे वार झेलीत रात्रीच्या गारठलेल्या काळोखात बर्फ तुडवीत जगातील अत्युच्च शिखर पादाक्रांत करणाऱ्या कृष्णाला तरुणांपुढे आदर्श घालून दिल्याबद्दल सलाम!
रोहिणी जोशी, ठाणे

महात्मा गांधी तरणतलावावरील झाडे वाचवूया..
पर्यावरणाचा प्रश्न फार बिकट झालेला असून आणि जिथेतिथे वृक्षसंपदा जोपासण्याचा संदेश देण्यात येत असूनही बृहन्मुंबई महानगरपालिका मात्र काही वेगळाच संदेश आपल्या कृतीतून देत आहे. सध्या शिवाजी पार्क येथे महापौर बंगल्याच्या बाजूला अस्तित्वात असलेल्या महात्मा गांधी जलतरण तलावाच्या जागी बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन व अत्याधुनिक जलतरण तलाव बांधत आहे. उपक्रम स्तुत्य आहे. परंतु त्या ठिकाणी तलावासोबतच वाहनतळाचीसुद्धा सोय करण्यात येणार आहे. हा वाहनतळ जमिनीखाली असणार आहे आणि म्हणूनच हा प्रकल्प गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे.
या वाहनतळाच्या बांधणीकरिता सुमारे ११० दुर्मिळ वृक्षांचा बळी देण्यात येणार आहे. वास्तविक या जागेवर वाहने उभी करण्याकरिता पुष्कळ जागा उपलब्ध आहे. तरीही महानगरपालिका व वास्तुविशारदांनी ती सोडून अन्य ठिकाणाची निवड वाहनतळासाठी केली आहे. कारण दोघांनाही प्रकल्पात ‘अर्थपूर्ण’ वाढ करायची आहे.
या पत्राद्वारे आम्ही तमाम शिवाजी पार्कवासीयांना आवाहन करतो की, आपण लवकरात लवकर संघटित होऊन ही वृक्षतोड थांबवायला पाहिजे. नाहीतर काही दिवसांत ही दुर्मिळ वृक्षसंपदा बृहन्मुंबई महानगरपालिका नष्ट करून टाकेल. वृक्ष प्राधिकरण मंडळाने ही वृक्षसंपदा नष्ट करण्यास परवानगी दिलेली आहे.
चला एकत्र येऊ या! चला झाडे वाचवू या!
मनीष सोनावणे, गायत्री किर्लोस्कर
महात्मा गांधी जलतरण तलाव सभासद

पायाभूत सुविधांसाठी परदेशी कंपनी?
‘मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डय़ांच्या बंदोबस्तासाठी आता विदेशी कंपनी सरसावली’ (१९ मे) हे वृत्त दिलासा देणारे आहे. करदात्यांच्या पैशांतून दरवर्षी १०० कोटी रुपये ‘खाणारी’ ही समस्या सोडवण्यासाठी शेवटी परदेशी कंपनी पुढे सरसावते यासाठी जागतिकीकरणाला धन्यवाद! वास्तविक रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान देशात नसेल असे म्हणता येत नाही. कारण आयआयटीसारख्या संस्था मुंबईत आहेत आणि गगनचुंबी इमारती, पूल या शहरात साकारत असतात. पण या खड्डय़ांच्या बाबतीत इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रत्येक सार्वजनिक कामातून कमिशन उपटणारी भ्रष्ट यंत्रणा यांच्या कचाटय़ात हे काम धड होऊ शकत नाही. म्हणून परदेशी कंपनी पुढे येते याचे (निगरगट्टपणे) आम्ही स्वागत केले पाहिजे.
रस्त्यांवरील खड्डय़ांप्रमाणेच आणखी एक समस्या डोके वर काढत आहे, ती म्हणजे रस्त्याच्या बाजूने जाणारे जे नाले भूमिगत करण्यात आले आहेत, त्यावरील स्लॅब आणि मेनहोलवरील काँक्रीटची झाकणे बसवण्याचे काम अत्यंत कच्चे आहे. वर्ष-सहा महिन्यांतच जागोजागी खचलेल्या स्लॅब, तुटलेली झाकणे आणि अगदी मनुष्य आत पडेल एवढी भोके, तसेच बाहेर डोकावणाऱ्या सळया असे दृश्य गोरेगांवमधील ओबेरॉय टाऊनशिपच्या सभोवताली दिसत आहे. (इतर ठिकाणी वेगळे चित्र असेल असे वाटत नाही.) त्यामुळे या झाकणांच्या डागडुजीसाठीही परदेशी कंपनी हवी!
मुकुंद नवरे, गोरेगाव, मुंबई

मुंबईच्या पर्यावरणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे यावे
ल्ल गार्डन नं. १ (१४ मे) हा विनायक परब यांचा लेख वाचला. त्यांनी म्हटल्याप्रमाणे ७०-८० च्या दशकातील मुंबई महानगरपालिकेची जी मोजकी उद्याने होती ती आकर्षक नसली तरी स्वच्छ होती. कडूचे कुंपण, त्याची आकर्षक छाटणी व आतील नागोळ्या संपूर्ण भागात हिरवळ. क्वचित काही बागांत कर्दळही लावलेली असायची. पण आता झोपाळे, घसरगुंडय़ा मोडक्या अवस्थेत आहेत; बागेतील हिरवळ नष्ट झाली आहे. कारण महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष.
शहराच्या विकास आराखडय़ात प्रत्येक विभागासाठी एक उद्यान, मुलांना खेळण्यासाठी मैदान यांचा प्रामुख्याने विचार असतो. शिवाय शाळा, कॉलेज, हॉस्पिटल यांचाही विचार करून विकास आराखडा तयार केलेला असतो. आर्किटेक्ट, टाऊनप्लॅनर्स यांनी भरपूर मेहनत घेऊन तो अंतिम निर्णयासाठी महापालिकेकडे पाठविलेला असतो.
आगामी चारपाच वर्षांत ‘गार्डन’ला महत्त्व प्राप्त होईल. सध्या अनेक टॉवर उभे करताना रिक्रीएशनसाठी सुंदर बगीचे तयार होत आहेत. ती जोपासताना उद्यान किंवा मैदानात कचरा न टाकता, परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे हेही विसरून चालणार नाही.
परब यांनी लेखात गोरेगावच्या गोकुळधाममधील आरेभास्कर या उद्यानाचा उल्लेख केला आहे. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार व खासदार यांनी पुढाकार घेऊन आवश्यक ठिकाणी उद्यान तयार करण्याचा निर्णय घ्यावा. महानगरपालिका व जनतेचा विश्वास संपादन केल्यास अशी अनेक उद्याने साकारतील.
मनोहर गोखले, बोरिवली, मुंबई

घातक पायंडा रोखा
केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी राजधानी दिल्लीऐवजी कोलकात्यातील पूर्व रेल्वेच्या मुख्यालयात रेल्वे मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली ही बातमी (२७ मे) धक्कादायक आहे. हा नवा पायंडा चुकीचा व आपल्या केंद्रीय राज्यपद्धतीला धोकादायक आहे. केंद्रीय सत्ता मिळवणाऱ्या आघाडीमध्ये ममता बॅनर्जी यांचा ‘तृणमूल काँग्रेस’ हा पक्ष सहभागी असल्याने आपल्या पंतप्रधानांनी हा चुकीचा पायंडा चालू दिला असेल. पण याच पद्धतीने आपल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांनी आपापल्या राज्यांतून मंत्रिपदाची सूत्रे हाती घेण्याचे ठरविले तर त्यांना नाही म्हणणे पंतप्रधानांना शक्य होणार नाही. यामुळे जी अनावस्था उद्भवेल त्याची कल्पनाच करता येणार नाही. बॅनर्जी खात्याच्या कारभारासाठी दिल्लीत फक्त दोन दिवस असतील, हेही चुकीचे आहे. आघाडीने विचारविनिमय करून बॅनर्जी यांच्या या कार्यपद्धतीत ताबडतोब सुधारणा करावी.
सुहास बाक्रे, ठाणे