Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे सांगलीत जल्लोषी स्वागत
सांगली, ३१ मे/प्रतिनिधी

‘जय हो’चा नारा.. फटाक्यांची तुफान आतषबाजी.. व गुलालाची उधळण करीत हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे मोठय़ा जल्लोषी व उत्साही वातावरणात रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सांगलीत स्वागत केले. या वेळी त्यांच्यासमवेत रोहयोमंत्री मदन पाटील हे उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर प्रतीक पाटील हे आज एक दिवसाच्या सांगली दौऱ्यावर आले होते.

विधानसभेसाठी दोन्ही काँग्रेसनी एकत्र लढणे हिताचे- शरद पवार
माळशिरस, ३१ मे / वार्ताहर

येत्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसनी एकत्र लढणेच हिताचे असून एकत्र न लढल्यास राज्यात दोघांनाही विपरीत परिणामास सामोरे जावे लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. अकलूज येथील सहकार महर्षी साखर कारखान्याच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीबाबत अद्याप कसलीही चर्चा झालेली नाही. मात्र लोकसभेत फायद्याचा ठरलेला मनसे फॅक्टर विधानसभेत सर्वाना नडणार आहे. विधानसभा निवडणुका संदर्भात येत्या ५ जून रोजी मुंबईत मित्रपक्षाची बैठक बोलावली असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्यशोधक साहित्य संमेलनातील ठराव
‘धार्मिक विद्वेष पसरविणाऱ्यांना शिवस्मारक समितीतून वगळावे’
सातारा, ३१ मे/प्रतिनिधी
मुंबई येथे होत असलेल्या सागरी शिवस्मारकाच्या शासकीय समितीत बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव न घेता इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या व धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या व्यक्तींचा समावेश न करता वस्तुनिष्ठ सत्यशोधक इतिहास संशोधक व अभ्यासकांचा समावेश करावा व त्यांच्यामधूनच अध्यक्ष निवडावा, अशी मागणी करणारा ठराव येथे पार पडलेल्या अखिल भारतीय सत्यशोधक संमेलनात संमत करण्यात आला.

नव्या वस्त्रोद्योग मंत्र्यांकडून मोठय़ा अपेक्षा
दयानंद लिपारे, इचलकरंजी, ३१ मे

वस्त्रोद्योग मंत्रालयाची सूत्रे हाती घेतलेल्या दयानिधी मारन यांचा प्रारंभीचाच प्रवास खडतर आव्हानांचा आहे. गेली वर्षभर मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या वस्त्रोद्योगातील अनेक गंभीर प्रश्नावर मार्ग काढताना नवे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारन यांच्या कर्तृत्वाचा कस लागणार आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून उत्तम कामगिरी बजावलेल्या मारन या तरूण मंत्र्यांकडून वस्त्रोद्योगाला मोठय़ा अपेक्षा आहेत.

सांगलीत पालिकेच्या वादग्रस्त उपायुक्तांच्या निवृत्तीबद्दल नागरिकांनीच वाटली साखर
सांगली, ३१ मे / गणेश जोशी
अनेक वेळा बदली.. काही वेळा निलंबन होऊनही सांगली महापालिकेच्या उपायुक्तपदापर्यंत पोहोचलेले वादग्रस्त अधिकारी श्रीरंग पाटील यांच्या निवृत्तीनंतर नागरिकांसह महापालिका कर्मचाऱ्यांनीही शहराच्या मध्यवर्ती मित्रमंडळ चौकात हलगीच्या निनादात साखर वाटली व अशा अधिकाऱ्यापासून महापालिका मुक्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कारागृहातून कैद्याची सुटका झाल्यानंतर कैद्यांनीच आनंद व्यक्त करावा, असा प्रसंग सांगलीकरांना पाहायला मिळाला.

वेणूताईंच्या पुण्यतिथीनिमित्त कराडला आज ‘स्वररंग’ कार्यक्रम
कराड, ३१ मे/वार्ताहर

दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणूताई यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त उद्या (दि. १ जून) सायं. ६ वाजता वेणूताई चव्हाण स्मारक सभागृहामध्ये ‘स्वररंग’ या सुश्राव्य गायनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कराड विभागीय कार्यालयाचे सचिव मोहन डकरे यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शास्त्रीय संगीत, भक्तिगीत व नाटय़संगीत अशा सुश्राव्य गायनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘स्वररंग’ ही सुरमणी माधवी नानल यांची संगीताची मैफल रंगणार आहे. या मैफलीत नरेंद्र भिडे यांची हार्मोनियम व प्रसाद जोशी यांची तबल्याची साथ मिळणार आहे. कराडकर नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून या सुश्राव्य गायनांच्या मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन मोहन डकरे यांनी केले आहे.

गुडमॉर्निग पथकाची २० जणांवर कारवाई
सांगली, ३१ मे / प्रतिनिधी
सांगली महापालिकेच्या गुड मॉर्निंग पथकाने शुक्रवारी कुपवाड शहरातील आनंदनगर व अष्टविनायक नगर या परिसरात उघडय़ावर शौचास बसणाऱ्या वीस जणांवर दंडात्मक कारवाई केली. त्यापैकी तिघांनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
कुपवाड विभागात आज पहाटे पाच वाजता गुड मॉर्निंग पथकाने ही कारवाई केली. या पथकात सहाय्यक आयुक्त धरमसिंग नगरकर, प्रभाग अधिकारी मोदी, स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, दशवंत, मुकादम भीमराव कांबळे आदींचा समावेश होता. उद्यापासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार असल्याचे नगरकर यांनी सांगितले.

पत्रमहर्षी रंगा वैद्य स्मृत्यर्थ आज पत्रकारसंघात कार्यक्रम
सोलापूर, ३१ मे/ प्रतिनिधी

येथील दै. ‘संचार’चे संस्थापक संपादक पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघात उद्या १ जून रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (सोमवारी) सकाळी ९.३० वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते स्व. वैद्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल. डॉ. सप्तर्षी यांचे रंगाअण्णांशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. डॉ. सप्तर्षी यांनी केलेल्या विविध जनआंदोलनात रंगाअण्णांचे मार्गदर्शन होते. या पाश्र्वभूमीवर रंगाअण्णा यांच्याबद्दलचे अनुभव डॉ. सप्तर्षी हे कथन करणार आहेत. यावेळी नवी दिल्लीच्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय दिवाणजी आणि सरचिटणीस संजय पवार यांनी दिली.

भाऊ-भावजयीवर प्राणघातक हल्ला : आरोपातून पती-पत्नी निर्दोष मुक्त
सोलापूर, ३१ मे/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे जमिनीच्या कारणावरून भाऊ आणि भावजयीवर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी भरलेल्या खटल्यात बापूराव नारायण खरात व त्याची पत्नी विमल खरात यांची पंढरपूरचे वरीष्ठ सत्र न्यायाधीश यू. एन. दिक्कतवार यांनी अपिलात सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. खरात दाम्पत्यास या खटल्यात माळशिरसच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन महिने शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध सत्र न्यायालयात अपील दाखल केले असता त्याची सुनावणी होऊन दोघा पती-पत्नीला निर्दोष सोडण्यात आले. पंढरपूरच्या वरीष्ठ सत्र न्यायालयात चाललेल्या या खटल्यात आरोपीतर्फे वकील धनंजय माने यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.