Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

मेटेंचा सवतासुभा मोडण्यासाठी मराठा समन्वय समिती बरखास्त
सातारा, मुंबई , ३१ मे/प्रतिनिधी
विनायक मेटे हे मराठा समन्वय समितीचे स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून मिरवून राजकारणात मोठे होण्यासाठी स्वत:चे मतलबी डावपेच करत असल्याने चुकीचा संदेश जाऊन समितीविषयी गैरसमज होऊ नये यासाठी समितीच बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मराठा महासंघाचे व समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी दिली.
अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना सांगितले, की माझ्या हाताखाली काम करणाऱ्या विनायक मेटे यांना सर्व गोष्टींचा विसर पडला आहे.

अमृतस्पर्शी विधानसभा
महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत असताना आणि महाराष्ट्र विधानसभेच्या विद्यमान सभागृहाच्या शेवटच्या सत्राला नेमका आजच प्रारंभ होत असताना, महाराष्ट्र विधानसभेला अमृतमहोत्सवी वर्षांत नेणाऱ्या कालखंडाचाही लवकरच प्रारंभ होत आहे, हा एक विलक्षण योगायोग आहे.. अर्थात, मुंबई प्रांताची पहिली विधानसभा अस्तित्वात आली १९३७ साली, देशाला स्वातंत्र्य मिळालं १९४७ साली आणि मुंबई प्रांताचं महाराष्ट्र राज्य बनलं ते १९६० साली.. पण पहिल्या विधानसभेचा कायदा तत्कालीन मुंबई प्रांतात बनला तो मात्र १९३५ साली आणि त्या कायद्यान्वये तत्कालीन विधानसभेची पहिली निवडणूक झाली ती १९३७ साली..

बहिष्काराची परंपरा मोडून विरोधक पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या चहापानाला
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येवर मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची गेल्या पाच वर्षांची परंपरा मोडून काढत आज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी चहापानाला हजेरी लावली. चहापानाला जाण्याची मनापासून इच्छा नसतानाही केवळ जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या सरकारच्या शेवटच्या चहापानाला जात असल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला दोन महिन्यांत जाहीरपणे फाशी द्यावी, ही प्रमुख मागणी चहापानाच्या वेळी करणार असल्याचेही या वेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

दोन विमानांना उड्डाणासाठी मिळाला एकाचवेळी सिग्नल
वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला..!
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी
एअर इंडिया आणि जेट एअरवेजच्या प्रवासी विमानांना एकाचवेळी उड्डाणाचे आदेश हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातून (एटीसी) देण्यात आल्याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी आणीबाणीचा प्रसंग उद्भवला होता. मात्र अखेरच्या मिनिटाला जेट एअरवेजच्या वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमानाचा वेग कमी करून आपत्कालिन ‘ब्रेक’ दाबल्याने दोन्ही विमानांची टक्कर होण्याचा मोठा अनर्थ टळला. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या सुरक्षा ताफ्यातील चॉपर हेलिकॉप्टर आणि एका प्रवासी विमानातील टक्करही केवळ वैमानिकाच्या प्रसंगावधनामुळे टळली होती.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून मिळणारा प्रवेश विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा
तुषार खरात
मुंबई, ३१ मे

अकरावी ऑनलाइन प्रक्रियेमधून विद्यार्थ्यांला मिळणारा प्रवेश हा त्याच्यावर सक्तीचा राहणार असून तो त्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अधिकारावर गदा येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑनलाइन अर्ज सादर करताना कमीतकमी २० प्राधान्यक्रम नमूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे या वीसपैकी कमी दर्जाचे महाविद्यालय विद्यार्थ्यांला मिळाल्यास त्याची इच्छा नसतानाही त्याच महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयामधूनच (जीआर) ही बाब स्पष्ट झाली आहे.

राज्यात दशलक्ष रक्तसैनिकांची खडी फौज !
संदीप आचार्य
मुंबई, ३१ मे

मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर ‘एनएसजी’च्या धर्तीवर पोलिसांची यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी ‘लालफिती’चा कारभार पाहाता अशी यंत्रणा केव्हा तयार होईल हे सांगता येणे कठीणच आहे. या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागाच्या अखत्यारितील ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ने आज राज्यात दशलक्ष ‘रक्तसैनिकां’चे खडे सैन्य उभे करण्याचा विक्रम केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार प्रती खाट वर्षांसाठी सात रक्ताच्या पिशव्या असाव्यात असा निकष आहे. राज्यातील सर्व रुग्णालयांमधील खाटांचा विचार करता साडेसात लाख रक्ताच्या पिशव्यांची गरज असून ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ने (एसबीटीसी) स्वैच्छिक रक्तदानाची मोहीम अत्यंत परिणामकारकपणे राबवित जानेवारी ते डिसेंबर या कालावधित तब्बल १० लाख ८७ हजार रक्ताच्या पिशव्यांचे रक्तसंकलन केले.

मीराकुमार इतिहास घडविण्याच्या समीप
नवी दिल्ली, ३१ मे/खास प्रतिनिधी
पंधराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीराकुमार यांची निवड आता जवळजवळ निश्चित झाली असून त्यामुळे भारतीय लोकशाहीच्या ६२ वर्षांंच्या वाटचालीत आणखी एक इतिहास घडणार आहे. लोकसभा अध्यक्षपदी निवड होणाऱ्या मीराकुमार या पहिल्याच महिला ठरणार आहेत. आज सकाळी मीराकुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या निवडीची घोषणा ही आता केवळ औपचारिकता असल्याचे मानले जात आहे. पंधराव्या लोकसभेच्या हंगामी अधिवेशनाची सुरुवात होत असताना उद्या अध्यक्षपदासाठी मीराकुमार यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. दिवंगत जी. एम. सी. बालयोगी लोकसभेचे पहिले दलित अध्यक्ष ठरले असले तरी मीराकुमार यांच्या रुपाने पहिल्या महिला आणि दलित अध्यक्ष लाभणार आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी आपली उमेदवारी जाहीर करणाऱ्या बसपच्या मायावतींचा ‘दलितकी बेटी’चा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यापाठोपाठ आणखी एका महिला नेत्याला घटनात्मक पदावर बसवून महिला आरक्षण विधेयक पारित करण्यापूर्वी वातावरण निर्मिती करण्याच्या दिशेने पाऊल टाकले जाणार आहे. आज सकाळी ६४ वर्षीय मीराकुमार यांनी १०, जनपथ येथे जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.

हवाई दल प्रमुखपदी प्रदीप नाईक
नवी दिल्ली, ३१ मे/वृत्तसंस्था

हवाई दलाचे प्रमुख म्हणून एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक यांनी आज सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नियुक्तीमुळे २६ महिन्यांच्या खंडानंतर लढाऊ विमानाचा वैमानिक या पदावर आरूढ झाला आहे. याआधीचे हवाई दलप्रमुख फली एच. नरीमन हे हेलिकॉप्टर पायलट होते. हवाई दलाचे आधुनिकीकरण होत असतानाच नाईक हा पदभार स्वीकारत आहेत. नाईक यांचा जन्म नागपूर येथे झाला. २१ जून १९६९ रोजी ते लढाऊ वैमानिक म्हणून ते हवाई दलात दाखल झाले. ५९ वर्षांचे नाईक यांनी ४० वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी