Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

महाकवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने वामनदादा कर्डक साहित्यसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. सोबत पोलीस उपायुक्त एस. एम. वाघमारे, समाज कल्याण विभागाचे संचालक ई. झेड. खोब्रागडे, प्रसिद्ध शायर बशर नवाज, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मोहड, सचिव अरुणकुमार बस्ते आदी.

उतरले ते आतवर
वारा असा सुटतोय बेभान. ढगांची गर्दी वाढत जातेय आकाशात. सुनसान अस्वस्थ करून सोडणारे उष्ण प्रहर पालटत जाताहेत. असह्य़ उन्हाचे दिवस सरत आले आहेत. रस्त्यावरून, रानावनातून, घरादारातून सर्वत्र फिरणाऱ्या झळांनी कसं हलकं हलकं अशक्त करून सोडलं होतं. अंगातून निघणाऱ्या घामानं त्रस्त आणि बेचैन झाल्या मनाला ही पावसाची चाहूल सुखमय वाटत आहे. आभाळाची दाटी आणि वाऱ्याचा जोर वाढतोय.

कोंडावार हत्येप्रकरणी एकास अटक
मुख्य आरोपीचेही धागेदोरे मिळाले
औरंगाबाद, ३१ मे/प्रतिनिधी

प्रादेशिक परिवहन कार्यालयात घुसून लेखापाल डी. एस. कोंडावार यांच्यावर गोळ्या घालून खून करणारा सचिन तायडे याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. दरम्यान आज पोलिसांनी त्याचा सहकारी सचिन पवार याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. तायडेने कोंडावार यांना गोळ्या घातल्यानंतर तो सचिन पवार याच्यासोबत दुचाकीवर बसून पसार झाला होता.

वामनदादा कर्डक यांचे साहित्य आता संकेतस्थळावर
औरंगाबाद, ३१ मे/प्रतिनिधी
आंबेडकरी चळवळीचे प्रणेते महाकवी वामनदादा कर्डक यांचे साहित्य आता जगभर झळकणार आहे. वामनदादा कर्डक यांच्या नावाची वेबसाईट सुरू करण्यात आली असून यावर दादांचे सर्व साहित्य उपलब्ध झाले आहे. तापडिया नाटय़मंदिर येथे आज महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन झाले. या वेळी समाजकल्याण विभागाचे संचालक ई. झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

धनगर समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू -जयदत्त क्षीरसागर
बीड, ३१ मे/वार्ताहर
अहिल्यादेवी होळकर यांनी देशासाठी आपले कर्तृत्व पणाला लावले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्व समाजासाठी दीपस्तंभासारखे प्रेरणा देणारे आहे. स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरही धनगर समाज आजही उपेक्षित असल्याने या समाजाला न्याय देण्यासाठी एस. टी. प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश व्हावा यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.

पाणवठय़ाची पुरातन विहीर ढासळल्याने १६ जण जखमी
लोहा, ३१ मे/वार्ताहर

रिसनगाव येथील पाणवठय़ाची पुरातनकालीन विहिर ढासळल्याने विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेले १६ जण जखमी झाले. त्यात एक महिला गंभीर असून नांदेड येथे उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. पंचवीस फूट खोल विहिर दगडगोटय़ांनी भरली. त्या ढिगाऱ्याखाली काही महिला आहेत का याचा शोध सुरू आहे; परंतु अशा आपत्कालीन प्रसंगावर मात करण्यासाठी प्रशासनाकडे प्रभावी यंत्रणा नसल्याचे उघड झाले आहे. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेने तिघेजण ठार
लातूर, ३१ मे/वार्ताहर
अहमदपूर तालुक्यातील रुई येथील तिघेजण मोटरसायकलवर गावाकडे जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे तिघेजण मृत्यूमुखी पडले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील रुई येथील शंकर भगवान देवकते (वय २०) व भगवान गंगाराम देवकते (वय ५०) हे दोघे व भागवत भीमराव मुलमवार (वय ३५) असे तिघेजण मोटरसायकलवरून गावाकडे जात असताना मरशिवणीच्या शिवारात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे भगवान व शंकर हे पिता पुत्र जागीच ठार झाले, तर भागवत यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

मटका चालवणाऱ्या दोघांना अटक
नांदेड, ३१ मे/वार्ताहर

मटका चालवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले. त्यांच्याकडून १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. देगलूर नाका परिसरात कल्याण मटका सुरू असल्याची माहिती एका खबऱ्याने पोलिसांना दिल्यानंतर फौजदार संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. मोबाईलवर मटका चालवणाऱ्या अफरोजखान व जाफरबीन या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले.

‘सुरक्षित, सक्षम राष्ट्र हेच सावरकरांच्या हिंदुत्वाचे सार’
लातूर, ३१ मे/वार्ताहर

विज्ञानाचा पुरस्कार, अस्पृश्यता निर्मूलन, सुरक्षित आणि सक्षम राष्ट्र हेच सावरकरांच्या हिंदुत्वाचे सार आहे, असे प्रतिपादन हिमानी सावरकर यांनी केले. केशवराज विद्यालयात ‘युग प्रवर्तक सावरकर’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नारायण भोसले होते. सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन शेटे उपस्थित होते.श्रीमती सावरकर म्हणाल्या, सावरकरांचे साहित्य, नाटय़, लेख, काव्य यातून राष्ट्रभक्ती व राष्ट्रकल्याणाचा संदेश मिळतो. त्यांनी व त्यांच्या परिवाराने राष्ट्रसमर्पित कुटुंबाचा आदर्श देशासमोर ठेवला.

महिलांच्या सहभागाने विकासाच्या गतीत वाढ -हिमानी सावरकर
लातूर, ३१ मे/वार्ताहर

राष्ट्रकार्यात महिलांचा सहभाग वाढल्याने विकासाच्या गतीत वाढ झाली असल्याचे प्रतिपादन हिमानी सावरकर यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त हिमानी सावरकरांसोबत चर्चासत्रात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी शकुंतला बेंडकाळकर होत्या. भारतमाता पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी हिमानी सावरकर म्हणाल्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संपूर्ण परिवार राष्ट्रसमर्पित होता. घरातली सर्वच पुरुष मंडळी एक तर शिक्षा भोगत होती किंवा आंदोलनात सहभागी होती. अशी स्थितीतही सावरकरांच्या वहिनी, पत्नी यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडीत या महापुरुषांनी पूरक कार्य केले. सावरकरांच्या कुटुंबासारखे आदर्श स्वातंत्र्यसेनानी कुटुंब एकमेवाद्वितीय आहे, असे सांगून हिमानी सावरकरांनी महिलांना सामाजिक कार्यात अग्रेसर होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका देशपांडे यांनी केले. आभार सुनीता कुलकर्णी यांनी मानले.

बनावट शिक्क्य़ाच्या मदतीने बॅँकेची ७ लाखाची फसवणूक
बीड, ३१ मे/वार्ताहर
जिल्हा बँकेच्या वडवणी शाखेतून बनावट सही, शिक्के यांचा वापर करून अज्ञात इसमाने सात लाख रुपये धनादेशाद्वारे लांबवल्याचे उघडकीस आल्यानंतर शाखा व्यवस्थापकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पैशाच्या वादातून मारहाण
हिंगोली, ३१ मे/वार्ताहर
जमिनीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून १९ वर्षे वयाचा वसीम याचे नांदेड येथील काही लोकांनी अपहरण करून गंभीर मारहाण केल्याची तक्रार जखमीचे वडील मजिदउल्ला बेग यांनी वसमत पोलीस ठाण्यात केल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जखमी मुलाच्या वडिलांनी वसमत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, वसीम यास पैशांच्या देवाणघेवाणावरून वसीम यास जबरीने उचलून नेले व मारहाण करून पळसगाव शिवारात फेकून दिले.

‘मनसे’ च्या विद्यार्थी विभागाकडून खुच्र्याना जलाभिषेक करून निषेध
उदगीर, ३१ मे/वार्ताहर

तालुक्यातील वनशेळकी गावातील नागरिकांनी रस्त्याच्या प्रश्नांसाठी लढा सुरू केला आहे. अधिकारीवर्ग कार्यालयात उपस्थित राहत नसल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने रिकाम्या खुर्चीचा अभिषेक केला. बनशेळकी गावच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून गावकऱ्यांनी वेळोवेळी निवेदने, रास्ता रोको, निवडणुकीवर बहिष्कार टाकला. भाजयुमो रामचंद्र तिरुके यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. तरीही या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.सार्वजनिक बांधकामाच्या कार्यालयात वारंवार खेटे मारूनही अधिकाऱ्यांची भेट होत नाही म्हणून गांधीगिरीच्या मार्गाने अधिकाऱ्यांच्या आसनाचा जलाभिषेक करून त्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. बनशेळकी रोड जोपर्यंत पुर्णत्वास जात नाही, तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनविसेचे मराठवाडाप्रमुख सज्जनकुमार लोनाळे यांनी दिला.

परतूरमधील स्मशानभूमीची दुर्दशा
परतूर, ३१मे/वार्ताहर

शहरातील स्मशानभूमीची अतिशय दुर्दशा झाली असून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना स्मशानभूमींमध्ये कुठलीच सुविधा उपलब्ध नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वीच विविध भागांतील स्मशानभूमीत आवश्यक सुविधा द्याव्यात अशी मागणी आहे. शहरातील बसस्थानकाजवळील ग्रामीण रुग्णालय रस्त्यावरील सुतार गल्लीजवळ स्मशानभूमीत कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. स्मशानभूमीत काटेरी झुडपे वाढली आहेत. ग्रामीण रुग्णालयाजवळील स्मशानभूमीचे पत्र्याचे शेड नादुरुस्त झाले आहे. सखल भाग व रस्ताच नसल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. स्मशानभूमींमध्ये विजेचे दिवे, पाणी या सुविधाही नाहीत. रात्रीच्या वेळी बत्ती लावून अंत्यसंस्कार करावे लागतात. स्मशानभूमीतील ओटे निकृष्ट बांधकामामुळे मोडकळीस आले आहेत.

राज्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन
बीड, ३१ मे/वार्ताहर

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी व कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध नोंद करण्यासाठी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले असून पहिल्या टप्प्यात १ जून रोजी तहसील कार्यालयावर निदर्शने, त्यानंतर १२ जूनला विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सरचिटणीस नवनाथ नागरगोजे यांनी दिली.

अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात
औरंगाबाद, ३१ मे/खास प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २८४ वी जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. औरंगाबाद शहरातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली. शिवसेना आणि भाजप युतीतर्फे अहिल्यादेवी होळकर यांच्या पद्मपुऱ्यातील उभ्या भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मल्हार सेनेच्या वतीनेही जयंती साजरी करण्यात आली. हडकोच्या अहिल्यादेवी होळकर चौकातून मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ मल्हार सेना प्रमुख लहुजी शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. हडको, बजरंग चौक, सिडको बसस्थानक, आकाशवाणी, क्रांतीचौक मार्गे या मोटारसायकल रॅलीचा समारोप पद्मपुऱ्यातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ झाला. येळकोट येळकोट जय मल्हार, अहिल्यामाता की जय अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.

तरुणाची निर्घृण हत्या
नांदेड, ३१ मे/वार्ताहर

सिडको परिसरात राहणाऱ्या शंकर सोपान सोनकांबळे या २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीचे धागेदोरे अद्याप हाती लागले नाहीत. सिडको परिसरातल्या संभाजी चौकात राहणारा शंकर सोनकांबळे हा शनिवारी आपल्या घरी एकटा होता. दुपारनंतर अज्ञात व्यक्तीने त्याच्या घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने त्याला भोसकले. शरीराच्या प्रत्येक भागावर वार झाल्याने रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. रात्री नऊच्या सुमारास संभाजीचा मोठा भाऊ विजय सोनकांबळे घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्याने तात्काळ सिडको पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंबंधी योग्य त्या सूचना दिल्या.

स्पर्धेतून खेळाडूंची प्रगती होते - राजकिशोर मोदी
अंबाजोगाई, ३१ मे/वार्ताहर
येथे पार पडलेल्या विभागीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतून खेळाडूंची प्रगती होते तसेच या स्पर्धेतून प्रतिभावंत खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाई येथे टी-२० असोसिएशनच्या वतीने आयोजित अंबाजोगाई चषक विभागीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी उपनगराध्यक्ष दिलीप सांगळे, राजेसाहेब देशमुख, नगरसेवक बबन लोमटे, संजय दौंड, स्वागताध्यक्ष तानाजी देशमुख आदी उपस्थित होते. श्री. मोदी म्हणाले, अंबाजोगाई शहरात पुणे, सोलापूर, परभणी, बीड, लातूरसारख्या ठिकाणांहून संघांनी भाग घेतला. यामुळे खेळाडूंना नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. खेळातील यशापयशाप्रमाणे जीवनातही यश-अपयश पचवून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

उड्डाणपुलावरून पडून एकाचा मृत्यू
लातूर, ३१ मे/वार्ताहर
उड्डाणपुलावरून पायी जात असलेल्या व्यक्तीला पाठीमागून येणाऱ्या मोटारीची धडक बसल्याने ती खाली पडून जागीच ठार झाली. निवृत्त नायब तहसीलदार लक्ष्मीकांत ग्यानबा ढगे (वय ६५, रा. शांतीनिकेतन कॉलनी, लातूर)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संतोष लक्ष्मीकांत ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

चार वर्षांच्या बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न
औरंगाबाद, ३१ मे/प्रतिनिधी

शेजारी राहणाऱ्या चार वर्षांच्या बालिकेवर ४० वर्षांच्या भाजीपाला विक्रेत्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतोषीमातानगर येथे घडली. सर्जेराव प्रल्हाद भालेराव असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. सर्जेराव याने खेळत असलेल्या मुलीला गोड बोलून आपल्या घरात बोलविले. तेथे तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्याने हा प्रकार वेळीच लक्षात आला. शेजाऱ्यांनी मुलीची सुटका केली. पोलिसात तक्रार दाखल झाल्यांतर पोलिसांनी लगेच आरोपीला अटक केली.

हॉटेल व्यवस्थापकाच्या डोक्यात बाटली फोडली
औरंगाबाद, ३१ मे/प्रतिनिधी

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये बसण्याच्या कारणावरून सिडको एन-५ येथील हॉटेल चिंतामणीचे व्यवस्थापक सूर्यवंशी यांना एजाज पठाण आणि त्याच्या दोन साथीदारांनी बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी घडली. दुपारी चारच्या सुमारास एजाज दोन साथीदारांसह हॉटेलात आला होता. तेथे बसण्यावरून झालेल्या वादातून एजाजने सूर्यवंशीच्या डोक्यात शितपेयाची बाटली फोडली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. अन्य एका घटनेत घरावर दगड का फेकतो असे विचारण्यासाठी गेलेल्या सोपान फकीरा जगताप यांना मोसीन काळू (वय ५०, रा. अब्दीमंडी, दौलताबाद) याने बेदम मारहाण केली. सोपान यांच्या पत्नी ताराबाई यांनाही मारहाण करण्यात आली.

लोहा तालुक्याला यंदा खतटंचाई भासणार नाही - आमदार पाटील
लोहा, ३१ मे/वार्ताहर

तालुक्यात खरिपातील पेरणीसाठी डीएपी व अन्य खतसाठा पुरेसा आहे. त्यामुळे यावर्षी खतटंचाई भासणार नाही. बोगस बियाणे, जादा दराने खत विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रधारकांवर संबंधित विभागाने कडक कार्यवाही करावी, असे प्रतिपादन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.
तालुका समन्वय समितीची बैठक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सी. आर. पेलगूलवार, जिल्हा कृषी अधिकारी आर. एन. मुंडे, प्रभारी तहसीलदार एन. जी. झंपलवाड, दत्ता पाटील हळदेकर, बालाजी सावळे, डॉ. पंजाबराव देशमुख उपस्थित होते. पाटील म्हणाले की, लोहा तालुक्यासाठी डीएपी खत ७१५ मेट्रिक टन आहे. अन्य खतही मागितले आहेत; त्यामुळे यंदा टंचाई भासणार नाही. पेरणीच्या काळात दोषींविरुद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पेटविले
हिंगोली, ३१ मे / वार्ताहर
कळमनुरी येथे गजानन हरिभाऊ व्यवहारे याने त्याची पत्नी रत्नामाला हिला शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून हातपाय बांधून तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. शेजाऱ्यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. ती ८५ टक्के भाजली आहे. तिला उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. पेटवून पळून गेलेला पती गजानन हा नंतर कळमनुरी पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ट्रॅक्टरच्या अपघातात एकाचा मृत्यू
हिंगोली, ३१ मे / वार्ताहर

कळमनुरी तालुक्यातील वसफळ येथील चालू ट्रॅक्टरमधून खाली पडून चाकाखाली आल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. रतन कुंडलिक गवळी (वय ३५ वर्षे) हा रेडगाव येथून गट्टीचे ट्रॅक्टर भरून बागलपार्डी येथे गुरुवारी (दि. २१ मे) रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास जात असताना हा प्रकार घडला. उत्तम गवळी यांच्या फिर्यादीवरून कुरुंदा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.

भोकर तालुक्यात रुग्णांची मोफत तपासणी
भोकर, ३१ मे / वार्ताहर

सत्यसाई ट्रस्ट सेवाभावी संस्था व शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भोकर तालुक्यात २८ मे पासून मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून ग्रामीण भागातील रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येत आहे. विविध प्रकारच्या आजारावर मोफत औषधोपचार करण्यात येणार असून मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक भोकर तालुक्यात दाखल झाले आहे. प्रत्येक गावात, वॉर्डात, तांडय़ावर जाऊन या पथकातील वैद्यकीय अधिकारी रुग्णांची मोफत तपासणी करीत आहेत. हे पथक १५ जूनपर्यंत राहणार आहे. गरजू, गोरगरीब रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आज काळ्या फिती लावून कामकाज
परभणी, ३१ मे / वार्ताहर
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्यशासन वेळकाढू धोरण अवलंबत असल्याच्या निषेधार्थ कर्मचारी आज काळ्या फिती लावून काम व निदर्शने करणार आहेत. केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करावा, पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात, फरकाची रक्कम तीन टप्प्यांत द्यावी, सर्व भत्ते हे नवीन श्रेणीप्रमाणे, शैक्षणिक व अपंगांसाठी खास भत्ते, स्त्रियांना प्रसूती रजा केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावी. आदी या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

जालना जिल्ह्य़ात दोनशे गावांत पाणीटंचाई
जालना, ३१ मे/वार्ताहर

जिल्ह्य़ात जवळपास २०० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून जिल्हाभरात १७४ गावांमध्ये १९७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्य़ात १७४ गावांमध्ये आणि २६ वाडय़ांमध्ये १९७ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर. एन. तांगडे यांनी दिली. गेल्या महिन्याच्या शेवटी १८२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामध्ये १५ टँकरची वाढ झाली आहे. सध्या घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक ४९ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर त्यापाठोपाठ भोकरदन तालुक्यात ४२, अंबड ४०, जालना ९, बदनापूर १९, परतूर तालुक्यात १० आणि मंठा तालुक्यात १७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जाफराबाद तालुक्यात ११ टँकर सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत २५० गावे आणि ४५ वाडय़ांमध्ये ३५५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

पीककर्ज नाकारल्याने उपोषणाचा इशारा
जिंतूर, ३१ मे/वार्ताहर
भारतीय स्टेट बँक, जिंतूरने पीककर्ज देण्यास नाकारल्याने तालुक्यातील मौजे पिंपळगाव (का.) येथील भास्कर गंगाराम काजळे या शेतकऱ्याने बँकेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे.कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र, नवीन पीककर्ज मागण्यास बँकेत गेले असता त्यांना कर्ज नाकारण्यात आले. बँकेतील अधिकाऱ्यांनी उद्धटपणाची वागणूक देऊन बँकेतून हाकलले. वैतागून त्यांनी २ जूनपासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

आग लागून जिनिंगचे सहा लाखांचे नुकसान
हिंगोली, ३१ मे/वार्ताहर
कळमनुरी येथील साई जिनिंग प्रेसिंगला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीत सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. या आगीत सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची उपनर मशीन, तसेच फेडरेशनमधील रुईच्या गाठींना आग लागून ४ लाख ६५ हजारांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री बाराच्या नंतर लागलेली आग विझविण्यासाठी नंदकिशोर तोष्णीवाल, प्रकाश देशमुख, बंडू बुर्से आदींनी परिश्रम घेतले. सुरुवातीला नगरपालिकेचा टँकर लावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. अखेर हिंगोली नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले तेव्हा आग आटोक्यात आली. या घटनेची कळमनुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

‘आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असावी’
जालना, ३१ मे / वार्ताहर

‘नैसर्गिक आपत्तीप्रसंगी मदत व बचाव कार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असणे गरजेचे असल्याचे’ मत उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. मराठवाडा महसूल प्रबोधिनी, औरंगाबाद व जिल्हाधिकारी, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य भूकंप समिती सदस्या हलिमा सिद्दीकी, एन. आर. दमगिर, के. बी. सारडा व संदीप खंबाट उपस्थित होते. केंद्र सरकारचा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि नैसर्गिक आपत्तीप्रसंगी नागरिकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांची तोंडओळख होण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. श्रीमती सिद्दीकी यांनी जखमींवर करावयाच्या प्रथमोपचारासंबंधी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली.