Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मेटेंचा सवतासुभा मोडण्यासाठी
मराठा समन्वय समिती बरखास्त
सातारा, मुंबई , ३१ मे/प्रतिनिधी

विनायक मेटे हे मराठा समन्वय समितीचे स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून मिरवून राजकारणात मोठे होण्यासाठी स्वत:चे मतलबी डावपेच करत असल्याने चुकीचा संदेश जाऊन समितीविषयी गैरसमज होऊ नये यासाठी समितीच बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मराठा महासंघाचे व समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी दिली.
अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना सांगितले, की माझ्या हाताखाली काम करणाऱ्या विनायक मेटे यांना सर्व गोष्टींचा विसर पडला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करून सोडविण्याचा समन्वय समितीच्या प्रयत्नात मेटे यांच्या कृतीमुळे खीळ बसत आहे. निर्णयात एकसूत्रीपणा आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या आठवडय़ामध्ये नवीन समिती गठीत करण्यात येईल, असे अ‍ॅड. पवार यांनी सांगितले.
सदर समन्वय समिती बरखास्त केल्याची घोषणा समितीच्या अध्यक्षांनी केली असली तरी समिती बरखास्त करणारे अ‍ॅड. पवार कोण, असा उफराटा सवाल करीत विनायक मेटे यांनी समिती बरखास्तीची बाबच अमान्य केली आहे. मराठा आरक्षणाबाबत उद्या समितीच्या नेत्यांची मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमवेत बैठक ठरलेली असतानाच समितीमधील मतभेद सदर घटनेवरून चव्हाटय़ावर आले आहेत. राज्यातील विविध मराठा संघटनांमध्ये आरक्षणावरून समन्वय साधता यावा यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. मराठा समन्वय समिती ही बिगर राजकीय समिती असतानाही विनायक मेटे यांनी नाशिक येथे स्वत: जाऊन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा दिला. त्याची तीव्र प्रतिक्रिया समाजात उमटल्याने बरखास्तीचा निर्णय घेणे भाग पडले, असे अ‍ॅड. पवार यांनी म्हटले आहे. तर अ‍ॅड. पवार यांच्यामागे आता कोणीच नसल्यामुळे त्यांना समिती बरखास्त करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे मेट यांचे म्हणणे आहे.