Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बहिष्काराची परंपरा मोडून विरोधक पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या चहापानाला
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी

 

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येवर मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची गेल्या पाच वर्षांची परंपरा मोडून काढत आज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी चहापानाला हजेरी लावली. चहापानाला जाण्याची मनापासून इच्छा नसतानाही केवळ जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या सरकारच्या शेवटच्या चहापानाला जात असल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला दोन महिन्यांत जाहीरपणे फाशी द्यावी, ही प्रमुख मागणी चहापानाच्या वेळी करणार असल्याचेही या वेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षाच्या सदस्यांची आज बैठक झाली. या बैठकीला नितीन गडकरी, एकनाथ खडसे, दिवाकर रावते, पांडुरंग फुंडकर, विनोद तावडे, डॉ. नीलम गोऱ्हे, गजानन कीर्तिकर आदी नेते उपस्थित होते. सरकारला जवळपास सर्वच आघाडय़ांवर आलेले अपयश त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असल्याचे त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.
मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याच्या सुरक्षेवर आणि न्यायालयीन प्रक्रियेवर सरकार कोटय़वधी रुपयांचा खर्च करीत आहे. त्याऐवजी कसाबला येत्या दोन महिन्यांत जाहीरपणे फाशी द्यावी, अशी प्रमुख मागणी आम्ही करणार असल्याचे कदम यांनी सांगितले. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याबाबत राम प्रधान समितीने केलेला अहवाल हा काँग्रेसधार्जिणा असल्याचेही ते म्हणाले. पोलीस आणि राज्य सरकारला ‘क्लिन चिट’ देऊन या अहवालाद्वारे मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे, असेही कदम म्हणाले.
बेळगांव, कारवार, निपाणी हे सीमाभागांतील भाग महाराष्ट्रात आल्याशिवाय खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र होणार नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमात स्वारस्य राहिलेले नाही, असेही विरोधी पक्षनेते म्हणाले. त्याचप्रमाणे वीज, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अर्थव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था, पैसे भरूनही शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचे न झालेले वाटप, गटसचिवांच्या संपामुळे पीककर्जापासून शेतकरी वंचित राहणे आदी प्रश्नांवरही अधिवेशनात रान उठविणार असल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदावर दावा नाही
विधानसभेतील काही विद्यमान आमदार हे लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्याने शिवसेना-भाजप युतीच्या सदस्यांचे संख्याबळ समान झाले असले तरी भाजप विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार नाही. आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप युती एकत्रित राहील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.