Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दोन विमानांना उड्डाणासाठी मिळाला एकाचवेळी सिग्नल
वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला..!
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी

 

एअर इंडिया आणि जेट एअरवेजच्या प्रवासी विमानांना एकाचवेळी उड्डाणाचे आदेश हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातून (एटीसी) देण्यात आल्याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी आणीबाणीचा प्रसंग उद्भवला होता. मात्र अखेरच्या मिनिटाला जेट एअरवेजच्या वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमानाचा वेग कमी करून आपत्कालिन ‘ब्रेक’ दाबल्याने दोन्ही विमानांची टक्कर होण्याचा मोठा अनर्थ टळला. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या सुरक्षा ताफ्यातील चॉपर हेलिकॉप्टर आणि एका प्रवासी विमानातील टक्करही केवळ वैमानिकाच्या प्रसंगावधनामुळे टळली होती. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातून दोन्ही विमानांना एकाच वेळी उड्डाणाचे आदेश कोणी आणि का दिले गेले याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकारामागे हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष जबाबदार असल्याचा आरोप एअर इंडियाने केला आहे, तर जेट एअरवेजने मात्र एअर इंडियाच्या वैमानिकाच्या गैरसमजामुळे ही स्थिती उद्भवल्याचा दावा केला आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन विरुद्ध दिशेच्या धावपट्टीवर एअर इंडियाचे मुंबई-दिल्ली-शांघाय हे प्रवासी विमान, तर जेट एअरवेजचे मुंबई- कोलकाता हे प्रवासी विमान उड्डाणासाठी सज्ज झाले होते. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातूनही दोन्ही विमानांना उड्डाणासाठी हिरवा कंदिल दाखविण्यात आला. दोन्ही विमाने उड्डाण घेणार तोच जेट एअरवेजच्या वैमानिकाचे समोरून त्याच वेळेस उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाकडे लक्ष गेले. आता दोन्ही विमानांची टक्कर होणार हे लक्षात येताच त्याने प्रसंगावधान दाखवत विमानाचा वेग कमी केला आणि आपत्कालिन ‘ब्रेक’ लावून विमान थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि प्रवाशांचा जीव भांडय़ात पडला. या वेळी जेट एअरवेजच्या विमानामध्ये १२० प्रवासी होते. त्यामध्ये चार मुलांचा समावेश होता, तर एअर इंडियाच्या विमानात १०४ प्रवासी होते. या प्रकारानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातर्फे कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. परंतु दोन्ही विमान कंपन्यांनी आपापली बाजू मांडली आहे. त्यानुसार हा अनर्थ केवळ हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या बेफिकीरीमुळे आणि चुकीच्या निर्देशामुळे उद्भवल्याचा आरोप एअर इंडियातर्फे करण्यात आला आहे. दुसरीकडे, सकाळी पावणेआठच्या सुमारास हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातून केवळ आमच्या वैमानिकाला उड्डाणासाठी हिरवा कंदिल दाखविण्यात आला होता. मात्र एअर इंडियाच्या ३४८ या प्रवासी विमानाच्या वैमानिकाचा गैरसमज होऊन त्यानेही त्याच वेळेस उड्डाण केल्याचा दावा जेट एअरवेजने केला आहे.