Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून मिळणारा प्रवेश विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा
तुषार खरात
मुंबई, ३१ मे

 

अकरावी ऑनलाइन प्रक्रियेमधून विद्यार्थ्यांला मिळणारा प्रवेश हा त्याच्यावर सक्तीचा राहणार असून तो त्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अधिकारावर गदा येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑनलाइन अर्ज सादर करताना कमीतकमी २० प्राधान्यक्रम नमूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे या वीसपैकी कमी दर्जाचे महाविद्यालय विद्यार्थ्यांला मिळाल्यास त्याची इच्छा नसतानाही त्याच महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयामधूनच (जीआर) ही बाब स्पष्ट झाली आहे. विद्यार्थी-पालकांशी निगडीत अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या जीआरमध्ये अनेक अन्यायकारक, चुकीच्या व संदिग्ध नियमांचे उल्लेख करण्यात आले आहेत. शिवसेनेने नेमलेल्या ‘अकरावी ऑनलाइन प्रवेश विशेष समिती’चे अध्यक्ष व माजी शिक्षण उपसचिव ज. मो. अभ्यंकर यांनी ‘लोकसत्ता’ला ही माहिती दिली.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अल्पसंख्याक महाविद्यालये, द्विलक्षी अभ्यासक्रम, माहिती तंत्रज्ञान विषय सामाविष्ठ असलेला अभ्यासक्रम, इनहाऊस प्रवेश, एमसीव्हीसी इत्यादींचे प्रवेश राबविण्याबाबतचे धोरण जीआरमध्ये सुस्पष्ट नमूद करणे गरजेचे होते. जीआरमधील या गंभीर दोषांमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होईल, असे अभ्यंकर यांनी सांगितले. मुंबई उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून ‘ब्रॉडबॅण्ड’ सेवा डाऊन झाली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या सात दिवसांच्या कालावधीत ही सेवा अशीच डाऊन राहिली तर मोठा गोंधळ उडेल, अशी भिती समितीचे सदस्य आमदार डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केली आहे. ब्रॉडबँड सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना शिक्षण विभागाने याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाइन भरल्यानंतरही या अर्जाच्या प्रिंटआऊट्स काढून त्या पुन्हा विविध शाळा-महाविद्यालयातील सबमिशन सेंटर्सवर सादर कराव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाविद्यालयात जावे लागणार असेल, तर मग जुनी प्रक्रिया रद्द करून शिक्षण विभागाने काय साधले, असा सवाल सावंत यांनी केला आहे.रांगा कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पर्याय लागू केला आहे. पण प्रवेश अर्जाची प्रिंट आऊट्स सादर करण्यासाठी तसेच महाविद्यालयातील प्रवेश राबविण्यासाठी रांगा लावाव्याच लागणार आहेत. त्यामुळे रांगांच्या ‘कटकटी’पासून विद्यार्थ्यांची सूटका होणार नसल्याचे समितीचे सदस्य व भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस प्रशांत काकडे यांनी सांगितले. याबाबत, शिक्षणउपसंचालक व्ही. के. वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेबाबत आम्ही स्वतंत्र माहितीपुस्तिका छापणार आहोत. या पुस्तिकेमध्ये प्रवेश प्रक्रियेतील सर्व नियम स्पष्ट केले जातील. शिवसेनेच्या समितीने उपस्थित केलेल्या शंकांचेही या माहितीपुस्तिकेतून निरसन होईल.