Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राज्यात दशलक्ष रक्तसैनिकांची खडी फौज !
संदीप आचार्य
मुंबई, ३१ मे

 

मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर ‘एनएसजी’च्या धर्तीवर पोलिसांची यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी ‘लालफिती’चा कारभार पाहाता अशी यंत्रणा केव्हा तयार होईल हे सांगता येणे कठीणच आहे. या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागाच्या अखत्यारितील ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ने आज राज्यात दशलक्ष ‘रक्तसैनिकां’चे खडे सैन्य उभे करण्याचा विक्रम केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार प्रती खाट वर्षांसाठी सात रक्ताच्या पिशव्या असाव्यात असा निकष आहे. राज्यातील सर्व रुग्णालयांमधील खाटांचा विचार करता साडेसात लाख रक्ताच्या पिशव्यांची गरज असून ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ने (एसबीटीसी) स्वैच्छिक रक्तदानाची मोहीम अत्यंत परिणामकारकपणे राबवित जानेवारी ते डिसेंबर या कालावधित तब्बल १० लाख ८७ हजार रक्ताच्या पिशव्यांचे रक्तसंकलन केले. यासाठी ‘एसबीटीसी’ने वर्षभरात तब्बल १६ हजार ७१९ रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. देशात सर्वाधिक रक्तदान शिबिरे भरविण्याचा मान यामुळे राज्याला मिळाला असून स्वैच्छिक रक्तदानाच्या क्षेत्रातही आज महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक आहे. देशात एकूण गोळा होणाऱ्या रक्तापैकी महाराष्ट्र राज्य हे २३ टक्के रक्त जमा करत असून ‘एसबीटीसी’ची कामगिरी लक्षात घेता त्यांची कार्यक्षमता अधिकाधिक वाढण्याच्या दृष्टिने जादा निधी या विभागाला उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. संपूर्ण देशात शंभर टक्के स्वैच्छिक रक्तदानाचे उद्दिष्ट ठेवताना रुग्णांना हवे तेव्हा, हवे तेवढे व सुरक्षित रक्त उपलब्ध व्हावे यासाठी ‘केंद्रीय रक्त संक्रमण परिषदेने’ व्यापक उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात १९९६ साली एसबीटीसीची स्थापना करण्यात आली होती. याचे सहसंचालक डॉ. संयककुमार जाधव यांनी अथक परिश्रम घेत राज्यात स्वैच्छिक रक्तदानाची चळवळ उभी केली. तुमचा ‘वाढदिवस रक्तदान करून साजरा करा’ ही संकल्पनाही सध्या मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. यासाठी एसबीटीसीच्या माध्यमातून जे.जे. रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या महानगर रक्तपेढीत सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत रक्तदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सुमारे १२ हजार रक्ताच्या पिशव्या तसेच रक्तघटकांची साठवण करण्याची क्षमता असलेल्या या अत्याधुनिक रक्तपेढीचे कौतुक आज अमेरिकेतील टेक्सास ब्लड सेंटरच्या संचालिका डॉ. गिता परांजपे यांच्यापासून जर्मनी, ब्रिटन, स्वीत्र्झलड सारख्या देशांमधील रक्तपेढय़ांच्या प्रमुखांनी केले आहे. ‘पिकत तिथ विकत नाही,’ या म्हणीप्रमाणे या ‘रक्तक्रांती’चे राज्यकर्त्यांकडून मात्र म्हणावे तसे कौतुक होताना दिसत नाही. २००६ सालच्या रेल्वे बॉम्ब स्फोटानंतर ‘एसबीटीसी’ने राज्यातील कोणत्याही भागात अवघ्या सहा तासांमध्ये रक्त उपलब्ध करून देण्याची योजना तयार केली असून मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर सेंट जॉर्जेस व जे.जे. रुग्णालयात अवघ्या काही तासात पुरेसे रक्त उपलब्ध करून देण्यात आले होते. अर्थात हा सारा एका रात्रीतील चमत्कार नाही. या यशात डॉ. संजयकुमार जाधव यांच्याबरोबरच तत्कालीन आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, तत्कालीन आरोग्य संचालक डॉ. प्रकाश डोके तसेच माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर व डॉ. विमल मुंदडा यांचाही मोठा सहभाग होता. एसबीटीसीच्या प्रयत्नांमुळे आज राज्यात १० लाख ८० हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले असून यंदाच्या वर्षी चार महिन्यांमध्ये पावणेचार लाख रक्ताच्या पिशव्या गोळा करण्यात आल्या आहेत.