Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

राम प्रधान अहवाल: मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची नियुक्ती
मुंबई, ३१ मे/ खास प्रतिनिधी

 

मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यासंदर्भात शासनानने नेमलेल्या राम प्रधान समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर आता या अहवालानुसार तात्काळ कारवाई करण्याच्या दृष्टिने राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यांची कृती समिती नियुक्त करण्यात आल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. विद्यमान विधानसभेचे अखेरचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री आतिथिगृहावर आयोजित केलेल्या चहापानाला विरोधी पक्ष उपस्थित राहिला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी राम प्रधान समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे सांगितले. या अहवालावर कशाप्रकारे ठोस कारवाई केली पाहिजे, यासाठी मुख्यसचिव जॉनी जोसेफ व अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) चंद्रा अय्यंगार यांची कृती समिती नेमली असून अधिवेशन काळातच त्यांनी अहवाल सादर करावा, अशी शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या अधिवेशनात एकूण १४ विधेयके मांडण्यात येणार असून राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत सीमाप्रश्न सुटावा यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरवा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. विरोधी पक्षाबरोबरील बैठकीच्यावेळी शिवस्मारक तसेच यावरून निर्माण झालेल्या वादावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणावर सरकार कधी निर्णय घेणार असा प्रश्न विचारला असता, या विषयावर अधिक व्यापक चर्चा होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधी पक्ष तसेच राज्यातील विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेता येईल, असे ते म्हणाले. मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला तात्काळ फाशी देण्याची मागणी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केली असली तरी याबाबतचा खटला विशेष न्यायालयात सुरू असून न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय उद्योगमंत्री विलासराव देशमुख हे आपले कधीही स्पर्धक नव्हते, असे सांगत माझ्या त्यांना शुभेच्छच आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात काही जणांनी पक्षविरोधी काम केल्याची उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता, असे प्रकार काही ठिकाणी झाल्याच्या तक्रारी असून पक्षशिस्त राहिलीच पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आपला अहवाल तयार करून पक्षश्रेष्ठींना देतील त्यानंतर योग्य ती कारवाई होईल, असेही ते म्हणाले.