Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

भारतीय युद्धनौकेने परतवले सागरी चाच्यांचे आक्रमण
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी

 

आखाती समुद्रात गस्त घालत असताना भारतीय नौदलाने सागरी चाच्यांचा डाव हाणून पाडला. ‘एमव्ही मौड’ या मालवाहू जहाजावर आक्रमण करून ते ताब्यात घेण्याचा समुद्री चाचांचा प्रयत्न भारतीय नौदलाच्या प्रयत्नामुळे अयशस्वी ठरला. २८ मे रोजी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी आठ सशस्त्र चाचे असलेली एक लहान बोट ‘मौड’ या मालवाहू जहाजाच्या दिशेने वेगाने जाताना भारतीय युद्धनौकेवरील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. ‘मौड’वर भारतीय कप्तान आणि आठ भारतीय कर्मचारी होते. एडनपासून २२५ नॉटिकल मैलांवर ही घटना घडत होती. मौडचा वेग वाढविण्यात यावा, अशा सूचना भारतीय युद्धनौकेतर्फे देण्यात आल्या. युद्धनौकेवरील हॅलिकॉप्टरमधून भारतीय नौदल कमांडो मौडच्या दिशेने गेले. मौडवर शिडीच्या मदतीने चढणारे दोघे जण हॅलिकॉप्टरमधील कमांडोंच्या नजरेस पडले. वातावरणात धुके असल्याने समुद्री चाचांना युद्धनौका आणि हॅलिकॉप्टर दिसली नसण्याची शक्यता आहे. समुद्री चाचांना इशारा देण्यासाठी कमांडोंनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर समुद्री चाचे त्या मालवाहून जहाजापासून दूर गेले आणि जहाजावर चढण्याचा प्रयत्न करणारे दोघेजण समुद्रात पडले. युद्धनौकेवरील जवानांनी समुद्री चाचांच्या नौकेवर कब्जा केला आणि शस्त्रास्त्रे जप्त केली.
वातावरणातील धुक्यामुळे नंतरही समुद्री चाचांकडून आक्रमणाचा धोका संभवत असल्याने भारतीय युद्धनौकेने या मालवाहू जहाजाला सोबत केली. नंतर दुसऱ्या देशांतील युद्धनौकांची सोबत या मालवाहून नौकेला लाभली. सध्या हे जहाज आखाती समुद्रातून सुरक्षितपणे आपली पुढील प्रवास करत आहेत. वेळीच कारवाई केल्यामुळे चाचेगिरी रोखण्यात भारतीय युद्धनौकेला यश मिळाले. याबद्दल मालवाहू जहाजाचे मालक, कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी भारतीय नौदलाचे आभार मानले. एखाद्या नौकेवर समुद्री चाचांनी आक्रमण करताना त्याचा प्रतिकार करत तो डाव हाणून पाडण्याची ही पहिलीच वेळ असावी.