Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

दादर, प्रभादेवी, वरळी व ताडदेव परिसरात पाणी नाही
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी

 

वांद्रे रेल्वे स्थानक ते माहीम दरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वेमार्गाचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. त्यामुळे या मार्गाखालून जाणारी तानसा मुख्य जलवाहिनी सध्याच्या पातळीपेक्षा अधिक खोलवर नेण्याच्या कामाला येत्या २ जूनपासून पालिका प्रशासन सुरुवात करणार आहे. त्यामुळे २, ३ ५ आणि ६ जून रोजी दादर, प्रभादेवी, वरळी आणि ताडदेव परिसरात पाणीपुरवठा होणार नसल्याचे पालिकेने एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे जाहीर केले आहे. ही जलवाहिनी रेल्वे मार्गाजवळ असून जलवाहिनी सध्या अस्तित्वात असलेल्या पातळीपेक्षा अधिक खोलवर टाकण्यात येणार आहे. हे काम २ जूनपासून हाती घेण्यात येणार असून ते ६ जूनपर्यंत चालणार आहे. या कामासाठी किमान २९ तास लागतील, असा अंदाज पालिकेने व्यक्त केला आहे. त्यामुळे या काळात दादर पूर्व, पश्चिम (जी उत्तर), वरळी, प्रभादेवी (जी दक्षिण )आणि ताडदेव परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. महंमद अली रोड (बी विभाग), चंदनवाडी, गिरगाव (सी विभाग) आणि नाना चौक (डी विभाग) या विभागांतही या दिवसात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिकेने जाहीर केले आहे. मात्र असे असले तरी ४ जून रोजी यापैकी काही परिसरात पाणीपुरवठा केला जाणार आहे. २ ते ६ जून या कालावधीत सुरू असलेल्या या कामामुळे उपरोक्त परिसरातील नागरिकांनी या काळात पुरेसा पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहनही पालिकेने केले आहे. पालिकेच्या याकामामुळे उपरोक्त विभागांत पाणीपुरवठा केला जाणार नसला तरी नेमक्या कोणत्या दिवशी व कोणत्या भागात पाणी मिळणार नाही, ते मात्र पालिकेने स्पष्ट केलेले नाही. दरम्यान या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त अनिल डिग्गीकर यांना विचारले असता त्यांनीही या कालावधीत उपरोक्त विभागात प्रत्येकी दोन दिवस पाणी मिळणार नसल्याचे सांगून कोणत्या विभागात व कोणत्या दिवशी ते मिळणार नसल्याचे स्पष्ट केले नाही.