Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

ऐरीलीतील मनसेच्या शाखाध्यक्षाचा सापडला मृतदेह
ठाणे, ३१ मे/ प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी ऐरोलीतून बेपत्ता झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिघा-रामनगर शाखाध्यक्ष प्रशांत रमेश कांबरे (२७) यांचा मृतदेह काल सकाळी पोलापूर - महाबळेश्वर महामार्गावरील दरीतून बाहेर काढण्यात आला.
हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय कांबरे यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष प्रशांत कांबरे यांनी मनसेचे उमेदवार राजन राजे यांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू केला होता. ऐरोलीतील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी काही भागात राजे यांना प्रचार रॅली काढण्यास पोलिसांनी मनाई केली होती. अशा परिस्थितीत मतदानाच्या दोन दिवस अगोदर म्हणजे १४ मे रोजी प्रशांत कांबरे हे अचानक गायब झाले. त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार रबाले पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांचा शोध सुरू असताना शनिवारी पोलापूर-महाबळेश्वर महामार्गावरील एका दरीत त्यांचा मृतदेह सापडला. पोलादपूरमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर पार्थिवावर रामनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घातपातामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विजय चौगुले यांचा हात असल्याचा संशय प्रशांत कांबरे यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे.