Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

पवनराजेंच्या हत्येतील ‘फायनान्सर’सतीश मंदाडे सीबीआयच्या जाळ्यात
डोंबिवलीतील भाजप नगरसेवक शुक्ल यांनाही अटक
मुंबई, पिंपरी, ३१ मे / प्रतिनिधी

 

लातूरच्या तेरणा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या प्रकरणात खासदार पद्मसिंह पाटील यांचा जवळचा सहकारी सतीश मंदाडे याच्यासह दोघांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) आज सायंकाळी ताब्यात घेतले. डोंबिवलीतील भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाचाही त्यात समावेश आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आज सायंकाळी तेरणा सहकारी साखर कारखान्याचे यापूर्वीचे डिस्टीलरी विभाग प्रमुख सतीश मंदाडे (६३, रा. लातूर) व डोंबिवलीतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि अबकारी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी मोहन अनंत शुक्ल (५९, रा. मुंबई) यांना ताब्यात घेतले. मंदाडे याच्यावर खुनाच्या सुपारीचे पैसे देणे, पवनराजे यांची लातूरमधील नेहमीची उठण्या-बसण्याची ठिकाणे दाखविणे असे अनेक आरोप आहेत. लोकसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांच्या प्रचाराची धुराही मंदाडे याच्यावरच होती . उद्या या दोघांना पनवेल येथील न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पवनराजे यांच्या खुनाची सुपारी पारसमल जैन याला मिळवून दिल्याचे आरोप शुक्ल याच्यावर आहेत. आश्चर्य म्हणजे शुक्ल हा भाजपाचा तर त्याची मुलगी स्वाती ही राष्ट्रवादीची नगरसेविका आहे.सीबीआयचे अधीक्षक अभिताब ठाकूर व निरीक्षक भूपेंद्र राणा हे त्यांच्याकडे सखोल तपास करीत आहेत. मुंबई गुन्हे अन्वषेण विभागाने पवनराजे निंबाळकर खून खटल्याचा तपास नुकताच केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे सोपविला आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकार परिषदेत तीन वर्षांपूर्वीच्या या हत्येचे रहस्य उलगडून सांगितले. त्यांनी या प्रकरणातील केवळ निंबाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा दिनेश राममणी तिवारी (वय ३८, रा. मु पो. बारीगांव, ता. बासगांव, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) व सुपारी घेणारा आणि काम फत्ते करणाऱ्या पारसमल ताराचंद बडाला जैन (वय ४७, रा. ए - िवग, कृष्ण सरस्वती हौसिंग सोसायटी, डोंबिवली (पू.), ठाणे, मूळ रा. मु. पो. पडासली, ता.-जि. रासमन, राजस्थान) यांना २५ फेब्रुवारी २००९ रोजी अटक केल्याचे जाहीर केले. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ निरीक्षक डी. के. रुपवते, मिलिंद गायकवाड, सहायक निरीक्षक अनिल वढावणे, फौजदार अनघा सातवसे, प्रवीण भगत यांच्या पथकाने त्यांना अटक केली. जैन याने त्याच्या जबाबात कथन केलेली माहिती माध्यमांच्या हाती आल्याने तर आणखी गहजब झाला.कारण त्यात पवनराजे यांची हत्या करणारा शार्प शूटर हा उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेला वादग्रस्त खासदाराचा वाहनचालक असल्याचे उघडकीस आले आहे.