Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

बोरीवलीच्या सोनलचे जंगलातील मृत्यूचे गुढ कायम!
ठाणे, ३१ मे/प्रतिनिधी

 

ठाण्यातील ओवळा आणि शिळफाटा-महापे रोडवरील जंगलात दोन तरुणींचे मृतदेह सापडले आहे. त्यापैकी एक बोरीवलीमधील तरुणी असून दुसरी बारबाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र बोरीवलीची सोनल बोरकतारी ही कामावर पोहोचण्याऐवजी ओवळ्याच्या जंगलामधील बंगल्यापर्यंत कशी पोहचली, याचे गुढ पोलिसांसमोर कायम आहे.
घोडबंदर रोडवरील ओवळाच्या पानखंडा जंगलातील तृप्ती बंगल्याजवळ एका तरुणीचा मृतदेह नाल्यात सापडला. पानखंडय़ातील हे बंगले धनधांगडय़ांचे असून तेथे सुट्टीची मजा लुटण्यासाठी लोक ये-जा करीत असतात. नाल्यात झाकून ठेवण्यात आलेल्या त्या तरुणीची ओळख पटली असून ती बोरीवलीची राहणारी आहे. सोनल सुनिल बोरकतारी (२६) असे तिचे नाव असून ती बुधवारी कामा जाण्यासाठी घरातून निघाली. मात्र अंधेरीमधील सिद्धार्थ बॅन्व्केट हॉलमध्ये कामावर न पोहचल्यांने तेथील मॅनेजरने तिच्या घरी विचारणी केली. तेंव्हा सोनलबाबत शोधाशोध होऊन अखेर बोरीवली पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. शुक्रवारी ओवळ्यात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाचा शोध पोलिसांनी सुरू केल्यानंतर तिची ओळख पटली. शवविच्छेदनात तिची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. बोरीवलीत राहणारी सोनल ही ओवळ्यातील बंगल्यात कशी व कोणाबरोबर आली होती? ती कोणाच्या बंगल्यात गेली होती, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, याच ओवळ्यात निशा तुळशीराम गंभीर (३५) या महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणाचा कासारवडवली पोलीस तपास करीत आहेत.
सोनलचा मृतदेह सापडल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी शिळफाटा-महापे रोडवरील इंडस्ट्रीजवळील जंगलात एका २५ वर्षीय युवतीचा नग्नअवस्थेत मृतदेह सापडला. तिच्यावर तिक्ष्म हत्यारे वार करण्यात आले आहेत. हा मृतदेह बारबालेचा असण्याची शक्यता डायघर पोलिसांनी व्यक्त केली आहे.