Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मंत्रीपदाचा हट्ट धरणाऱ्यांसोबत ऐक्य कसे करणार ?
-प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन नेत्यांचा दारुण पराभव झाल्यामुळे रिपब्लिकन गटांच्या ऐक्याचा प्रयत्न काही नेत्यांनी सुरू केला आहे. मात्र निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेसकडे मंत्रीपदाचा हट्ट धरणाऱ्या नेत्यांसोबत ऐक्य कसे शक्य आहे, असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माजी खासदार रामदास आठवले यांचे नाव न घेता केला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन गटांना सोबत घेण्याचा विचार जागतिकीकरण विरोधी कृती समितीचे नेते करीत आहेत.
प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, डॉ. राजेंद्र गवई यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. आठवले यांना काँग्रेसने तर गवई यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघ सोडला होता. प्रकाश आंबेडकर स्वतंत्रपणे लढले होते. पराभव झाल्यानंतरही आठवले यांनी, काँग्रेसने केंद्रात मंत्रीपद द्यावे, अशी मागणी केली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने रिपब्लिकन चळवळ संपविण्यासाठीच या नेत्यांचा पराभव केला असून रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका राज्यभरातील कार्यकर्ते मांडत आहेत. औरंगाबाद येथील काही कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र काँग्रेससोबत असणाऱ्या नेत्यांना घेऊन ऐक्य होणार नाही. त्यांची चळवळ म्हणजे खासदारकी, आमदारकी मिळविणे एवढय़ापूरतीच मर्यादित आहे, अशी टीका करून आंबेडकर यांनी ऐक्यात त्यांना रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता नवीन कार्यकर्त्यांनी चळवळ ताब्यात घेतली पाहिजे, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे तर ऐक्यासाठी आपण तयार असल्याचे आठवले यांनी जाहीर केले आहे. रिपब्लिकन नेते पराभवानंतरही आत्मचिंतन करण्यास तयार नसताना आता रिपब्लिकन नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत सोबत घेण्याचा विचार जनता दलासह काही पक्षांनी सुरू केला आहे. या संदर्भात लवकरच बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. ९०च्या दशकात प्रकाश आंबेडकर यांनी या पक्षांसोबत आघाडी केली होती. मात्र नंतर ही आघाडी टिकली नाही. आता पुन्हा हे पक्ष रिपब्लिकन गटांना जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत.