Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

प्रादेशिक

राम प्रधान अहवाल: मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची नियुक्ती
मुंबई, ३१ मे/ खास प्रतिनिधी

मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यासंदर्भात शासनानने नेमलेल्या राम प्रधान समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर आता या अहवालानुसार तात्काळ कारवाई करण्याच्या दृष्टिने राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यांची कृती समिती नियुक्त करण्यात आल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. विद्यमान विधानसभेचे अखेरचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री आतिथिगृहावर आयोजित केलेल्या चहापानाला विरोधी पक्ष उपस्थित राहिला.

छत्रपतींच्या स्मारकाचा वाद, प्रधान समितीचा अहवाल, मुंबईवरील हल्ल्याचा प्रश्न गाजणार
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी
लोकसभेच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात मिळालेले यश, २६/११ हल्ल्याबाबत राम प्रधान समितीचा अहवाल, छत्रपती शिवरायांच्या स्मारकावरून निर्माण झालेला वाद या महत्त्वाच्या प्रश्नांबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विजेचा प्रश्न, बी-बियाण्यांच्या पुरवठय़ाचा प्रश्न यांचे तीव्र पडसाद उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विद्यमान विधानसभेचे अखेरचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील हे ४ जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे.

भारतीय युद्धनौकेने परतवले सागरी चाच्यांचे आक्रमण
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी

आखाती समुद्रात गस्त घालत असताना भारतीय नौदलाने सागरी चाच्यांचा डाव हाणून पाडला. ‘एमव्ही मौड’ या मालवाहू जहाजावर आक्रमण करून ते ताब्यात घेण्याचा समुद्री चाचांचा प्रयत्न भारतीय नौदलाच्या प्रयत्नामुळे अयशस्वी ठरला. २८ मे रोजी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी आठ सशस्त्र चाचे असलेली एक लहान बोट ‘मौड’ या मालवाहू जहाजाच्या दिशेने वेगाने जाताना भारतीय युद्धनौकेवरील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली.

पवनराजेंच्या हत्येतील ‘फायनान्सर’सतीश मंदाडे सीबीआयच्या जाळ्यात
डोंबिवलीतील भाजप नगरसेवक शुक्ल यांनाही अटक
मुंबई, पिंपरी, ३१ मे / प्रतिनिधी
लातूरच्या तेरणा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या प्रकरणात खासदार पद्मसिंह पाटील यांचा जवळचा सहकारी सतीश मंदाडे याच्यासह दोघांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) आज सायंकाळी ताब्यात घेतले. डोंबिवलीतील भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाचाही त्यात समावेश आहे.

मंत्रीपदाचा हट्ट धरणाऱ्यांसोबत ऐक्य कसे करणार ?
-प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन नेत्यांचा दारुण पराभव झाल्यामुळे रिपब्लिकन गटांच्या ऐक्याचा प्रयत्न काही नेत्यांनी सुरू केला आहे. मात्र निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेसकडे मंत्रीपदाचा हट्ट धरणाऱ्या नेत्यांसोबत ऐक्य कसे शक्य आहे, असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माजी खासदार रामदास आठवले यांचे नाव न घेता केला आहे.

एमव्हीएलयू-चिनॉय महाविद्यालयातील प्रवेश ऑनलाइन पद्धतीनेच
न्यायालयाच्या अनुमतीने व्यवस्थापनाला दणका
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी

एमव्हीएलयू आणि चिनॉय महाविद्यालयांतील अकरावीचे प्रवेश राज्य सरकारच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमार्फत करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी माहिती शासनाकडे पुरविण्याचे आदेशही न्यायालयाने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला दिले आहेत. न्या. जे. एच. भाटिया व न्या. मृदुला भाटकर यांच्या सुट्टीकालिन खंडपीठाने हा आदेश दिला आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एमव्हीएलयू व चिनॉय महाविद्यालयाचाही समावेश करण्याच्या लेखी सूचना शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली होती. परंतु, या सूचनेला केराची टोपली दाखवित महाविद्यालय व्यवस्थापनाने शासनाला सहकार्य करण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे ‘एलयूएमव्ही, चिनॉय महाविद्यालय बचाओ समिती’च्या वतीने मधू रम्बल, पांडूरंग घाडीगावकर व सुधाकर तिवारी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सदर निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालाचे समितीने स्वागत केले आहे.

ज्येष्ठ सवरेदयी कार्यकर्त्यां मालती चिंचलीकर यांचे निधन
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी

आचार्य विनोबा भावे यांच्या स्त्री शक्ती जागरणाच्या आणि महाराष्ट्रातील सवरेदय चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मालती श्रीराम चिंचलीकर यांचे आज दुपारी दीर्घकालीन आजाराने पनवेल जवळील शांतीवन येथे निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्या आजारीच होत्या. मालती आणि त्यांचे दिवंगत पती श्रीराम यांनी पंचावन्न वर्षांपूर्वी शासकीय नोकरी सोडून सवरेदयाला आपले जीवन वाहून घेतले होते. लोणावळ्याजवळ मळवली येथे त्यांचे हातमाग कागद उत्पादन व अन्य एका ठिकाणी जपानी भातशेतीचे मोठे काम उभे केले होते. मालती यांनी मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान केले आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांसह २३४ पोलिसांच्या बदल्या
मुंबई, ३१ मे / प्रतिनिधी

भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांसह एकूण २३४ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त डी. वैंकटेशन, स्वाती साठे या आयपीएस अधिकाऱ्यांचा बदल्या झालेल्यांत समावेश आहे. २०० पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागातील २४ जणांचा समावेश आहे. गेल्या आठवडय़ात पदोन्नतीवर मुंबईतील ५४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा राज्याच्या गृह मंत्रालयाने आयपीएस अधिकाऱ्यांसह २३४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. डॉ. वेंकटेशन यांची पोलीस महासंचालक (प्रशासन) म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नाशिकचे हिमांशु रॉय यांची मुंबईच्या दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बदली केली गेली आहे. आर्थर रोड तुरूंग अधीक्षक स्वाती साठे यांची नाशिक तुरुंगात बदली करण्यात आली असून अलिबागचे अधीक्षक प्रताप दिगावकर यांची आर्थर रोड तुरूंग अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

घराच्या वादातून हत्या
ठाणे, ३१ मे/प्रतिनिधी

घरबांधणीच्या वादातून चुलत मेहुण्याने उत्तम हरी शिंगे (३०) या भावोजीची निघृण हत्या केल्याची घटना काल घोडबंदर रोडवरील डोंगरीपाडा येथे घडली. उत्तम शिंगे याच्या घराचे बांधकामावरुन मेहुणा चंदू यादव यांच्यात वाद झाला. हा वाद इतका शिगेला पोहचला की यादव याने शिंगेच्या डोक्यात बॅट मारुन त्याची हत्या केली. आरोपीला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.