Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

भंडारदरा धरणातून पाण्याची गळती
मोरीची झडप बिघडली, पुढील आवर्तनात अडचण शक्य
अकोले, ३१ मे/वार्ताहर
भंडारदरा धरणातून पाण्याची गळती होत असून, धरणाच्या ५० फुटांवरील एका मोरीची झडप बिघडली आहे. ही झडप तातडीने दुरुस्त न झाल्यास धरणाच्या पुढील आवर्तन अडचणीत येण्याची शक्यता आहे. धरणाला ५० फूट, १०० फूट, १५० फूट व २०० फूट उंचीवर प्रत्येकी दोन अशा आठ मोऱ्या आहेत. सुमारे १०० वर्षांपूर्वी तयार झालेली पाणी सोडण्याची ही यंत्रसामुग्री आता जुनाट झाली आहे. त्यातच मागील काही वर्षांपासून देखभाल व दुरुस्तीकडेही जलसंपदा विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे या मोऱ्यांच्या झडपा वारंवार नादुरुस्त होतात. तसेच त्यातून पाण्याचीही मोठय़ा प्रमाणात गळती होते.

न्यायालयाबरोबरच विभागीय आयुक्तांकडे दाद
युतीचा कायदेशीर लढाईचा पवित्रा
नगर, ३१ मे/प्रतिनिधी
महापालिकेच्या दोन समित्या व स्वीकृत सदस्य निवडीवर न्यायालयाकडून स्थगिती मागायची व संख्याबळ बदलण्याच्या निर्णयावर विभागीय आयुक्तांकडे दाद मागायची, अशा दोन स्तरांवर कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय विरोधी सेना-भाजप युतीने घेतला असल्याचे समजते. गटनोंदणी रद्द करण्याची तरतूद कायद्यात नसल्याचे स्पष्ट करीत विभागीय आयुक्तांनी अपक्ष नगरसेवक संजय गाडे, अनिल शेकटकर व इंदरकौर गंभीर यांचे अर्ज फेटाळले होते, तरीही सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सर्वसाधारण सभेत गाडे यांच्याकडून नवा गट स्थापनेची उपसूचना मांडली व बहुमताच्या जोरावर ती मंजूर करून घेतली.

कुंटणखाना मालकिणीसह तिघांना कोठडी
मुलीच्या विक्रीप्रकरणी ‘पिटा’चा गुन्हा
शेवगाव, ३१ मे/वार्ताहर
देहविक्रयासाठी मुलीची विक्री करून तिच्या इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले, तसेच धमकी देऊन प्रतिज्ञापत्र करावयास भाग पाडल्याच्या आरोपावरून येथील कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध, तसेच तिच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी ‘पिटा’ (स्त्रियांचा अनैतिक व्यवहार प्रतिबंध कायदा) कायद्याखाली, तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पक्षाने उमेदवारी दिल्यास विधानसभा लढवू - भोस
श्रीगोंदे, ३१ मे/वार्ताहर
कुकडीच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वानी वनमंत्री बबनराव पाचपुते यांना भक्कम पाठबळ देण्याची गरज होती. मात्र, दुर्दैवाने त्यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी याप्रश्नी राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रश्न चिघळला. यापुढे तरी विकासात्मक मुद्दय़ावर सगळ्यांनी एकजूट ठेवून लढा द्यावा, असे आवाहन करतानाच पक्षाने उमेदवारी दिल्यास विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी स्पष्ट केले.

बेलवंडीजवळ मिळणार २० बिबटय़ांना ‘निवारा’!
श्रीगोंदे, ३१ मे/वार्ताहर
तालुक्यातील बेलवंडी परिसरात होणाऱ्या देशातील पहिल्या बिबटय़ा निवारण केंद्रात (लेपर्ड रेस्क्यू सेंटर) साधारण २० बिबटय़ांना आश्रय मिळेल. त्यांच्या संगोपन व देखभालीसाठी एक वैद्यकीय अधिकारी, एक वनपाल, एक वनरक्षक, १० मजूर असा ताफा असणार आहे. याबरोबरच बिबटय़ांवर उपचारासाठी शस्त्रक्रिया विभाग, स्वतंत्र पिंजरे असतील.

.. मी पोरका झालो
इंग्रजी सातवीत गेलो, परंतु तोपर्यंत मला भूमिती, काव्य वगैरे विषय नव्हते. द्रविड, साठे आणि इतर काही शिक्षकांनी मला विनामोबदला शिकवायला सुरुवात केली. शाळेत वेळेअभावी जादा तास घेता येत नसल्याने आठवडय़ातून एक दिवस रात्रीच्या वेळी ते मला शिकवत. मी गावी जाऊन-येऊन शिकत होतो. परंतु यासाठी संगमनेरी मुक्काम करण्याची वडिलांकडून परवानगी घेतली. रंगारगल्लीत आम्ही दहा-बारा विद्यार्थ्यांनी मिळून भाडय़ाने खोली घेतली. मी आठवडय़ातून एक दिवस खोलीवर मुक्काम करायचो.

वाळूतस्करीचा राक्षस!
शिक्षण, सहकार, दूधसम्राटांनंतर नगर जिल्ह्य़ात नव्याने उदयाला आलेल्या वाळूसम्राटांकडून सरकारचा महसूल बुडविण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा उद्योग सध्या जोरात सुरू आहे. या वाळूतस्करांनी काही दिवसांपूर्वी कोतवालाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले. नायब तहसीलदारालाही मारहाण केली. यावरून ज्यांच्या जीवावर वाळूतस्करीचा हा राक्षस पोसला गेला त्यांच्याच मानगुटीवर हे भूत बसल्याचे दिसू लागले आहे. जिल्ह्य़ात मुळा, प्रवरा, घोड, गोदावरी, भीमा, सीना या प्रमुख नद्या आहेत.

पालकमंत्र्यांची नाराजी फक्त दाखवण्यापुरतीच?
स्वीकृत सदस्य निवडीचा वाद
नगर, ३१ मे/प्रतिनिधी
स्वीकृत सदस्य निवडीबाबत पालकमंत्री दिलीप वळसे यांनी जाहीर केलेली नाराजी फक्त दाखवण्यापुरती होती की पक्ष खरोखरीच त्याची दखल घेणार आहे, अशी कुजबूज महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाने केलेल्या स्वीकृत सदस्य निवडीवरून त्यांच्याही नगरसेवक, कार्यकर्त्यांत असंतोष असून काहीजण यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधणार असल्याचे समजते.

सीना नदीच्या पात्रात हात-पाय तोडलेला मृतदेह
नगर, ३१ मे/प्रतिनिधी
कुजलेल्या स्थितीतील मृतदेह धर्माधिकारी मळ्याजवळील सीना नदीच्या पात्रात आज आढळला. या मृतदेहास हात-पाय नाहीत, तसेच चेहरा विद्रुप करण्यात आलेला आहे. डोक्याचे केस काढून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.याबाबत तोफखाना ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज दुपारी एका नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहचले. धर्माधिकारी मळ्याजवळ सीनापात्रात अंदाजे ५५ वर्षांंच्या पुरूषाचा मृतदेह पडला होता. मृतदेहाजवळच कपडे, चपला काढून ठेवलेल्या होत्या. कपडय़ात पाकीट होते. त्यात २०० रुपये सापडले. मात्र पत्ता, नाव असे काहीच नव्हते. हा नरबळी किंवा खुनाचा प्रकार असावा असा संशय व्यक्त होत आहे.सहायक पोलीस अधीक्षक संजय दराडे, तोफखान्याचे निरीक्षक मधुकर निकम, उपनिरीक्षक भाऊसाहेब गोंदकर, काकडे यांनी घटनास्थळास भेट दिली.

कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे एसटी नफ्यात - दाते
पारनेर, ३१ मे/वार्ताहर

काही वर्षे तोटय़ात असलेले राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा नफ्यात आले असल्याचे बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी सांगितले.
येथील आगारातील वाहतूक नियंत्रक यमनाजी घोलप, चालक विठ्ठल दिघे, वाहक डी. जी. गोरे व शाहूराव जाधव प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. आगारातील कर्मचारी व प्रशासनाच्या वतीने आयोजित निरोप समारंभात दाते बोलत होते. आगारप्रमुख एस. टी. ठाणगे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे सदस्य वसंत चेडे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य रा. या. औटी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सलीम राजे, सदाशिव औटी, ए. जी. ठुबे, बलभीम कुबडे, एम. के. शिंदे, गाडीलकर, शिवाजी पवार, सुरेश शिंदे, काळे उपस्थित होते.दाते म्हणाले की, खासगी, तसेच अवैध प्रवासी वाहतुकीचे मोठे आव्हान एसटीपुढे आहे. त्या आव्हानाशी समर्थपणे मुकाबला करण्यासाठी एसटीने सेवेचा दर्जा सुधारला. कर्मचाऱ्यांनीही प्रयत्न केले. या पद्धतीने प्रयत्न सुरू ठेवल्यास एसटीचा सुरुवातीचा सुवर्णकाळ पुन्हा येईल.

कार्यकारी अभियंता निर्मळ यांना निरोप
नगर, ३१ मे/प्रतिनिधी

अधिकारी व कर्मचाऱ्यांची साथ मिळाल्याने चांगले काम करता आले. आपण त्याबद्दल समाधानी आहोत, असे प्रतिपादन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर निर्मळ यांनी केले.
३५ वर्षांच्या सेवेनंतर निर्मळ नुकतेच निवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेतर्फे उपाध्यक्ष एस. एम. चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पतसंस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ घुगरकर, संचालक द. ज. गडाख, स. व. वाव्हळ, भा. अ. कल्हापुरे यांचीही या वेळी भाषणे झाली. प्रास्ताविक काळे यांनी केले. सूत्रसंचालन दे. भा. खामकर यांनी केले. मराठा नागरी पतसंस्थेतर्फेही निर्मळ यांचा संस्थेचे अध्यक्ष प्रा. पोपट काळे यांनी सत्कार केला. या वेळी जि. प. कार्यकारी अभियंता जी. डी. पोखरकर, अभियंता बबन खिलारी, बप्पासाहेब बोडखे, संपत साठे, बाळकृष्ण काळे आदी उपस्थित होते.

इंटक विभागीय अध्यक्षपदी अडसूळ यांची नियुक्ती
नगर, ३१ मे/प्रतिनिधी

राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसच्या (इंटक) नगर विभागीय अध्यक्षपदी आर. बी. अडसूळ (नगर) यांची, तर कार्याध्यक्षपदी आर. एस. नानेकर (पारनेर) यांची नियुक्ती करण्यात आली.इंटकचे अध्यक्ष गोविंदराव आदिक व उबेद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात ४ उपाध्यक्ष, ४ सहसचिव, ४ संघटन सचिवांचा समावेश आहे.विभागीय कार्यकारिणीत एन. डी. कासार, रावसाहेब जाधव, संजीव मिसाळ, एस. एच. पठाण (उपाध्यक्ष), शेख हनीफ (सचिव), डी. एम. घोरपडे, एम. बी. बाराते, शेख अन्सर, ए. एफ. दाभाडे, एस. एम. लवांडे (सहसचिव), डी. बी. कदम, मोहन जोडिया, संजय पाटोळे, बी. व्ही. ताकते (संघटन सचिव), ए. एस. लकारे, अनिल वागडे, व्ही. डी. भोये (सदस्य) यांचा समावेश आहे.

हागणदारीमुक्त गाव मोहीम पुणतांब्यामध्ये थंडावली
राहाता, ३१ मे/वार्ताहर

निर्मलग्राम स्वच्छता अभियान व हागणदारीमुक्त गाव मोहिमेचे काम पुणतांबे व परिसरात थंडावल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे. हागणदारीमुक्त गावासाठी सरकार लाखो रुपये खर्च करीत असून यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून विशेष कार्यक्रम हाती घेऊन जनजागृती केली जाते. येथे मात्र ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य यांच्यात या कामाबद्दल उदासीनता दिसते. काही महिन्यांपूर्वी भरारी पथकाने येथे अनेकांना उघडय़ावर प्रातर्विधीस बसताना कॅमेराबद्ध केले होते. परंतु कोणतीही कार्यवाही न होता नागरिकांच्या दबावामुळे पुन्हा पथक इकडे फिरकलेच नसून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडूनही ही मोहीम राबविण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मुबलक पाण्याअभावी हागणदारीमुक्त गाव मोहीम बारगळली असली, तरी ग्रामपंचायतीने निर्मलग्राम स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे.

सावरकर पतसंस्था ‘दीनदयाळ’मध्ये विलीन
नगर, ३१ मे/प्रतिनिधी

शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नागरी पतसंस्थेचे पंडित दीनदयाळ नागरी पतसंस्थेत विलिनीकरण करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार दिलीप गांधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघचालक शांतीभाई चंदे होते.पंडित दीनदयाळ पतसंस्थेने मंदीच्या काळातही आपले सामाजिक उत्तरदायित्व सोडले नाही. सर्वसामान्यांना स्वतच्या पायावर उभे करण्याचे संस्थेचे धोरण कौतुकास्पद आहे, असे गांधी म्हणाले. तालुका उपनिबंधक प्रशांत सोनवणे, चंदे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक पतसंस्थेचे संस्थापक वसंत लोढा यांनी केले. राजेंद्र गटणे यांनी सूत्रसंचालन केले. आभार गौतम दीक्षित यांनी मानले. संस्थेचे अध्यक्ष विकास पाथरकर, उपाध्यक्ष सुधीर पगारिया, अविनाश धर्माधिकारी, सुनील रामदासी आदी या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची
पूर्वपरीक्षा सुरळीत
नगर, ३१ मे/प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा आज नगरमध्ये व्यवस्थित पार पडली. जिल्ह्य़ातील ६ हजार १३० विद्यार्थ्यांंनी परीक्षा दिली. एकूण ७ हजार २३२ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होते. मात्र, १ हजार १०२ विद्यार्थी परीक्षेस बसले नाहीत. प्रभारी जिल्हाधिकारी बी. आय. केंद्रे यांनी परीक्षा केंद्रांना दुपारी भेट दिली. त्यांच्यासमवेत आयोगाचे विशेष निरीक्षक शरद लोंढे व सुतार होते. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांनी परीक्षेचे नियंत्रण केले. कुठलाही अनुचित प्रकार न होता सर्व म्हणजे १९ केंद्रांवर परीक्षा व्यवस्थित पार पडली, असे त्यांनी सांगितले.

सहा पोलीस निरीक्षकांची नगर जिल्ह्य़ात नियुक्ती
नगर, ३१ मे/प्रतिनिधी

मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील ९१ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यापैकी ६जणांची नियुक्ती नगर जिल्ह्य़ात झाली आहे. निवडणूक आचारसंहिता उठल्याबरोबर बदल्यांच्या प्रक्रियेस वेग आला आहे. पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यानुसार ९१ निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काल निघाले. सीआयडी विभागाकतील मधुकर औटे, उत्तम चौधरी, श्रीकांत पांडुरे, नंदकुमार घोरपडे, नानवीज (दौंड) पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सुरेश गायधनी, बीड येथून बी. बी. मुधेराज हे निरीक्षक नगर जिल्ह्य़ात येत आहेत. जिल्ह्य़ातील कोणताही निरीक्षक मात्र बाहेर गेलेला नाही. पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे यांची बदली एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. कोपरगाव विभागासाठी उपअधीक्षक म्हणून श्रीकांत जावळे, तर श्रीरामपूरसाठी संजय कडासने येत आहेत. पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे यांनी आज जिल्ह्य़ातील ६ वर्षे एका ठाण्यात पूर्ण केलेल्या ४० चालक पोलीस व इतर कर्मचारी अशा एकूण ६० पोलिसांच्या बदल्यांचे आदेश काढले.

गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या
नगर, ३१ मे/प्रतिनिधी

सारोळे कासार (ता. नगर) येथील गेणू नाना धामणे (६१ वर्षे) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र, त्यांना दारूचे व्यसन होते. घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने त्यांनी गळफास घेतला. तपास हवालदार बटुळे करत आहेत.