Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

नवनीत

गोपाळ मास्तर स्वभावाने चांगले होते. त्यांनी नानकांच्या बालकाव्याचा शांतपणे विचार केला. ती कविता अशी होती.. ‘तो सृष्टीचा रचयिता आहे. तोच साऱ्यांचा स्वामी. जे मनोयोगपूर्वक त्याच्या सेवेत रमून राहातात, त्यांच्याच या सृष्टीत येण्या-राहाण्याला काही अर्थ असतो.
हे माझ्या मूर्ख मना! हरितत्त्वाचा विसर कसा बरे पडतो? तुझे गाफिल राहाणे तर फारच विचित्र म्हटले पाहिजे. कधीतरी आपल्या केल्या गोष्टीचा हिशेब आपल्याला चुकवावा लागेलच. तुला याची तर जाणीवदेखील नाही. त्या आदिपुरुषाशी वा परमतत्त्वाशी ओळख कशी बरे करून द्यावी? जे सारे दिसते त्याचेच रूप आहे. उपमा त्याचीच त्याला द्यायची की काय? गुरूकडून कृपा झाली तरच त्या परमात्म्याला आपण ओळखू शकतो आणि मग आपले सारे दौर्बल्य संपते. आपल्याला परम आनंदाची प्राप्ती होते.’
बालक नानकांचे हे अगाध, आध्यात्मिक ज्ञान पाहून गुरुजी थक्क झाले. ते स्वभावाने फार चांगले होते. त्यांनी अनेक ग्रंथ वाचले होते. माणसेही पुष्कळ अनुभवली होती. जगरहाटीचा बराच विचार केला होता. त्यांना हे ठाऊक होते : संतपुरुषांचा उदय हा एक योग असतो. देवेच्छेनेच तो येतो. म्हणून ते मनात म्हणाले : ‘नानक हा इतर मुलांसारखा नाही. तो सामान्य तर नाहीच. तो अत्यंत बुद्धिमान आहे. मेधावी आहे. त्याला आपण चारचौघांसारखे वागवले हे आपले चुकले. आपण त्याला समजून घ्यायला हवे. त्याला त्याच्या मार्गाने जाऊ देण्यास मदत करायला हवी..’ मग त्या दिवसापासून गुरुजी आणि नानक यांच्यात एक वेगळाच स्नेहभाव निर्माण झाला. ते त्याच्या कवितांना उत्तेजन देऊ लागले. त्या कविता आवर्जून वाचू लागले. इतर विद्यार्थ्यांनाही वाचून दाखवू लागले. नानक इतर मुलांसह जेव्हा भजनकीर्तन करी तेव्हा गुरुजीही त्यात सामील होऊ लागले. सारा मोहराच बदलून गेला. बालक नानकच्या लीला केवळ मान्यच नव्हे, तर साऱ्यांना प्रिय होऊ लागल्या.
नानकांची पाठशाळा इथेच संपली.
अशोक कामत

भविष्यातील अंतराळयानात आजच्यापेक्षा वेगळे तंत्रज्ञान वापरले जाण्याची किंवा वेगळय़ा प्रकारचे संशोधन केले जाण्याची शक्यता आहे का?
दरवर्षी अंतराळ संशोधनात नवीन गोष्टींची भर पडतच असते. त्यातच अवकाश तंत्रज्ञान जीवनातील अनेक क्षेत्रांत उपयुक्त ठरू लागले आहे. संशोधकांपुढील यानंतरचे आव्हान म्हणजे चंद्र-मंगळावरील वसाहतीसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास. सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्येही होत असलेल्या अशा अभ्यासात शेतीवरील प्रयोग खूप महत्त्वाचे ठरले आहेत. काचेच्या पेटय़ांमध्ये पूर्णपणे कृत्रिम वातावरणात पालेभाजी वाढविण्याचे प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झालेले आहेत. एकदा आपल्याला अवकाशात किंवा चंद्रावर पीक घेता आले तर अन्नाचा प्रश्न काही प्रमाणात तरी सुटेल. वजनरहित अवस्थेत पदार्थाचे गुणधर्म, तसेच रासायनिक क्रिया घडून येण्यासाठी लागणारा काळ वेगळा असू शकतो. त्या दृष्टीने अतिवाहकतेसारख्या भौतिक क्रिया आणि रासायनिक क्रियांवरही अंतराळात संशोधन केलं जाईल. त्याचबरोबर वनस्पतींतील आणि प्राण्यांच्या शरीरातील अंतर्गत क्रियांत वजनविरहित अवस्थेत होणाऱ्या बदलांवर संशोधन केलं जाईल. औषधनिर्मितीवरही अंतराळात संशोधन केले जाणार आहे.
यानाचे इंधन हे भविष्यात आयनीभूत वायूच्या स्वरूपातले असेल. यामुळे यानाला ताशी ५०,००० कि.मी.चा वेग गाठणं शक्य होईल. अंतराळ स्थानक हे जमिनीपासून केवळ साडेतीनशे कि.मी. अंतरावर आहे. चंद्र आहे तब्बल पावणेचार लाख कि.मी. अंतरावर आणि मंगळ तर आणखी दूर! इ.स. २०३० साली मंगळावर मानवी मोहीम पाठविण्याची अमेरिकेच्या ‘नासा’ची तयारी चालू आहे. ही मोहीम जवळजवळ तीन वर्षांची असेल. म्हणजे त्यासाठी अन्न, कपडे, इंधन या सगळय़ाच बाबींमध्ये आमूलाग्र बदल होण्याची निकड आहे. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांत आपण बरीच प्रगती केलेली असली तरी अनंत प्रवासाची ही तर नुसती सुरुवातच आहे, असे म्हणायला हरकत नाही!
गौरी दाभोळकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

‘लोकसत्ता’चे माजी संपादक, झुंजार पत्रकार, लेखक, वक्ता असे चौफेर व्यक्तिमत्त्व लाभलेले माधव गडकरी १ जून २००६ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. माधव यशवंत गडकरी. जन्म २५ सप्टेंबर १९२८. पत्रकारितेचा प्रारंभ निर्झर, क्षितिज, निर्धार ही स्वत:ची मासिके काढून केला. काही काळ आकाशवाणी दिल्लीच्या केंद्रावरही कार्यरत होते. वृत्तपत्रसृष्टीत ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य उपसंपादक म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द सुरू झाली. यानंतर पणजीतील ‘गोमंतक’ या वर्तमानपत्रात संपादक म्हणून रूजू झाले. ‘गोमंतका’तील संपादकीय कामगिरीमुळे ‘गोव्याचे राजदूत’ अशी उपाधी त्यांना मिळाली. तथापि त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली ती दै. ‘लोकसत्ता’त संपादक असताना. त्यांचे ‘चौफेर’ हे सदर अवघ्या महाराष्ट्राची प्रबोधनाची चावडी ठरले. त्यांच्या संपादकीय काळातच ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांचा कोटय़वधी रुपयांचा परदेशी दौरा रद्द करायला भाग पाडले, तसेच पोलीस निरीक्षक भरतीसाठी होणारा लाखो रुपयांचा व्यवहार त्यांनी उघडकीस आणला. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांचा सिमेंट भ्रष्टाचार (प्रतिभा प्रतिष्ठान) उकरून काढून साऱ्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. यामुळे अंतुलेंना राजीनामा द्यावा लागला. ‘निर्धार ते लोकसत्ता’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासह तीसच्या वर पुस्तके त्यांनी लिहिली. पद्मश्रीसह अनेक पुरस्कार त्यांना लाभले. जागतिक मराठी अकादमी स्थापण्यात त्यांचा वाटा मोठा, तसेच पहिली जागतिक मराठी परिषद त्यांच्याच पुढाकाराने संपन्न झाली.
संजय शा. वझरेकर

पिटय़ाच्या सांगण्यावरून गुरुगृही गेलेल्या तुमच्याच वयाच्या मुलाची ही गोष्ट. या मुलाने कितीही वेळा मंत्र ऐकला, म्हटला, घोकला तरी पाठ व्हायचा नाही. वर्गातली मुले त्याची चेष्टा करायची, गुरू शिक्षा करायचे. दोन वर्षे अशी गेली. तो फार निराश झाला. आपण ‘ढ’ आहोत, आपल्याला शिकणे जमणार नाही, असे त्याच्या मनाने घेतले.
आईवडिलांच्या आपल्याबद्दल किती अपेक्षा आहेत. असे अडाणी राहून परत गेलो तर त्यांना फार दु:ख होईल. घरी तरी कसं परतायचं. त्यापेक्षा जीव द्यावा, असा विचार करून हा पोर आश्रमातून निघाला. गळय़ात धोंडा बांधून विहिरीत जीव द्यावा, असे त्याला वाटले. आश्रमाच्या परिसरात जीव दिला तर आश्रमाला, गुरूंना कमीपणा येईल म्हणून तो रात्रभर चालत राहिला.
पहाटे एका खेडेगावाबाहेर पडक्या विहिरीशी तो पोहोचला. जीव द्यायला ही अनोळखी जागा चांगली होती. पण नेमक्या त्याचवेळी विहिरीवर पाणी भरायला काही स्त्रिया येऊ लागल्या. विहिरीच्या काठावर गुडघ्याला मिठी घालून तो बसून राहिला. या स्त्रिया गेल्या की, गळय़ात धोंडा बांधून उडी मारू. नाहीतर आरडाओरडा होऊन आपल्याला वाचवतील, असा विचार करून तो बसून राहिला. नजरेसमोरच एक दगड होता. त्या ओबडधोबड दगडावरून विहिरीत दोर सोडला होता. पाणी काढायच्या भांडय़ाला तो बांधलेला होता. दगडावरून तो दोर वरखाली होत होता. त्यामुळे दगडाला गुळगुळीत छान खाच झाली होती. मुलाच्या मनात विचार आला, ‘हा दगडासारखा दगड, पण न थांबता, न थकता दोर त्यावरून पुन:पुन्हा गेल्याने त्याचा ओबडधोबडपणा जाऊन तो केवढा सुंदर गुळगुळीत झाला. त्याला आकार आला. मी तर माणूस आहे. मला का नाही येणार आकार?
त्याच्या डोक्यातले ‘आत्महत्येचे विचार कापरासारखे उडून गेले. तो आश्रमात परत आला. न थकता, निराश न होता जिद्दीने पुन्हा अभ्यास करू लागला. त्याच्या यशाने गुरू, विद्यार्थी चकित झाले. हा मुलगा म्हणजे संस्कृत भाषेचा महान पंडित, कवी, नाटककार, कादंबरीकार आणि सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारातला प्रतिष्ठित विद्वान ‘बाणभट्ट’. हजार वर्षे झाली तरी बाणभट्ट आपल्या ‘कादंबरी’ या साहित्यकृतीने अजरामर आहे.
निराशा हा शब्द शब्दकोशातून काढून टाकूया. आयुष्य ही आपल्याला मिळालेली परमेश्वराची सुंदर भेट आहे. कशाला हवी थोडय़ा अपयशातून निराशा. आयुष्यामधला रस, उत्साह, उमेद अपयशामुळे जाऊ द्यायची नसते.
आजचा संकल्प - मी अपयशामुळे खचून जाणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com