Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

उदयसिंग चंदेल यांची अमरावतीला, सयाजी देशमुखांची मुंबईला बदली
६ पोलीस निरीक्षक अन्य शहरातून नागपुरात
नागपूर, ३१ मे / प्रतिनिधी
पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांनी राज्यातील ९१ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. यामध्ये नागपूर शहर दलात सहा तर ग्रामीणमध्ये एका पोलीस निरीक्षकाला पाठवण्यात आले आहे. नागपुरातून दोघांना बाहेर पाठवण्यात आले आहे. या बदल्या प्रशासकीय फेरबदल आणि विनंतीवरून करण्यात आल्या आहेत.

आता ‘विनंती’च्या माध्यमातून बदल्यांवर जोर
नागपूर, ३१ मे/ प्रतिनिधी

राज्य शासनाने प्रशासकीय बदल्यांना स्थगिती दिल्याने आता गरजूंनी ‘विनंती’च्या माध्यमातून बदल्या करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एकाच ठिकाणी सलग तीन वर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात होत्या. प्रशासकीय बदल्यांमध्ये याचा समावेश होत होता. यंदा अशा बदल्यांना राज्य शासनाने स्थगिती दिली असून फक्त विनंती बदल्याच करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत.

पंधरवडय़ात रामटेकच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ -मुकुल वासनिक
नागपूर, ३१ मे / प्रतिनिधी

रामटेक लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांची सद्यस्थिती आणि समस्यांबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून येत्या पंधरवडय़ात माहिती घेतल्यानंतर प्रत्यक्षात कोणती आणि कशी कामे करायची याचा ‘मास्टर प्लॅन’ निश्चित करू, असे सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. वासनिक यांचे शुक्रवारी रात्री येथे आमगन झाले. शहरातील टेकडी गणेश मंदिर, दीक्षाभूमी, ताजबाग आदी ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आज रामटेक मतदारसंघाचा दौरा केला.

उष्ण हवामानापासून जून महिन्यात सुटका
नागपूर, ३१ मे /प्रतिनिधी

उन्हाचा प्रकोप, प्रचंड उकाडा, पाणीसमस्या यामुळे त्रस्त झालेले नागरिक आता मान्सूनच्या प्रतिक्षेत असून यादृष्टीने जून महिना दिलासा देणारा असतो. सध्या विदर्भात ढगाळ वातावरण असले तरी तापमानही चढलेलेच असल्याने उष्याच्या तडाख्यातून नागरिकांची सुटका झालेली नाही. दिवसभर कडक उन्हं असते व सायंकाळी वादळी वारा सुटतो व ढग दाटून येतात. क्वचित पावसाचे चार थेंब येतात. त्यामुळे उकाडा अधिकच वाढतो. या उकाडय़ामुळे नागरिकही घायकुतीस आले असून मशागतीच्या लगबगीत गुंतलेला शेतकरीही पावसाकडे डोळे लावून बसला आहे.

कृषी खात्याचा नियोजनाचा फार्स..
चंद्रशेखर बोबडे

बियाणे आणि खतांचा दरवर्षी होणारा काळाबाजार, शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आणि परिणामी हवालदिल होणाऱ्या बळीराजाकडे पाहता कृषी खात्याने केलेल्या नियोजनाला काय अर्थ उरतो? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरवर्षी खरीप हंगाम येतो.. त्याचा कालावधीही ठरलेला असतो.. लागवड क्षेत्रही कमी अधिक प्रमाणात सारखेच असते.. खते आणि बी-बियाणांच्या मागणीचा अंदाजही पूर्वीच आलेला असतो.. असे असतानाही दरवर्षी बियाणे आणि खतांची टंचाई निर्माण होते आणि त्यात शेतकरी भरडला जातो, नाउमेद होतो.

बियाणांच्या किमतीत दुपटीने वाढ
* बी.टी. बियाणांचा काळाबाजार * शेतकरी हवालदिल
नागपूर, ३१ मे / प्रतिनिधी
खरीप हंगामासाठी बी-बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. राशी-२ या कपाशीच्या बियाणांचा सर्रास काळाबाजार सुरू असून इतर बियाणांच्या किमतीतही २५ ते ५० टक्कयांपर्यंत वाढ झाली आहे.खरीप हंगामात यंदा वेळेवर पाऊस येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांनी मशागतीला लवकर सुरुवात केली.

शैक्षणिक संस्था व प्राधिकरणांच्या तपासणीचे उद्दिष्ट
भारतीय गुणवत्ता परिषदेची स्थापना
नागपूर, ३१ मे / प्रतिनिधी
भारत सरकारने भारतीय उद्योग समूहांसोबत भारतीय गुणवत्ता परिषद (क्यूसीआय) या स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना केली असून याद्वारे शैक्षणिक क्षेत्रातील संस्था व प्राधिकरणांची तपासणी करण्यात येणार आहे. भारतीय गुणवत्ता परिषद राष्ट्रीय गुणवत्तेच्या नियंत्रणाबरोबरच तिच्या अंमलबजावणीतडेही लक्ष देणार आहे. भारतीय उत्पादने व सेवा यांची गुणवत्ता कशी वाढेल हे भारतीय गुणवत्ता परिषदचे मुख्य उद्दिष्ट राहील.

पोलिसाला वाहनचालकाची मारहाण,
सहकारी शिपायाचाही घेतला चावा
नागपूर, ३१ मे / प्रतिनिधी
पाचपावली पोलीस ठाण्यातील पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी कार चालकास अटक केली आहे तसेच सहकारी पोलिसाच्या हाताला जोरदार चावा घेतला. पोलिसाला वाहनचालकाने मारहाण करण्याची शनिवारची ही दुसरी घटना आहे. या घटनेने वाहतूक व शहर पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘बिडी-तंबाखू-घुटका, शरीर स्वास्थ्याला फटका’
जनजागरण मिरवणूक
नागपूर, ३१ मे / प्रतिनिधी
‘बिडी-तंबाखू-घुटका, शरीर स्वास्थ्याला फटका’ असे फलक हातात घेऊन आदिम संशोधन अध्ययन मंडळाच्यावतीने तंबाखू विरोधी दिनानिमित्त टिमकी मराठी प्राथमिक शाळेतून जनजागरण मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध शाळेतील मुले व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

आठवलेंच्या वैदर्भीय कार्यकर्त्यांचे चिंतन
विधानसभा स्वबळावर लढण्याचा सूर
नागपूर, ३१ मे / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) व रिपब्लिकन पक्षाच्या अन्य गटांच्या उमेदवारांच्या पराभवाची कारणे तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका यावर आठवले गटातर्फे चिंतन करण्यात आले. येणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार या चिंतन बैठकीत समोर आला.

पारा घसरला
नागपूर, ३१ मे / प्रतिनिधी

गेल्या चोवीस तासात विदर्भात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे अनेक भागात तापमानात घट झाली आहे. गेल्या अनेक दिवसात कडक उन्हं आणि उकाडय़ामुळे नागरिक त्रस्त असून आज पारा उतरल्याने तेवढाच दिलासा मिळाला. विदर्भात उष्णतेची लाट कायम असताना शनिवारी सायंकाळी नागपुरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तापमानात घट झाली. आजही दिवसा उन्हं होते मात्र, मे महिन्यातील रस्ते निर्मनुष्य करणाऱ्या तप्त उन्हाच्या तुलनेत उन्हाची तीव्रता कमी झाली. विदर्भाच्या अन्य भागात पाऊस नसला तरी ढगाळ वातावरणामुळे अनेक शहरांतील तापमान कमी झाले आहे. उकाडा मात्र कायमच असून सर्वानाच पावसाची प्रतीक्षा आहे. विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४३.४ तर सर्वात कमी तापमान अमरावती येथे ३३ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. नागपूर विमानतळावर ४३, अकोला ४०.७, गोंदिया ४१.१, वाशीम ४१.८ तर यवतमाळ येथे ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

नवोदित वकिलांसाठी आजपासून परिषद
नागपूर, ३१ मे / प्रतिनिधी

सहयोग ट्रस्ट आणि भारती विद्यापीठ विधि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने उद्या, सोमवार १ जूनपासून नवोदित वकिलांसाठी राज्यपातळीवर परिषद आयोजित करण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती एस.बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत भारती विद्यापीठ विधि महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद सारडा, अ‍ॅड. असिम सरोदे, सहयोग ट्रस्टच्या अ‍ॅड. रमा सरोदे उपस्थित राहणार आहे. कैद्यांचे हक्क आणि अधिकार, मानवी हक्क संरक्षण, फौजदारी कायद्यातील बदल, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा इत्यादी विषयांवर विविध तज्ज्ञांची भाषणे होणार आहे. नागपूरसह यवतमाळ, अकोला वर्धा, जालना, जळगाव, औरंगाबाद, सातारा, अहमदनगर, पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी जिल्ह्य़ातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. वकिली व्यवसाय करतानाच सामाजिक वकिली करून समाजसेवा साधण्याचा नवा दृष्टिकोन नवोदित वकिलांसमोर मांडण्याचा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

‘पर्यावरणाच्या छायेत मानवी जीवन व आपली जबाबदारी’वर भित्तिपत्रक व निबंध स्पर्धा
नागपूर, ३१ मे प्रतिनिधी

वाढती कारखानदारी, वाहने, लोकसंख्या, उंच इमारती, वृक्षतोड इत्यादी अनेक कारणांमुळे परिसरातील प्रदूषण झपाटय़ाने वाढत असून पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आपल्या परिसरात पर्यावरण चांगले कसे ठेवता येईल या भावनेतून व पर्यावरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्ञानदीप या सामाजिक संघटनेतर्फे पर्यावरण दिनाचेनिमित्त साधून भित्तीपत्रक व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘पर्यावरणाच्या छायेत मानवी जीवन व आपली जबाबदारी’ या विषयावर भित्तीपत्रक आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी १५ जूनपर्यंत आशीर्वाद एन्टरप्रायझेस अ‍ॅन्ड अ‍ॅडव्हर्टायझर्स, १८१, गोतमारे कॉम्पलेक्स, लक्ष्मीभूवन चौक येथे संपर्क साधावा, असे आवाहन ज्ञानदीप संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

विविध संस्थांच्या सभेत केंद्राच्या नऊ योजनांवर चर्चा
नागपूर, ३१ मे/प्रतिनिधी
म्युअर मेमोरियल हॉस्पीटल येथे संचालक विलास शेंडे यांनी विविध संस्थांची सभा आयोजित करून केंद्र सरकारच्या नऊ योजनांवर चर्चा केली. या सभेला २० संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था, अंत्योदय अन्न योजना, माध्यान्ह भोजन योजना, एकात्मिक बालविकास योजना, अन्नपूर्णा योजना, राष्ट्रीय वृद्धावस्था लाभ योजना, राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, जननी सुरक्षा योजना, राष्ट्रीय रोजगार हमी योजना आदींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत करीम डेविड, डॉ. सावरकर, डॉ. अशोक धाबेकर, ज्योती नगरकर, मोसेस गौर सहभागी झाले होते.

ज्योतिरादित्य शिंदे समर्थकांचा आनंदोत्सव
नागपूर, ३१ मे / प्रतिनिधी

ज्योतिरादित्य शिंदे यांचा दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल नागपुरातील त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. राजेंद्र नंदनकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवून व आतषबाजी करून मिठाई वाटली. ज्योतिरादित्य शिंदे यांना येथे आमंत्रित करण्यासाठी नंदनकर व त्यांचे सहकारी लवकरच दिल्लीला जाणार आहेत. यावेळी लक्ष्मणराव कुंभारे, अभिमन्यू निनावे, विजय वैरागडे, डॉ. हरिश्चंद्र पौनिकर, वासुदेव चांदेकर, हरिहर माताघरे, गोविंद डायरे, सुनील पोहणे, दिनेश कुंभारे, राजू परोशिया, राजेश खडसे, अनिल उईके, नीळकंठ देवीकर, सुरेंद्र माताघरे, अनिल वाकोडीकर, घनश्याम भनारकर, विक्रम वाघ, हिरा कुंभारे, माला रामटेककर, रूपाली नंदनकर, मीना गुप्ता आणि लक्ष्मी पराते आदी उपस्थित होते.

जेसीआयचे विभागीय अधिवेशन थाटात
नागपूर, ३१ मे/प्रतिनिधी

जेसीआय नागपूर गोंडवानाच्या वतीने जेसीआयचे विभागीय अधिवेशन ‘हंगामा २००९’ आयएमए हॉल व इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात २४ मे रोजी पार पडले. अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित, जेसी महेश राठी, अमिताभ दुबे, नितीन ठक्कर, सचिन धन्नावत, संजय धवड, अण्णाजी गुंडलवार, मनीष कुर्जेकर, सुजीत खंडेलवाल, हेमेंद्र बोधानी, पुरुषोत्तम गायधने, मोहन वाडीभस्मे, विवेक गर्गे, पराग बेझलवार, अमर खंडेलवाल, महेश केशवानी, राजेंद्र जैस्वाल, सचिन शिरबोरीकर उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित नाटय़स्पध्रेत जेसीआय उमरेडला ११ हजार रुपयाचे प्रथम, जेसीआय मध्य नागपूरला ५ हजार रुपयाचे द्वितीय पारितोषिक देण्यात आले. वक्तृत्व स्पध्रेत अंजू जैस, भागवत, युगिता मुळे, भावना सरोदे, नेहा सिंग, चेतना धाबेकर यांना पारितोषिक देण्यात आले. बॅनर स्पध्रेत जेसीआय नागपूर कळमना व जेसीआय रॉयल यांना पारितोषिक देण्यात आले. छायाचित्र स्पध्रेत जेसीआय उमरेड व जेसीआय नागपूर लेडी लिजेन्ड यांना पुरस्कार देण्यात आला.