Leading International Marathi News Daily

सोमवार, १ जून २००९

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचे धोरण तयार
पंधरा वर्षांच्या महाराष्ट्रातील वास्तव्याची अट

विनायक करमरकर, पुणे, ३१ मे

फेरीवाल्यांची अधिकृत नोंदणी व पुनर्वसनाबाबत राज्याचे धोरण तयार झाले असून त्यासंबंधीचे ‘मॉडेल बायलॉज’ सर्व नगरपालिका व महानगरपालिकांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत. स्थिर फेरीवाल्याच्या नोंदणीसाठी घालण्यात आलेली महाराष्ट्रातील १५ वर्षांच्या वास्तव्याची अट हे या धोरणाचे वैशिष्टय़ आहे.

..अन्यथा पुण्यात विधानसभा स्वतंत्रपणे लढवणार
महापालिकेतील पुणे पॅटर्न तोडण्याची खासदार कलमाडी यांची मागणी
पुणे, ३१ मे/प्रतिनिधी
महापालिकेतील पुणे पॅटर्न तोडला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत पुण्यामध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागेल, असा इशारा खासदार सुरेश कलमाडी यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना लवकरच योग्य उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.पुणे लोकसभा मतदारसंघातून निवड झाल्यानंतर कलमाडी यांचा आज पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.आमदार रमेश बागवे, चंद्रकांत छाजेड, विनायक निम्हण, शहर काँग्रेस अध्यक्ष अभय छाजेड, उपाध्यक्ष दीपक मानकर, पालिकेतील विरोधी पक्षनेते आबा बागूल, पी. ए. इनामदार, अमिनुद्दीन पेनवाले आदी काँग्रेस पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

आयुक्तांच्या मध्यस्थीने प्रस्ताव मान्य होण्याचे संकेत
वेंगसरकर अ‍ॅकॅडमीचा प्रस्ताव
पिंपरी, ३१ मे/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील कुरघोडीच्या राजकारणातून दिलीप वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीला इनडोअर क्रिकेटसाठी भाडेदराने जागा देण्याच्या मागणीचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीने फेटाळण्यात आल्याचे तीव्र पडसाद उमटले. त्याचाच परिणाम म्हणून पालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी मध्यस्थी करीत हा प्रस्ताव पुन्हा मान्य करण्याची भूमिका घेतली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

राजन काची यांच्याविरोधात
लाच प्रकरणी आरोपपत्र दाखल
पुणे, ३१ मे / प्रतिनिधी

व्यापाऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी विद्यमान नगरसेवक राजन काची यांच्यावर पोलिसांनी विशेष न्यायाधीश ए. जे. रोही यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मात्र, या आरोपपत्रातून कॉँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते आबा बागूल यांना मात्र सबळ पुराव्याअभावी वगळण्यात आले आहे.

संगीत नाटय़ महोत्सव आजपासून
पुणे, ३१ मे/प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद व सुशील स्नेहपरिवार यांच्या विद्यमाने येत्या १ ते ९ जून दरम्यान संगीत नाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कीर्ती शिलेदार, शशिकांत कुलकर्णी, मकरंद टिल्लू उपस्थित होते. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कलावंत फैयाज यांच्या हस्ते होणार आहे. टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला दीपक टिळक अध्यक्ष म्हणून उपस्थित राहाणार आहेत. सदर महोत्सव दररोज सायंकाळी पाच वाजता सुरू होणार असून, प्रसाद सावकार, शरद गोखले, अरविंद पिळगावकर, चंद्रकांत कोळी, रवींद्र खरे, अमोल बावडेकर, डॉ. राम साठे हे कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य आहे.

सुभद्राबाई घुले यांचे निधन
हडपसर, ३१ मे/प्रतिनिधी

मांजरी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्त्यां सुभद्राबाई निवृत्ती घुले (वय ७८) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पती, एक मुलगा, एक मुलगी, सून असा परिवार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार घुले हे त्यांचे सुपुत्र, भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय तुपे हे त्यांचे बंधू होते.

उज्ज्वला बापट यांचे निधन
पुणे, ३१ मे/प्रतिनिधी

उज्ज्वला बाळकृष्ण बापट (वय ६२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती व मुलगा असा परिवार आहे. बापट श्री. ना. दा ठाकरसी कन्याशाळेतून तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या होत्या. खो-खो या खेळाच्या प्रशिक्षक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

पिंपरीत पावणेदोन लाखांची चोरी
पिंपरी, ३१ मे / प्रतिनिधी

पिंपरी अजमेरा सोसायटीमध्ये शनिवारी सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान चोरटय़ांनी फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून कपाटातील एक लाख ७९ हजार रुपयांचा माल चोरुन नेला. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशू गौरीशंकर सामंत (वय ३२, रा. योगी सोसायटी, यू-सेक्टर, अजमेरा बिल्डींग, ३/१०३, पिंपरी) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. सामंत यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद असताना चोरटय़ांनी कडी कोयंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व किमती वस्तू असा एक लाख ७९ हजार रुपयांचा माल चोरुन नेला.

सुमीत उद्योग समूहाकडून ‘सीव्हॅक टँक’ची निर्मिती
पिंपरी, ३१ मे/प्रतिनिधी
युवक वर्गास रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने कासारवाडी येथील सुमीत उद्योग समूहाकडून ‘सीव्हॅक ३०००’ या खास साधनाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती या उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक प्रभाकर साळुंके यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
सुमीत फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील एन्व्हॉयरमेंटल इंजिनिअरिंग विभागाने मैलावाहू टँकरची निर्मिती केली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने हा टँक वरदान ठरू शकेल, असा विश्वास साळुंके यांनी या वेळी व्यक्त केला. औद्योगिक क्षेत्र, तसेच शहरालगतच्या नवीन भागातील मैला वाहून नेण्यासाठी या टँकरचा प्रभावी उपयोग केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे युवकांना रोजगाराचे साधन मिळणे शक्य आहे. यासाठी कंपनीच्या वतीने प्रशिक्षण, तसेच कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

धनगर समाजाचा मंगळवारी पिंपरीत मेळावा
पिंपरी ३१ मे / प्रतिनिधी

अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे निमित्त साधून येत्या मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात धनगर समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे, समाजाच्या महासंघाचे शहर अध्यक्ष राजू दुर्गे यांनी आज येथे सांगितले. प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून धनगर समाजाचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर ,अ‍ॅड.अण्णाराव पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. समाजाच्या जागृतीसाठी ‘धनगर समाज काल- आज- उद्या’या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम यावेळी होईल.